प्रेमविवाह

 मेघना आणि सारंगच्या संसाराकडे सर्वांचं बारीक लक्ष होतं. दोघांचा प्रेमविवाह. घरचे तसेच नातेवाईक सर्वांनी लग्नाला प्रचंड विरोध केलेला पण दोघेही आपल्या मतावर ठाम होते. सर्वात जास्त विरोध होता तो काका काकूंचा. नातेवाईकात आपलं हसू होईल, सामाजिक प्रतिष्ठेला तडा जाईल म्हणून त्यांनी सुरवातीपासूनच प्रयत्न केले हे लग्न न होऊ देण्याकरिता. पण शेवटी प्रेम जिंकलं आणि मेघना व सारंगचं लग्न मोजक्या लोकांत पार पडलं.

हे लग्न होताच काका काकूंनी त्यांच्या मुलीचं, श्रेयाच्या लग्नाची घाई केली. अनेक स्थळं बघायला सुरवात केली. एक खूप श्रीमंत, हुशार, सुशील मुलगा पाहिला, गावाकडे शेती, स्वतःचं घर आणि शहरात मुलाचा स्वतःचा फ्लॅट..याहून जास्त काका काकूंना काय हवं होतं? अनघाने असा प्रेमविवाह करताच श्रेयाचं लग्न घाईघाईने आटोपून टाकण्यात आलं. आता मात्र काका काकू निर्धास्त झाले होते. आमच्या मुलीने आमचा शब्द कसा पाळला, आम्ही सुयोग्य वर बघून कसं तिचं लग्न करून दिलं आणि तिनेही कसं मुकाट्याने लग्न केलं याचाच बडेजाव काका काकू करत असत. श्रीमंत अश्या घरात आमची मुलगी आमच्या निर्णयामुळे सुखाने संसार करतेय हे काका काकू सर्वांना सांगत होते.

इकडे मेघना आणि सारंगचाही संसार सुरू झालेला. आधी एकमेकांना मनाने ओळखणाऱ्या दोघांना आता एकमेकांच्या सवयी समजू लागल्या, सहवासाने एकमेकांशी अजून जास्त ओळख होऊ लागली. पण हळूहळू खटके उडायला लागले, सारंगचा आळशीपणा अनघाला चीड आणे, तर मेघनाची क्षुल्लक कारणांवरून होणारी चिडचिड सारंगला आवडत नसे. दोघांमध्ये वाद होऊ लागले, पण सांगणार कुणाला? सांगितलं तर हेच उत्तर येणार..”आम्ही विरोध करत होतो लग्नाला तेव्हा ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं..” त्यामुळे दोघेही आपापसात वाद मिटवून घेण्याचा प्रयत्न करत..

पण एकदा अतिरेक झाल्याने मेघना कंटाळून माहेरी आली, नेमके त्या दिवशी काका काकू घरी आलेले. मेघनाने काका काकूंना काहीही झालेलं नाही हेच दाखवलं. पण तिच्या नजरेतून काकुला लगेच समजलं की काहीतरी बिनसलं आहे. तिला विश्वासात घेऊन काकूने तिला खोदून खोदून विचारलं तेव्हा कुठे तिने आपलं मन मोकळं केलं. आई तिला शांत बस म्हणून खुणावत होती पण इतके दिवस मनात दाबून असलेलं दुखं अखेर तिने मोकळं केलंच. 

काकूला हेच हवं होतं, कधी एकदा यांच्या संसारात काडी पडते आणि कधी एकदा हिला बोल लावता येतो याचीच काकू वाट बघत होती..

“हाच फरक असतो आई वडिलांनी बघून दिलेल्या मुलाशी लग्न करण्यात आणि स्वतः पसंत केलेल्या मुलाशी लग्न करण्यात..नातेवाईकात बदनामी होते ती आणखी वेगळी..तरी आम्ही सांगत होतो, त्या मुलाशी लग्न करू नकोस म्हणून..”

कुठे भावनेच्या भरात आलो अन काकुला सगळं सांगत बसलो असं मेघनाला झालं. आई तिला खुणावून सांगत होती तेही तिने ऐकलं नव्हतं. क्षुल्लक गोष्टीचं खापर पूर्ण लग्नावर पडलं.

काकू सगळं सांगत असतानाच काकुला श्रेयाचा फोन आला..फोनचा आवाज मोठा असल्याने समोरच्याचं सगळं बोलणं ऐकू येत होतं.

