“असं वाटतं निघून जावं कुठेतरी या सगळ्या व्यापापासून…” ऑफिसच्या कामांनी वैतागलेला सचिन घरी आल्यावर बडबडत होता..
“काय हो काय झालं इतकं?”
“जाऊदे काय सांगू आता…ह्या कार्पोरेट कंपन्या म्हणजे ना…बाहेरून दिसायला कितीही पॉश असल्या तरी आत इतकं राजकारण चालतं ना, एकमेकांच्या चुका दुसऱ्यांवर ढकला अन स्वतः हात वर करून द्या, इतकंच चालतं फक्त..”
“तुम्ही शांत व्हा, एक काम करा खोलीत जाऊन पडा झ मी मस्त चहा आणून देते..”
“बरं..”
नवऱ्याला शांत करत निशा चहा करायला किचन मध्ये जात नाही तोच दारात प्लंबर उभा
“साहेब तुम्ही फोन केलेला ना?”
“अरे देवा…याला आत्ताच यायचं होतं का..” निशा पुतपुटते..
“हो हो..या इकडे मी दाखवतो…या नळाला लिकेज होतंय जरा..”
“अच्छा..साहेब मी करतो दुरुस्त…मला एवढं समान लागेल तेवढं फक्त आणून द्या..मी सुरवात करतो..”
सचिन तसाच समान आणायला बाहेर गेला…प्लंबर चं काम बरंच पुरलं, तो गेला आणि सर्वांनी जेवणं उरकली.
जेवण झाल्यावर सचिन म्हणाला..
“अगं हो, मी विसरलोच, तुला माहेरी जायचं होतं ना आज संध्याकाळी?? गेली नाहीस? भाऊ आला नाही घ्यायला??”
“मीच नाही सांगितलं त्याला..”
“का गं?”
“इथे तुमचे हाल होताय अन मी तिकडे जाऊन आराम कसला करू..”
“माझं काय घेऊन बसलीस, तुला जायला हवं…अगं माहेर म्हणजे कुठल्याही लग्न झालेल्या स्त्री साठी स्वर्गासमान असतं..”
“तुम्हाला कसं हो इतकं माहीत?? तुम्हाला तर माहेर हा प्रकारच नसतो..”
“तेच तर दुर्दैव आहे ना आम्हा पुरुषांचं… आम्हाला माहेरच नसतं..”
“तुम्हाला कशाला हवं माहेर? सतत आपल्याच घरी आणि आपल्याच आई वडिलांसोबत तर असतात तुम्ही…”
“अगं माहेर म्हणजे फक्त घर आणि आई वडील नाही…माहेर म्हणजे एक दुनिया असते…जिथे मनसोक्त आपण वावरत असतो, आपण आल्याचा आभाळाइतका आनंद त्या माणसांना असतो, माहेर म्हणजे एक आभाळ, जिथे आपण मुक्तपणे हवं तसं बागडू शकतो…ना कामाचं टेन्शन ना कसला व्याप…सतत आपल्याला हवं नको पाहणारे आणि आपले लाड करणारे लोकं आपल्या भोवती घुटमळत असतात…तिथे गेल्यावर कसलाच व्याप नसतो…या धावपळीच्या आयुष्याचा खरं तर तिथे विसर पडतो…आणि तिथून जी परत स्त्री निघते ना, तिच्यात पुन्हा एकदा ती ऊर्जा भरून येते…आणि पुन्हा आयुष्याच्या संघर्षाला ती नव्याने सुरवात करते..”
निशा डोळे मोठे करून सचिन च्या या “माहेरपुराणा” ला फक्त ऐकत असते..
“तू म्हणशील मी कसं इतकं बोलू शकतो, बरोबर ना? अगं मी जेव्हा हॉस्टेल ला होतो तेव्हा सुट्टीत घरी आल्यावर आपण माहेरी आलोय असंच काहीतरी वाटायचं… तेव्हा समजलं, की एखादी स्त्री सासरी असते तेव्हा माहेराची ओढ काय असते ते…”
“बरोबर आहे हो…माहेर म्हणजे एक वेगळाच आनंद असतो..”
“तेच ना…आता मला बघ, माझे आई वडील मी घरी आलो तर त्या नजरेने मला बघतील का ज्या नजरेने तू माहेरी गेल्यावर तुझे आई वडील बघतात? तुझं जसं कोडकौतुक तिथे होतं तसं माझं इथे करायला लावलं तर हाकलून नाही देणार का मला??”
“असं नाही हं, तुमचेही भरपूर लाड होतात इथे..”
“खोटं वाटतंय??? बघचं आता…आई…ए आई..”
“काय रे सच्या..”
“आज मी आलोय तर मस्त गरम गरम भजी आणि शिरा कर ना..”
“स्वयंपाक झालेला आहे…निशाने इतकं दमून सगळं केलंय ते वाया घालवायचं का?? आणि घरी आलोय म्हणजे?? दुसरीकडे जाशील तरी कुठे?? गपगुमान मेथीची भाजी आणि भाकरी खाऊन घे…म्हणे भजी कर…असं कुठल्याही वेळी करतात का भजी..”
आई निघून जाते आणि निशा ला हसू आवरत नाही..
“पाहिलंस..हे माझं माहेर…आता समजली ना माहेर ची किंमत?? म्हणून म्हणतो, पुरुषांनाही हवं असं एखादं माहेर..स्त्रियांसारखं….”