“जिना उतरताना असं काय घडलं की त्या 10 सेकंदात तू त्याला नाकारलंस??”
“निरीक्षण होतं आई, बाकी काही नाही…”
“कसलं निरीक्षण? अगं लाखात एक असा मुलगा आहे तो…असं स्थळ मिळणं म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल आणि तू अचानक त्याला नकार दिलास?”
“शोभना, तिचं आयुष्य आहे ..तिला निर्णय घेऊ दे..”
“कसला निर्णय अन कसलं काय..लहान आहे ती…समजत नाही तिला चांगलं वाईट..”
आई तावातावाने आत निघून जाते…
अभिलाषा चं नुकतंच लग्न ठरलं होतं..मुलगा शिकलेला, चांगल्या पगारावर चांगल्या हुद्द्यावर होता..अष्टपैलू होता…नाही म्हणण्यासारखं काही कारणच नव्हतं त्याला..अभिलाषा ने त्याला नीट पारखून मग होकार दिला.
लग्नाला अजून अवकाश होता, अभिलाषा च्या आई वडिलांनी एक पिकनिक आयोजित केली अन तिथे आयुष आणि त्याच्या कुटुंबियांनाही बोलावण्यात आलं..या निमित्ताने दोघे एकमेकांना अजून चांगले ओळखतील असं त्यांना वाटलं…
ठरल्याप्रमाणे सर्वजण पिकनिक ला गेले..3 दिवस मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी आयुष आणि अभिलाषा बॅडमिंटन कोर्ट वर खेळत होते…अचानक रॅकेट चा झटका लागून अभिलाषा चा हात मुरगळला…तिला सरळ करता येईना..
आयुष धावत तिच्याकडे आला..आजूबाजूला कुणी नाही ना हे पाहिलं आणि चटकन तिचा हात हातात घेतला..प्रेमाने फुंकर घातली…औषध लावून दिलं..
अभिलाषा ला बरं वाटलं..होणारा नवरा काळजी घेतो हे पाहून तिला हायसं वाटलं..
अभिलाषा चा हात खूप दुखत होता.. पण इतरांना त्रास नको म्हणून तिने घरी कुणालाही सांगितलं नाही..
दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापली बॅग आवरून बाहेर पडत होते…अभिलाषा चे आई वडील गाडीजवळ गेले…आयुष चे आई वडील अभिलाषा च्या खोलीपासून काही अंतरावर उभे होते…अभिलाषा चा हात दुखत असल्याने तिला बॅग काही उचलता येईना…तिने आयुष कडे पाहिलं… तिला वाटलं की आयुष ला माहितीये माझा हात दुखतोय, तो उचलेल माझी बॅग..काल जशी काळजी घेतली होती तशीच घेईल..
पण आयुष….त्याने त्याच्या आईकडे पाहिलं… आईची नजर त्याच्याकडेच होती…दोघे काय करताय याकडे त्यांचं लक्ष होतं… आयुष फक्त स्वतःची बॅग उचलतो आणि गाडीजवळ येतो… गाडीत बसून घेतो..
बस..या एका प्रसंगातुन अभिलाषा त्याला नकार देते..
तो प्रसंग जसाच्या तसा ती बाबांना सांगत असते..
अभिलाषा ची आई चहा घेऊन बाहेर येते..वडील विचारतात…
“अगं आई वडिलांसमोर त्याला awkward वाटलं असेल म्हणून नसेल मदत केली त्याने..”
“हेच तर चुकलं बाबा…काळजी फक्त चार भिंतीच्या आत दाखवायची का? मी म्हणत नाही की तुम्ही प्रेमाचा तमाशा समाजासमोर दाखवा…पण आपली होणारी बायको अडचणीत असताना केवळ आई वडील समोर आहेत,किंवा कुणीतरी पाहतय म्हणून तिची काळजी करणं सोडायचं?? म्हणजे ती काळजी काळजी नाहीच…तो फक्त एक दिखावा होता….जो माणूस सर्वांसमोर हिमतीने बायकोला मदत करू शकत नाही…ज्या माणसाला बायकोच्या अडचणीपेक्षा समाज काय म्हणेल याची पर्वा आहे…बायकोची बॅग उचलायला ज्याला कमीपणा वाटतो…त्या माणसासोबत आयुष्य काढणं म्हणजे अवघड आहे..”
आई ते सगळं ऐकते….आई शांत होते.. तिचा राग निवळतो ..आई फोन लावते..
“नमस्कार…सॉरी राग नका मानू पण अभिलाषा आणि आयुष चं लग्न होऊ शकणार नाही, आमचा नकार समजा..”
अभिलाषा आणि बाबा आईचं अवसान पाहून थक्क होतात…
“अगदी बरोबर निर्णय घेतलास… मी आहे तुझ्या बरोबर…”
100/right
Yes