काळे मास्तरांकडे शिकवणीसाठी उगाच गर्दी नसायची, त्यांचा वर्ग म्हणजे जणू एकपात्री विनोदी सभाच जणू. खळखळून हसत मुलं शिकायचे, त्यांच्या वर्गात कुणी जांभई दिलेली आठवत नाही. सुट्ट्या सम्पल्या की केवळ काळे मास्तरांच्या शिकवणीसाठी मुलं शाळा उघडायची वाट बघायचे.
काळे मास्तर एका शाळेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची जातेगावला बदली झाली आणि घर वजा चाळीत ते आई, वडील अन बायकोसह राहायला आले. काळे मास्तर एकदम विनोदी तर याउलट त्यांची आई तापट स्वभावाची. अश्या बाईच्या पोटी असलं हसमुख लेकरू जन्माला येणं हे एक कोडंच होतं. चाळीत ते एकमेव सुशिक्षित आणि आदरणीय. चाळ म्हटल्यावर मुलांच्या अभ्यासाची बोंबच असायची, मास्तर येताच चाळीतल्या पालकांनी शिकवणी सुरू करण्याची मागणी केली. मास्तर असंही संध्याकाळी मोकळेच असायचे, चाळीतही बरीच मुलं होती. सर्वांच्या आग्रहाखातर वाण्याच्या दुकानाच्या समोरच्या मोकळ्या जागेत शिकवणी सुरू झाली. नेहमीप्रमाणे काळे मास्तर आपल्या विनोदी शैलीने मुलांना खिळवून ठेवत. अभ्यासही व्हायचा आणि मुलांचं मनोरंजनही.
एके दिवशी त्यांच्या शिकवणीच्या जागेवर काही नेते मंडळींची सभा भरवण्यात आली. काळे मास्तरांची एक दिवसासाठी पंचाईत झाली खरी, परीक्षाही तोंडाशी आलेल्या, शिकवणी घेणं गरजेचं होतं. मुलांची शाळेची वेळ बघता दुसरी वेळही ठरवता येणार नव्हती. अखेर मास्तरांनी मुलांना आपल्या चाळीतल्या घरात बोलावलं. Tv टेबलला खेटून फळा टेकवला अन मुलांना बसवलं समोर सतरंजीवर.
बायको अन आई स्वयंपाकघरात जाऊन बसल्या. लसूण सोलुन ठेवणं, शेंगदाणे भाजून सालं काढणं असं काम वसुधा करू लागली. सासूबाई बसल्या बसल्या आडव्या झाल्या. मधला पडदा ओढून घेतला, आता तासभर दोघींचीही काही सुटका नव्हती. पण दोन बायका तासभर गप्प कितीवेळ बसणार?
सासूबाई एकदम हळू आवाजात म्हणाल्या,
“आमटी कर गं बाय आज पिवळी..”
वसुधाला काही ऐकू गेलं नाही, तिने काहीही प्रतिसाद दिला नाही बघताच सासूबाईंनी हातानेच तिला धक्का देत मोठ्याने सांगितलं..
बाहेर मुलांमध्ये सगळं ऐकू जात होतं. नवीन जागेचं मुलांनाही कुतूहल होतं, आत काही संवाद झाला की मुलं हसायची..याचाच फायदा घेत काळे मास्तरांनी आपल्या शैलीतून शिकवण्यास सुरवात केली..
“तर.आपण आताच न्यूटनच्या पहिल्या नियमाचं प्रात्यक्षिक पाहिलं.. काय आहे हा नियम? नियम असा आहे की एखाद्या वस्तूला आपण जोवर धक्का देत नाही तोवर ती जागची हलत नाही..
मुलांमध्ये एकच हशा पिकला..वसुधाला दिलेला धक्का बाहेरही ऐकू गेलेला.
“तुझे अप्पा येतीलच आता, आल्या आल्या जेवण मागतील.. ही घे डाळ, हा घे लसूण आणि पटापट आवर.. जर वेळेत झालं नाही तर लक्ष्यात ठेव.”.हातावर वस्तू ठेवत वसुधाला त्यांनी जवळजवळ ढकललंच तशी वसुधा पटापट हात चालवू लागली..
मुलं दबक्या आवाजात हसू लागली….
“तर तुम्ही पाहिलं.. न्यूटनचा दुसरा नियम..एखाद्या वस्तूमानावर बल लावले असता ते बदलती गती(acceleration) धारण करतं..”
मुलांना अगदी प्रात्यक्षिकासह व्याख्या समजत होत्या..
“वसुधे अगं डाळ नीट शिजू दे.. मागच्या वेळी अशीच केलेली तर कुणी खाल्ली नाही..जरा लक्ष देत जा ना स्वयंपाकात…इतके दिवस झाले अजून मनासारखी चव जमत नाही तुला..आईने काहीच शिकवलं नाही वाटतं. काय गं ए…”
सासूबाईंच्या तापट स्वभावाला आज चांगलाच जोर आलेला..
“आता न्यूटनचा तिसरा नियम..प्रत्येक दणक्याला विरुद्ध दिशेने तितकाच आणि तेवढाच दणका बसतो..” आईच्या या बोलण्याला वसुधा प्रतिउत्तर कधी देते याची सर्वजण वाट बघतात. वसुधा काहीही बोलत नाही..बराच वेळ होऊनही उत्तर येत नव्हतं..काळे मास्तर शेवटी मुलांना लिहायला लावून वर्ग सोडून देतात. मुलं बाहेर जाताच सासूबाई सुस्कारा टाकत बाहेरच्या खोलीत येतात. काळे मास्तर आत जातात, वसुधेच्या डोळ्यात पाणी असतं..ते वसुधेला म्हणतात.
“न्यूटनच्या नियमालाही मोडून काढायला चांगलं जमतं तुम्हा बायकांना…”