“आई, काहीही करून मला इथून घेऊन जा..प्रतीक आजपण पिऊन आला आहे, मला माझ्या दिसण्यावरून, कामावरून खूप बोलतोय, आजवर मी मार सहन केला पण आज हा मला मारूनच टाकतोय की काय असं वाटतंय..”

काकुला दरदरून घाम फुटला, एकीकडे मुलगी संकटात होती आणि दुसरीकडे मेघनासमोर काही बोलताही येईना. काकू पटकन फोन ठेऊन तिथून उठली आणि तडक काकांना घेऊन श्रेयाला आणायला गेली..

प्रेमविवाह असो वा ठरवलेलं लग्न, कुरबुरी, वाद प्रत्येक लग्नात होणारच, पण त्यामुळे मुळात लग्नच चुकीचं आहे असं बोलणं चुकीचं. क्षणिक वाद हे सामंजस्याने सोडवता येतात, तिथे गरज असते एका समजुतीची, समजावून सांगणाऱ्या शब्दांची. पण ते न करता मुळात मुलगी/मुलगाच चुकीचा आहे आणि हे लग्न झालं तेच चूक झालं असा टोकाचा निर्णय नातेवाईक लावून बसतात. काय वाटतं तुम्हाला? 

_______

आवर्जून वाचावी अशी हृदयस्पर्शी कथा 👇👇👇

कोल्हापूरच्या एका शाळेत असाच चौथीचा वर्ग भरला होता. नुकतीच प्रार्थना होवून. मुले वर्गात येऊन बसलेली. आत्ता तर उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झालेले. त्यामुळे अजून शिकवायला म्हणावी तशी सुरुवात झाली नव्हती. शाळेत नवीन प्रवेश अजून सुरू होते व प्रत्येक वर्गात नवीन मुले अजून येतच होती.

       अशीच चौथीच्या वर्गात एका मुलीला घेऊन तिचे आई-वडील आले होते. ती मुलगी गोरी- गोमटी,घाऱ्या डोळ्यांची आणि गोबऱ्या गालाची पण तिच्या दोन्ही हातात काखेत खोवलेल्या कुबड्या होत्या व त्या कुबड्यांच्या आधाराने ती मुलगी उभी होती. इतकं असून ही तिचे दप्तर तिच्या पाठीला होते. गळ्यात व्हाटर बॅग होती. हे तिच्या स्वाभिमानाची साक्ष देत होते

बाईंनी तिला समोर बोलावले व त्या म्हणाल्या

बाई,“ ही तुमची नवीन मैत्रीण विनिशा विलास पाटील. तर टाळ्यानी स्वागत करा तिचे” बाईंनी टाळ्या वाजवायला सुरवात केली.

     त्या बरोबर मुलांनी ही टाळ्या वाजवल्या. बाई विनाशाला म्हणाल्या जा विनिशा तिथे जाऊन बस. विनिशा बेंचवर जाऊन बसायला लागताच एक सावळा, नाकीडोळी नीटस, कुरळ्या केसांचा मुलगा चपळाईने तिच्या समोर आला व तिला बेंचवर बसवून तिच्या कुबड्या भिंतीला टेकवून त्याने ठेवल्या. तो मुलगा म्हणजेच निशांत शिंदे. 

येथूनच तर एका अतूट मैत्रीची आणि एका सुंदर अजब गहजब प्रेम कथेची सुरवात झाली!

       विनिशा ही विलासरावांची मुलगी तीन वर्षाची असताना तिला ताप आला व त्याच्या बरोबर तिचा एक पाय  घेऊन गेला. पोलिओमुळे तिचा उजवा पाय कायमचा निकामी झाला व  खेळण्या- बागडण्याच्या  वयात तिच्या नशिबी कुबड्या आल्या. विलासराव सरकारी अधिकारी होते.त्यांच्या बदल्या होत राहायच्या पण कोल्हापूर त्याचे मूळ गाव असल्याने ते कायमचे कोल्हापूर मध्ये स्थायिक होण्यासाठी कोल्हापुरात आले. आज ते विनिशाला सोडायला शाळेत आले होते.त्यांना विनाशाची काळजी वाटत होती म्हणून बाईंना तिच्याकडे लक्ष द्या अशी विनंती करायला ते आले आणि निशांतचे ते कृत्य पाहून समाधानाने तिचे आई – वडील घरी गेले.

