धुतल्या तांदळातील पोरं..

  

“माझी मुलं अगदी धुतल्या तांदळासारखी..” हे वाक्य सासूबाईंकडून ऐकलं आणि सई ला हसूच फुटलं. आपला नवरा आणि धाकल्या नणंद बाई काय गुणाचे आहेत हे फक्त सई लाच माहीत होतं.

सई ला फोटोग्राफी ची भारी आवड. हातात मोबाईल असला की तिचा कॅमेरा सुरूच असे..किचन मधला एखादा पदार्थ असो व बागेतील एखादं फूल, तिचा फोन उत्तम अश्या फोटोजनी भरला होता.

धाकल्या नणंद बाई शरयू, एकदा सई ने तिला एका मुलासोबत पाहिलं…घरी आल्यावर जाब विचारला तेव्हा सई ने उडवाउडवीची उत्तरं दिली. सई ला काळजी वाटू लागली तशी तिने शरयू वर नकळत पाळत ठेवली..शरयू बऱ्याचदा त्या मुलासोबत कॉलेज बुडवुन फिरायला जात असे…सासूबाईंना सांगितलं तर त्यांना धक्का बसेल, आणि त्या विश्वास ठेवतील की नाही हा एक मोठा प्रश्न..कारण त्यांचा मते त्यांची मुलं धुतल्या तांदळासारखी नाही का?


एक दिवस नवरा ऑफिस मधून उशिरा येणार म्हणून त्याने घरी कळवलं…सई ला माहीत होतं, की ऑफिस वगैरे काही नाही..मित्रांसोबत ओली पार्टी आहे…तो रात्री उशिरा घरी आला तेही झिंगतच…पुढच्या दाराने आलो तर सर्वांना शंका येईल म्हणून सई ला फोन करून मागचा दरवाजा हळूच उघडायला लावला…

“खोटं का बोलता हो तुम्ही? पार्टी होती तर सरळ सांगायचं ना.”

नवरा नशेत होता, काहीही बरळत होता..मधेच सई त्याला किती आवडते हे सांगत होता, तर मधेच मला बॉस बोलला म्हणून रडत होता…त्याचं अवसान पाहून सई ने त्याला झोपवलं…आणि ती विचार करत बसली..

“यांची वाईट रुपं मीच सहन करायची का? घरच्यांसमोर हा अगदी राम बनून राहणार, आणि वाईट कर्म मी भोगणार..”

एक दिवस सासुबाईंचं डोकं फिरलं आणि त्या सई ला काहीबाही बोलू लागल्या…

सई आशेने नवऱ्याकडे आणि नणंदेकडे पाहत होती, की निदान हे तरी आपली बाजू घेतील…पण झालं उलटंच, सई किती वाईट आहे आणि घरात अजिबात लक्ष देत नाही हा आरोप ती दोघे मनसोक्तपणे करीत होती..

सई ला वाईट वाटलं, आपण यांना इतकं समजून घेतलं आणि यांनी मलाच एकटं पाडलं.. स्वतः इतकी दुष्कर्म करून दुसऱ्यावर चिखल उडवताय..

सई ची सहनशक्ती संपली, ती म्हणाली,

“सासूबाई, इथे कुणीही परफेक्ट नाही..प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतातच, माझ्या चुका तर अगदी क्षुल्लक आहेत…तुम्हाला या दोघांची एकेक कर्तुत सांगितली तर…”

“माझ्या मुलांवर आरोप करतेस? माझी मुलं अगदी धुतल्या तांदळा सारखी…”


इतक्यात सासूबाईंना सोसायटीतल्या मंदिरात आरती साठी हाक आली आणि त्या रागरागात निघून गेल्या..

इकडे हे तिघे भांडू लागले…

“काय गं? काय पाप केलंय आम्ही? काय सांगणार होतीस तू??”

“सगळं. तुम्ही कसे दारू पिऊन येतात ते आणि ही शरयू कुणासोबत फिरते ते..”

“शरयू??”

नवरा रागारागाने शरयू कडे बघतो…

“वहिनी खोटं बोलतेय… जा..कर आरोप काय करायचे ते..आई अजिबात विश्वास ठेवणार नाही…”

सई ने आता रौद्ररूप धारण केलं…पटकन tv सुरू केला…तिचा मोबाईल tv सोबत कनेक्ट केला आणि एकेक व्हिडीओ सुरू केले…

त्यात नवरा झिंगत येताना, काहीही बरळतांनाचा व्हिडीओ होता…आणि शरयू चा त्या मुलासोबत फिरतानाचा व्हिडिओ…सई ने या दोघांची सगळी पापं प्रसंगावधान ठेऊन टिपली होती…

दोघेही चक्रावून व्हिडीओ बघत होते…नवऱ्याचा संताप झाला…त्याने सई चा मोबाईल घेऊन पटापट सगळं डिलीट केलं…

“कुठून कुठून डिलीट करणार? हे तर माझ्या लॅपटॉप मध्येही आहे..”

“कुठेय लॅपटॉप…”

“बेडरूम मध्ये…”


गुगल ड्राइव वर आहेत, 5 वेगवेगळ्या मेल आयडीवर… ते आयडी तुम्हाला माहीतही नाही…येउद्या आईंना, कळू दे, मुलं किती धुतल्या तांदळासारखी आहेत ते..

आता मात्र त्या दोघांना घाम फुटला..सई आपल्यावर भारी पडली हे त्यांनी मान्य केलं…

“पाया पडतो तुझ्या…प्लिज हे कुणाला दाखवू नकोस..”

“मी तर सोशल मीडिया वर सुद्धा टाकणार आहे..”

नवरा आता राडायचाच बाकी होता, आणि शरयू च्या धारा सुरूही झालेल्या…

इतक्यात सासुबाई आरती करून घरी येतात, आल्यावर पुन्हा सुरू..

“थांब, मी हिच्या आई वडिलांना बोलवून घेते आणि हिचे गाऱ्हाणे करते…”

“आई, काहीही काय…सई किती चांगली आहे..घरातलं सगळं करते, सर्वांना जीव लावते… तू उगाच तिच्यावर काहीही आरोप करू नकोस…”

“होना आई, वहिनी सारखी सून मिळाली तुला…नशीब समज…”

मागच्या पंधरा मिनिटात असं काय झालं की ही दोघे एकदम पलटुन गेली?

सासूबाई अजून या धक्क्यातुन सावरल्या नाही 🤣🤣🤣

2 thoughts on “धुतल्या तांदळातील पोरं..”

Leave a Comment