बेस्ट फ्रेंड

 ती: तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे बरं?

तो: (हसून) असं काय विचारतेय शाळेतल्या मुलांसारखं? 

ती: आपल्या रोहितला आपल्या बेस्ट फ्रेंड साठी ग्रीटिंग बनवायला लावलं आहे शाळेत, त्यावरून आठवलं..मीही माझ्या बेस्ट फ्रेंड साठी बनवतेय..

तो: (अजूनच हसायला लागतो) बरं बरं..कर, चांगला टाईमपास आहे

ती: सांगा ना, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण?

तो: आता या वयात बेस्ट फ्रेंड वगैरे काही नसतं गं..

ती: तरीही..

तो: अम्म्म…आता बघ, ऑफिसमध्ये आम्ही चार मित्र, त्यातला एकजण बराच जवळचा आहे, त्याच्याशी सगळं शेयर करतो मी..तो कुणाल…ऑफिसमधला

ती: अच्छा म्हणजे कुणाल तुमचा बेस्ट फ्रेंड

तो: तो ऑफिसमधला… आता मला जर पार्टी करायची असेल, मुव्हीला जायचं असेल तर आपल्या पक्या… आपल्याच शेजारी राहणारा… कॉलेजपासून ओळखतो आम्ही एकमेकांना

ती: बरं, अजून किती बेस्ट फ्रेंड्स आहेत?

तो: अजून…हा..तो परेश, तसा नातेवाईक लागतो, पण काहीही ऑफिशियल काम असलं की कायम सोबत असतो, मदत करतो, घरी येतो, विचारपूस करतो

ती: अच्छा.

तो: तू सांग की, तुझी बेस्ट मैत्रीण?

ती: मी नाही सांगत जा..

तो: सांग की, त्यात लाजयचं काय, मी सांगितलं की नाही तुला..

ती: आहे एक..

तो: (संशयाने) ‘तो’ की’ती’?

ती: ‘तो’

तो: (गंभीर होऊन) कोण?

ती: आहे एक, आणि तो एकच आहे…3-3 बेस्ट फ्रेंड्स नाहीत मला

तो: अच्छा? असं काय आहे त्यात?

ती: म्हणजे बघा, मन मोकळं करायचं असेल, काही सांगायचं असेल तरी तोच…बाहेर जायचं असेल, शॉपिंग किंवा मुव्ही.. तरी तोच सोबत…कसलंही काम असो, मदतीला सोबत तोच..

तो: (चिडून) स्पष्टपणे सांग मला, असा कोणता मित्र आहे तुझा जो हे सगळं करतो? अगदी मुव्ही ला सुदधा? हे अति होतंय.. आणि मला माहित नाही? 

(दारावरची बेल वाजते, ती पटकन उठून बाहेर जाते, इकडे त्याच्या मनात चलबिचल वाढलेली असते, मनात नाना शंका उफाळून येत असतात. तोच समोर असलेले ग्रीटिंग कार्ड तो उघडतो, त्यातलं एक मुलासाठी बनवलेलं असतं. दुसऱ्या ग्रीटिंग कार्ड मध्ये बायकोच्या मित्राचं नाव असणार म्हणून तो घाबरत घाबरत उघडतो….डोळे विस्फारून बघतो, मनातला संशय, राग, चीड सगळं एका दमात खल्लास…कारण त्यात त्याचंच नाव होतं.. तो विचार करू लागतो..

आपण बाहेरच्या जगात वावरतो, आपल्याला दहा माणसं भेटतात, त्यातील काही अगदी जवळची बनतात, आपल्याला मानसिक ऊब देतात..मन मोकळं करायला आपल्याला अशी हक्काची माणसं भेटतात. पण हिचं काय? घरातल्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्या पेलत ही अख्खा दिवस घरातच घालवते, ही कुणाकडे मन मोकळं करत असेल? कोण आहे हिच्या जवळचं? बेस्ट फ्रेंड, मैत्रीण, हक्काचं माणूस, ऊब देणारा व्यक्ती…सगळं ती आपल्यातच तर बघते…तिचं अख्खं आयुष्य आपल्याभोवती फिरतं… सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हिच्या मनात आपलाच विचार, आपल्यासाठीच झटत असते ती…आणि मी? मी मात्र आपला ‘बेस्ट फ्रेंड’ बाहेरच्या लोकांत शोधत होतो…माझा खरा बेस्ट फ्रेंड म्हणजे माझी बायकोच…किती गृहीत धरलं आपण तिला…

ती: काय हो काय करताय?

तो: ग्रीटिंग बनवतोय, माझ्या बेस्ट फ्रेंड साठी..

ती: म्हणजे 3 बनवावी लागणार

तो: नाही, एकच…माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे याचं उत्तर मिळालं मला 😊😊😊

1 thought on “बेस्ट फ्रेंड”

Leave a Comment