“अहो पूजाला समजवा की जरा, सकाळपासून खोलीत उदास होऊन बसलीये..”
“आता काय झालं आमच्या पिल्लुला?”
“पिल्लू पिल्लू म्हणत लाडावून ठेवलं आहे तुम्ही”
“पण झालं काय? का उदास आहे ती?”
“काल रिझल्ट लागला ना..”
“मग? किती चांगले गुण मिळालेत तिला..”
“सगळ्या विषयात पैकीच्या पैकी, फक्त गणितात कमी म्हणून नाराज होऊन बसली आहे..”
“कमी म्हणजे किती कमी?”
“शंभर पैकी 90 मिळालेत, 10 गुण कमी म्हणून नाराज आहे..”
वडील हसायला लागले,
“अरे देवा, आम्हाला तेवढे 10 मिळायचे फक्त तर आमचे आई बाप नाराज व्हायचे, इथे उलटंच..”
“हसू नका..”
“अगं नाराज आहे पण चांगल्या गोष्टीसाठी ना..त्यात काय वाईट आहे..”
“तुम्हाला कळत नाहीये, हा असा स्वभाव घातक आहे..”
“म्हणजे?”
“म्हणजे प्रत्येक परीक्षेत आपल्याला पूर्णच गुण हवे हा अट्टहास वाईट नाही, पण एखाद्या वेळी कमी मिळाले तर नाराज व्हायचं हेही चांगलं नाही, उद्या आयुष्यात तिला अनेक परीक्षा द्याव्या लागतील..प्रत्येक वेळी ती उत्तमच ठरेल असं होणार नाही..कित्येकदा कमी पडेल, अपयश येईल…ते पचवायची शक्ती हवी की नको? फक्त 10 गुणांसाठी ही नाराज होणार असेल तर पुढे कसं व्हायचं? बाकीच्या विषयात चांगले गुण मिळालेत याचा आनंद घ्यायचा सोडून ज्यात कमी पडलेत त्यावरून रडणं चांगलं नाही..”
*****