नकोसं सुख…

“काय सांगतेस?? तू खरंच आमच्या शहरात राहायला येतेस??”

“हो गं…योगायोगच म्हणायचा…. आमच्या ह्यांची बदली शहापूरलाच झाली…जिथे तू राहतेस..आणि आता कायमचं तिथेच सेटल व्हायचा विचार आहे..”

“होऊन जा खरंच… कॉलेज नंतर आपण भेटलोच नाही…आता नेहमी येणं जाणं चालू राहील…”

“हो ना..खरं तर आमच्या सोसायटीत कुणीही एकमेकाकडे जास्त जात नाहीत गं… सगळे आपापल्या कामात व्यस्त…घरात आम्ही नवरा बायको एकमेकांचे तोंड बघतो फक्त…”

“आता माझंही बघशील..बरं चल..ठेवते… पोचली की कळवते..”

मुग्धा शहापूर ला शिफ्ट होते, सगळं समान वगैरे लावून झाल्यावर गायत्री ला फोन करते..

“आज येऊ तुला भेटायला?”

“विचारतेस काय.कधीही ये..”

मुग्धा सर्व आवरून गायत्री कडे जाते. खूप दिवसांनी एकमेकींना भेटल्याने दोघी कडकडून मिठी मारतात..
दोघींमध्ये भरपूर गप्पा होतात…

“काय मग ..कसा चाललाय संसार….”

“चाललंय ..”

“तुझा सूर असा काय वाटतोय?काही प्रॉब्लेम आहे का?”

“नाही गं मुग्धा..”

“माझ्यापासून काहीही लपवू नकोस गायत्री..”

“काय सांगू तुला…कधी कधी असं होतं की माणसात सुख पेलण्याचीही सहनशीलता राहत नाही…”

“हे काय नवीनच..”

“मला माहित होतं तू चेष्टा करशील..”

“हे बघ, मला सविस्तर सांग..”

“लग्न करून आले…नवरा खूप प्रेमळ, प्रामाणिक आणि शांत… घरात कसलीही कमी पडली नाही, पैसा उरून पुरतो…बाहेर फिरणं, सिनेमा बघणं यात वेळ जातो …मला काम पडू नये म्हणून सगळ्या कामाला बाई..”

“मग कुठे घोडं अडलं?”

“याच सुखाचा वीट आलाय अगदी…सुखं ही सवयीचीच होऊन गेलीये, त्यामुळे त्याची किंमत राहिली नाही…आणि अश्या वेळी मन हे चलबिचल होतं… एवढं सगळं सुख असल्यावर जे समाधान जाणवायला हवं ते का जाणवत नाही काय माहित?”

मुग्धा ला तिची अडचण समजली….तिने निरोप घेतला..

“मुग्धा…येत जा गं आता…बोलून बरं वाटलं तुझ्याशी..”

“हो ..उद्याच येते..”

मेघना हसली…

“रोज आलीस तरी चालेल..”

दुसऱ्या दिवशी दरात मुग्धा परत हजर..

“बोलली होती ना मी?”

“हो गं माझी आई…ये…काय म्हणतेस, सामान लावून झालं?”

दोघींच्या गप्पा होतात… मुग्धा निरोप घेते..

“ये गं परत…”

तिसऱ्या दिवशी मुग्धा परत दारात हजर…

गायत्री ला जरा विचित्र वाटलं…हिने खरंच मनावर घेतलं की काय ?

त्या दिवशी गायत्री मुद्दाम मुग्धा ला ये परत असं म्हणत नाही..

चौथ्या दिवशी परत मुग्धा हजर..

पाचव्या दिवशी परत…

सहाव्या दिवशी परत…

गायत्री आता कंटाळली…पण तिला कसं सांगू हे? तिला कळायला नको का की हे असं रोज रोज जाणं चांगलं नाही म्हणून??

सातव्या दिवशी मात्र गायत्री ची सहनशक्ती सम्पली..

“मुग्धा अगं मान्य आहे की तू माझी मैत्रीण आहेस, पण म्हणून हे असं रोज रोज येणं शोभतं का??? तू पहिल्यांदा आलीस तेव्हा मला खूप आनंद झालेला…पण आता अगदी नको नको झालीयेस तू…सॉरी पण मी हे खरं बोलतेय..”

मुग्धा हसायला लागते..

“तुला वाईट नाही वाटलं?”

“अजिबात नाही, कारण मी हे मुद्दाम केलेलं..”

“काय?? अगं पण का?”

“आता हेच बघ ना, पहिल्यांदा आपण भेटलो तेव्हा किती खुश होतीस तू? पण मी रोज भेटायला यायला लागले तसतसा तुझा इंटेरेस्ट कमी होत गेला..आणि एक वेळ अशी आली की तुला मी अगदी नको नको झाली..”

“हो..मग?”

“तुझंही तेच झालंय…सुखाची जेव्हा चाहूल लागली तेव्हा तुला सुख मिळालं…पण ते रोज रोज मिळत असल्याने त्याचं ओझं होऊ लागलं…आणि तेही आज तुला नको नको झालंय…”

गायत्री ला समजतं…मुग्धा अगदी बरोबर बोलत होती..

“पण मग…म्हणून सुखाला नाकारू मी?”

“नाही…सुखाला नाकारू नकोस, आयुष्याचा विस्तार कर…संसार म्हणजे फक्त नवरा बायको असं नसतं.. त्यात समाजालाही सामावून घ्यायचं असतं… तुम्ही दोघे फक्त एकमेकांना वेळ देत आहात…तुम्हाला स्वतःची अशी काही स्पेसच नाही…म्हणजे तुम्ही ती तयार होऊच दिली नाही…दोघांनी एकमेकांत थोडासा गॅप ठेवा…वेळेचा… म्हणजे पुन्हा पुन्हा नव्याने एकेमकांच्या प्रेमात पडाल….बाहेर पडा… इतरांचे संसार बघा..नव्याने ओळखी करा..सामाजिक कार्यात सहभागी व्हा…दानधर्म करा…बघा..तुम्हाला जीवनाचा एक नवीन सूर गवसेल आणि सगळी सुखं असूनही जे समाधान मिळालं नाही ते मिळेल..”

1 thought on “नकोसं सुख…”

Leave a Comment