      निशांत वर्गातला सर्वात चपळ व चुणचुणीत मुलगा त्याच्या वडिलांचा कोल्हापुरात छोटासा बिजनेस होता. विनिशा वर्गात प्रवेशकर्ती झाली आणि निशांतने तिला आपली मैत्रीण म्हणून निवडली. विनिशा आणि निशांतची चांगलीच गट्टी जमली. निशांत शाळेत सर्वेतपरी तिची काळजी घ्यायचा जणू इतक्या लहान वयात त्याने तिची जबाबदारी स्वीकारली होती.

         खेळाचा तास असू दे वा जेवणाची सुट्टी इतर मुले खेळत असताना  विनिशा किती ही  जा खेळ म्हणाली तरी निशांत कधीच तिला सोडून खेळायला जात नसे. एवढेच नाही तर विनिशाला  तिची आई घ्यायला येई पर्यंत तो तिला शाळेच्या गेट पर्यंत घेऊन यायचा.

     विनिशा अभ्यासात हुशार होती. ती कायम पहिल्या तीन मध्ये असे तसेच चित्रकला, निबंध लेखन यात तिचा नंबर ठरलेला असायचा. निशांत अभ्यासात मध्यम होता मात्र वक्तृत्व स्पर्धा व खेळ गाजवायचा. 

       अशीच वर्षे सरली आता ते दोघे नववीत गेले. भारतात आता अपंगांसाठी नवीन टेक्नॉलॉजी आली होती. व विनिशाला त्याचा फायदा होणार होता.पण त्यासाठी एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती व विनाशाला सहा महिने शाळेत जाता येणार नव्हते. नुकतीच सहामाही परीक्षा झाली होती  तिच्या आई- वडिलांना लवकरात लवकर तिच्यावर शस्त्रक्रिया व्हावी असे वाटत होते पण त्या मुळे त्यांना तिचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार असे वाटत होते. तरीही विनिशा च्या बाबांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला.

        विनिशावर कोल्हापूर मधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. तिचा पोलिओमुळे वर गेलेला पाय शस्त्रक्रिये मार्फत जरासा खाली आणून तिच्या गुडघ्यात रॉड बसवून कॅलिबर घालायची सोय करण्यात आली. विनिशा महिना भर हॉस्पिटलमध्ये होती. तितके दिवस व त्या नंतर ही घरी जाऊन निशांत तिला शाळेत शिकवलेले सगळे शिकवत असे. त्यामुळे विनिशाचे वर्ष वाया जाण्यापासून वाचले.

         विनिशा जेव्हा शाळेत दाखल झाली तेव्हा वार्षिक परीक्षेला अवघे पंधरा दिवस बाकी होते. पण निशांत मुळे तिचा सगळा अभ्यास झाला होता. वर्गात गेल्यावर तिचे स्वागत उत्साहात करण्यात आले.आता तिच्यात एक अमुलाग्र  बदल झाला होता ती कुबड्या न घेता हळूहळू का होईना स्वतः चालू लागली होती. व या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद निशांतला झाला होता. विनिशा पुढे गेली व ती बोलू लागली.

विनिशा, “बाई, खरं तर या शास्त्रक्रिये मुळे माझे एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार असे मला व माझ्या आई-बाबांना वाटत होते पण निशांतने मला रोज गेल्या सहा महिन्यां पासून वर्गात शिकवलेले घरी येऊन शिकवले त्याच्या मुळे मी सहज पास होईन आता. Thanks निशांत व माझ्या कडून तुला ही आपल्या मैत्रीची पहिली भेट !” असं म्हणून तिने त्याला पुढे बोलावून एक गिफ्ट रॅप त्याच्या हातात दिले.

      निशांतने ते गिफ्ट घेतलं त्यात एक सुंदर असा पांढऱ्या रंगाचा गुलाबी नाजूक फुलांचे नक्षीकाम असलेला शाई पेन होता.त्यानंतर दहावी मग बारावी सायन्स अशा एक- एक शैक्षणिक पायऱ्या ते दोघे एकमेकांच्या सोबतीने चढत गेले. निशांतच्या आईला मात्र त्या दोघांची मैत्री पसंद नव्हती.

       त्याच्या दोघांच्या बरोबर अकरावी मध्ये समिधा सामील झाली. ती विनिशाची चांगली मैत्रीण झाल्या मुळे ती निशांतची ही मैत्रीण बनली. त्या तिघांचं त्रिकुट कॉलेज मध्ये चांगलंच फेमस होत. निशांत रोज विनिशाला घरून स्कुटीवर कॉलेजमध्ये घेऊन येत असे व घरी सोडत ही असे.

