धडा

“उपकार समज तुला इतक्या मोठ्या घरात रहायला मिळतंय, नाहीतर कोणी केलं असतं तुझ्याशी लग्न?”

केतन उर्वशीला रागाने बोलत होता,
उर्वशी गरीब घराण्यातली, आणि केतन जरा बऱ्यापैकी परिस्थिती असलेला. अशातच संस्कारी मुलगी म्हणून उर्वशी ला केतन च्या आई वडिलांनी घरात आणलं…केतन च्या बोलण्यात सतत उर्वशीवर “उपकार” केलेत ही भावना असायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने आपण सांगू तसंच वागावं, आपण म्हटलं तेच करावं असं गाजवण्याचा केतन चा स्वभाव.
“घरात सोफ्याची जागा इथेच हवी, अमक्याच पोळ्या करायच्या, हे काम करायचं नाही, बाहेर भटकायचं नाही, चहा असाच टाकायचा…मी सांगेन तेव्हाच झोपायचं, मी सांगेन तेव्हाच उठायचं..” असं वागून वागून केतन ने उर्वशीच्या वागण्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं.
उर्वशी ला पर्याय नव्हता, गरीब घरातून आलेली, आई वडील श्रीमंत घरात मुलगी नांदतेय म्हणून खुश होते.
एकदा असंच उर्वशी ने पोह्यांचा मस्त चिवडा बनवला, शेजारची मनुताई सहज घरी आली, उर्वशी ने तिला तो चिवडा दिला आणि मनुताई ला तो इतका आवडला की तिने विकत 3 किलो मागितला…
“विकत कशाला, असंच घेऊन जा की…”
“अगं मला थोडा थोडका नकोय, जास्तच हवाय..मुलीकडे जाईल तेव्हा तिलाही न्यायचा आहे…”
शेवटी नाईलाजाने तिला तो विकत द्यायला लागला.
उर्वशी च्या हातात मनुताईने पैसे टेकवले…उर्वशीच्या डोळ्यात पाणी आलं. तिची पहिली कमाई होती ती.
पण कसं कोण जाणे, केतन ला हे समजलं…
अपेक्षेप्रमाणे त्याने उर्वशीला चांगलाच दम दिला, आणि उर्वशीने चिवडा करणंच बंद केलं..
केतन च्या ऑफिसात नवीन साहेब रुजू झाला होता.
त्याने सर्वांचं काम पाहिलं आणि एकेकाला त्याने चांगलंच फैलावर घेतलं..
केतन ची पाळी आली,
“तुमची सव्वाआठ ची वेळ असताना तुम्ही साडेआठ ला येताय?”
“साहेब ते कधी कधी बस…”
“आणि तुम्हाला जे काम दिलंय ते सोडून दुसरंच करताय तुम्ही…तुम्हाला wordpad मध्ये काम करायला सांगितलं आणि तुम्ही ms word मध्ये करताय…”
“साहेब ms word advance आहे…”
“मला शिकवू नकोस…नशीब समज इथे कामावर ठेवलंय तुला…उपकार केलेत तुझ्यावर… आता टिकून राहायचं असेल तर मी सांगेन तसंच वागावं लागेल…”
असं म्हणत बॉस ने केतन ला एकेक तासाचं वेळापत्रक तयार करून दिलं.. त्यानुसारच काम करायला केतन ला ऑर्डर दिली..त्यात तसूभरही चूक झाली तरी केतन चं काही खरं नव्हतं…
केतन ला हे सगळं खूप जड गेलं, त्याची स्वतःची कामाची एक पद्धत होती, पण साहेब त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अंकुश ठेवायला लागले…
केतन ला कुठेतरी यात स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागलं..बॉस जसा वागत होता तसाच तो उर्वशी ला वागवत होता…
बॉस च्या वागण्याचा केतन ला एका महिन्यातच खूप त्रास होऊ लागला..
“उर्वशी ने इतकी वर्ष कसं सहन केलं असेल मला? किती त्रास झाला असेल तिला??”
केतन ने बदलायचं ठरवलं…तो घरी गेला…
“उर्वशी, तुझ्यावर मी खूप हक्क गाजवला, तुझ्या मनाप्रमाणे तुला वागूच दिलं नाही पण आज मला जाणीव झालीये, काय त्रास होत असेल तुला…पण आता नाही…”
उर्वशी ला स्वातंत्र्य मिळालं, ती आता खऱ्या अर्थाने जगू लागली…

आणि मनुताई च्या भावानी, जो की केतन चा बॉस होता..त्याने मनुताई ला प्लॅन यशस्वी झाल्याची खूषखबरी दिली.

Leave a Comment