परवानगी.. माहेरी जायची

 “काय गं कुणाचा फोन होता?”

“दादाचा फोन होता आई..”

“काय म्हणे?”

“काही नाही, यावेळी सर्वजण अष्टविनायक यात्रेला जाताय, महिनाभर तरी बाहेरच असतील..”

“बरं मग? तुलाही जायचंय?”

“नाही..इथलं सगळं सोडून कसं जाऊ??”

“मला वाटलं तुलाही जायचं आहे.”

“जायचं तर नाहीये पण..”

“पण काय??”

“म्हटलं ते जाताय तर..काही दिवस माहेरी जाऊन भेटून येऊ..”

“आत्ता 3 महिन्यांपूर्वी तर गेली होतीस, चांगली 8 दिवस राहून आलेली की..”

सुनबाईचा चेहरा पडला तसं सासूबाईंनी तिला समजावलं..

“जाऊन ये..भेटून घे त्यांना..”

त्यांचं बोलणं ऐकताच शिवानी आनंदली.

“पण फक्त 3 दिवस हा..जास्त नाही..”

शिवानीला एकीकडे आनंद होत होता अन दुसरीकडे फक्त 3 दिवस जायची परवानगी दिली म्हणून थोडी नाराजी, काहीका असेना, परवानगी दिली हेच खूप. अशी मनाची समजूत घालून ती तयारीला लागली. 

सासूबाईंनी मुद्दाम ती जातेय तर वाढवा कामांची फर्माईश केली. चिवडा बनव, लाडू बनव, खारे शेंगदाणे बनव. शिवानीला खरं तर रागच आला, जायला परवानगी दिली ती काही फुकट नाही, त्या बदल्यात इतकी कामं सांगताय..

संध्याकाळी विजय घरी आला. शिवानीने त्याला जाण्याबद्दल सांगितलं, त्याने काहीही हरकत घेतली नाही, चहा प्यायला तो आईसोबत हॉल मध्ये बसला. शिवानी किचनमध्ये लाडू वळत होती. सासूबाईंनी मुद्दाम हळू आवाजात विषय काढला. शिवानीला लक्षात आलं की माझ्या जाण्याबद्दल सासूबाई विजयकडे तक्रार करतील. ते काय बोलताय हे ऐकायला शिवानी गपचूप भिंतीआड जाऊन उभी राहिली..

“विजय, सुनबाई माहेरी जातेय बरं का..”

“हो सांगितलं तिने मला..”

“आत्ता तर गेली होती ना 3 महिन्यांपूर्वी..”

शिवानीला ज्याची भीती होती तेच झालं, सासूबाई विजयचे कान भरतील ही शंका खरी ठरली. पण पुढे त्या ज्या बोलल्या ते ऐकून शिवानीच्या डोळ्यात पाणी आलं..

“माहेरी जाण्याबद्दल काही नाही रे..ती नसताना मी कशी दिवस काढते माझं मलाच माहीत. मागच्या वेळी गेलेली तेव्हा देवपूजा करायलाही सुनं सुनं वाटायचं, असं वाटायचं घरातली लक्ष्मीच नाही घरात मग पूजा तरी कशाला करायची? ती नुसती आसपास असली तरी जीवाला बरं वाटतं. या वयात जीव घाबरा होतो, अचानक कधी डोकं दुखतं, चक्कर येते..पण ती नुसती जवळ आहे या जाणिवेने सगळं विरून जातं बघ. ती जेव्हा अशी जाते तेव्हा रडू आतल्या आत दाबते मी, असं वाटतं लेक दूर जातेय..आता हे शेवटचं, पुढच्या खेपेला तिला सांगेन, बाई कुठेही जा पण मला सोबत ने..तू दिवसभर बाहेर असतो, तू जवळ असणं आणि तिचं असणं यात खूप फरक आहे रे..”

विजय हसला, भिंतीआड असलेल्या शिवानी ला स्वतःला आवरणं कठीण झालं, तिने कसेबसे लाडू वळले, डब्यात भरून ठेवले. सकाळी तिला पहाटे 5 ची गाडी पकडून घरी जायचं होतं, सर्वजण झोपेत असताना तिला निघायचं असल्याने रात्रीच तिने बॅग भरून ठेवली आणि लवकर झोपली.

पहाटे 4 ला उठून सगळं आवरलं, अंघोळ केली, चहा घेतला, तिची बॅग उचलली अन दाराकडे जायला निघाली. बॅग फारच जड लागत होती, 

“इतकी कशी जड झालीये बॅग? काल तर एवढी जड नव्हती लागत..”

तिने उघडून पहिलं तर..

सासूबाईंनी चिवडा, लाडू वगैरे प्रकार बनवायला सांगितले होते ते सर्व पिशव्यांत भरून रात्री बॅगेत ठेवले होते. शिवानीला आत्ता लक्षात आलं, आई बाबांना यात्रेसाठी द्यायला म्हणून सासूबाईंनी हे सगळं करवून घेतलं होतं.

4 thoughts on “परवानगी.. माहेरी जायची”

Leave a Comment