     बारावी नंतर निशांतच्या आईला वाटत होतं कि त्याने इंजिनिअरिंगला जावं पण निशांतने  कॉम्प्युटर सायन्स मधून ग्रॅज्युएशन करून मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन (M.C.A) करायचं ठरवलं. विनिशा ही तेच करणार होती.निशांतच्या आईला मात्र त्याने विनिशा मुळे हा निर्णय घेतला असे वाटत होते. 

        निशांत,विनिशा आणि समिधा तिघांनी ही तीन वर्षे ग्रॅज्युएशन व त्या नंतर M.C.A.ला एकाच कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले. एव्हाना निशांतला त्याचे मित्र विनिशा वरून चिडवू लागले होते. समिधाला ही निशांतच्या डोळ्यात विनिशा बद्दल प्रेम दिसत होतं पण विनिशा मात्र त्याला बेस्टफ्रेड म्हणायची.

        समिधाच्या सपोर्ट मुळे एक दिवस निशांतने विनाशाला डेटवर घेऊन जाऊन तिला प्रपोज करायचे ठरवले.निशांतने तिला फोन केला.

निशांत, “विनी आपण आज डिनरला जात आहोत तू तयार राहा!”तो फोनवर म्हणाला.

विनिशा,“ क्या बात हैं! लेकीन किस खुशी में?” ती म्हणाली.

निशांत, “ सहजच बरं तू तयार राहा मी सात वाजता येईन” तो म्हणाला.

विनिशा,“हो पण समिधा पण येणार आहे ना?” तिने त्याला विचारले.

निशांत,“तुला काय कराचे ग बाकीचे” तो जरा चिडून म्हणाला.

विनिशा,“ ok ok  नाही करत चौकशी पण वेळेवर ये नाही तर उशीर केला ना नेहमी प्रमाणे तर बग!” ती त्याला दम देत म्हणाली.

निशांत,“ हो हो येतो वेळेवर!” तो म्हणाला.

   निशांत सावळा पण नाकी डोळी नीटस,कुरळे केस, जिम मध्ये जाऊन कमावलेले शरीर,सहा फूट उंची असा पुरुषी सौंदर्य लाभलेला उमदा तरुण! तो रस्त्याने जाताना मुली त्याला हमखास वळून पाहत. तो आज ब्ल्यू  जीन्स व  फेंट गुलबी शर्ट असा मस्त तयार होऊन. वडिलांची कार घेऊन विनिशाच्या दारात पोहचला. त्याने हॉर्न वाजवताच विनिशा हॉर्नचा आवाज ऐकून बाहेर आली.

    ती त्याच्या कडे हळूहळू चलत येत होती. तिने लॉन्ग पांढऱ्या रंगाचे स्कर्ट व त्यावर फेंट लेव्हण्डर रंगाचा गुडघ्या पर्यंतचा टॉप घातला होता  तो तिच्या नितळ गोऱ्या रंगला खुलवत होता.गोल चेहरा,घारे डोळे त्यावर तिच्या हुशारीची साक्ष देणारा सरळ नाकावर स्थिरावलेल्या नाजूक फ्रेमचा चष्मा, ब्लंट कट असलेले सोडलेले वाऱ्यावर भुरभुरनारे केस,एकदम लाईट  न कळत केलेला मेकअप, एका हातात नाजूक घड्याळ व एका हातात साखळ्या लोंबणारे नाजूक ब्रेसलेट,गळ्यात नाजूक सोनसाखाली आणि तिने मारलेल्या रोझ परफ्युमचा मदमस्त करणारा सुगंध. निशांत तिला पाहतच राहिला..

निशांत विनिशासाठी तिचा बेस्ट फ्रेंड होता.पण निशांत मात्र तिच्यावर प्रेम करत होता आणि त्याने आज तिला प्रपोज करायचे ठरवले होते. म्हणूनच तो तिला आज डेटवर घेऊन जाणार होता. निशांतने तिला प्रपोज केल्यावर विनिशा कशी रियाक्ट होईल?

विनिशा निशांतचे प्रेम स्वीकारेल की नाकारले?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले

पुढील भाग खालील लिंकवर

https://www.irablogging.com/blog/seriesview/ajab-premachi-gahajab-goshta

1 thought on “प्रेमविवाह”

Leave a Comment