बेचव

 आजही त्याने टिफिन परत आणलेला पाहून दिव्याला वाईट वाटलं. अखिलेशची घरी आल्या आल्या चिडचिड व्हायची, ऑफिसचा ताण, त्यात तो दिव्याला रोज बोलत असे,

“तुला चांगला स्वयंपाक येत नसेल तर आईला सांगतो मी..अजिबात चव नसते आता जेवणाला..”

दिव्या रोज मनापासून त्याच्या आवडीचं बनवायचा प्रयत्न करे, अखिलेश सध्या असं का वागतोय तिलाच समजेना. रोज रोज टिफिन परत आलेला पाहून तिला फार त्रास होई. तिला महिन्याचा त्या चार दिवसात होणारा त्रास सध्या वाढला होता, त्यामुळे मानसिक चढउतार होत होते, तिचे मूड सतत बदलत असायचे, पण बदलणाऱ्या मुडला नखरे म्हणून अखिलेश मोकळा होईल हे तिला चांगलं माहीत होतं. कदाचित याचा परिणाम स्वयंपाकावर होत असावा. अगदीच बेचव नाही पण कधी तिखट मीठ कमी जास्त व्हायचंच. 

एके दिवशी अखिलेश ने सरळ सांगून टाकलं,

“नको देत जाऊ डबा.मी बाहेरून मागवत जाईल..”

दिव्याच्या आता आपण अगदीच निरुपयोगी आहोत अशी भावना मनात ठाण मांडुन बसली. तिच्या दैनंदिन कामकाजावर अजूनच त्याचा परिणाम होऊ लागला. 

सासुबाईंच्या नजरेतुन ही गोष्ट काही सुटली नाही. अखिलेशच्या हातात आता टिफिन दिसत नाही हे पाहून त्यांना जे समजायचं ते समजलं. तावातावाने त्या दिव्याकडे आल्या अन म्हणाल्या..

“अखिलेश डबा नेत नाहीये, काय चाललंय तुमचं?”

दिव्या काहीही बोलेना, सासूबाईंना जे समजायचं ते समजलं, त्या चिडल्या आणि अखिलेश आल्यावर बघते एकेकाला असं म्हणाल्या..

संध्याकाळी अखिलेश घरी आला, सासूबाईंनी दोघांना समोर बसवलं. दिव्याला तर घामच फुटलेला, एकतर आधीच अखिलेश सोबत संबंध बिघडलेले, त्यात सासूबाईंची भर पडणार, दोन्ही मिळून आपल्यावर बरसणार..

सासुबाई मात्र भलतंच बोलायला लागल्या..

“अखिलेश.. यावेळी तुझं प्रमोशन नाही झालं?”

“यावेळी? मागच्या वेळी झालेलं ना..”

“वर्ष झालं त्याला..असं दरवर्षी प्रमोशन होतं का?”

“आणि तुला तो बेस्ट एम्प्लॉयी चा अवॉर्ड पण मिळालेला..यावेळी नाही मिळाला?”

“नाही..”

“का? कुणाला मिळालं?”

“नवीन मुलं आली आहेत, नव्या दमाची..त्यांना मिळालंय..” अखिलेश नाराजीनेच सांगत होता..

“काय अखिलेश तू..प्रमोशन नाही, अवॉर्ड नाही..काम चांगलं करत नाहीस का तू?”

“आई ही कसली अपेक्षा गं? दरवेळी मी परफेक्टच असेल असं नाही ना, दरवेळी मीच जीव काढायचा, मीच मेहनत करायची असं होत नाही ना..बऱ्याच शारीरिक आणि मानसिक मर्यादा येतात माणसाला..दरवेळी सारखाच उत्साह माणूस दाखवू शकत नाही..”

“होना? मग हेच सगळं दिव्याच्या बाबतीत का नाही लक्षात घेत?”

अखिलेश एकदम चमकला, आईचा रोख त्याला समजला. दिव्याही एकदम चक्रावून गेली, तिला कुणी समजून घेईल अशी तिची अपेक्षाच नव्हती.

“हे बघ अखिलेश, जसं तू प्रत्येकवेळी प्रमोशन आणि अवॉर्ड मिळवू शकत नाही तसंच दिव्याही प्रत्येकवेळी परफेक्ट असावी असा आग्रह का? तू म्हटलास की ऑफिसमध्ये नवीन मुलं आलीयेत, त्यांना अवॉर्ड मिळताय, अरे नव्या दमाची पोरं ती..दिव्याचंही वय वाढतंय, अनेक शारीरिक बदलांना ती सामोरं जातेय..अश्यावेळी तिच्या डब्याला नावं ठेवणं योग्य आहे का? मीही रोज तिच्या हातचं जेवते, अगदीच खाण्यालायक नाही असं नसतं कधी, चवीत थोडाफार फरक असू शकतो ना..आणि तुला एकाच चवीची सवय झाल्याने कंटाळा येऊ शकतो..त्यात तू तिला दोषी ठरवू नकोस..”

अखिलेश विचार करत आत गेला, दिव्या तर सासूबाईंच्या गळ्यात पडून मोकळी झाली. दुसऱ्या दिवशी अखिलेश किचनमध्ये येऊन विचारतो कसा..

“दिव्या, टिफिन दे बरं बनवून लवकर. बाहेरचं खाऊन कंटाळा आलाय आता..”

2 thoughts on “बेचव”

Leave a Comment