दुजाभाव

 

“तुला माहेरचेच लोकं प्रिय, सासरच्यांसाठी काही करायचं म्हटलं की नाक मुरडणार…” श्रीधर वैतागून रुचिता ला म्हणतो…

“अहो असं कसं बोलता तुम्ही? मला सगळे सारखेच आहेत..”

“माहितीये सगळं, तुझ्या आईच्या वाढदिवशी काही गिफ्ट वगैरे मध्ये पैसे घालवायचे नाही अजिबात, मागच्या वेळेस दिलं होतं ना आपण मग बस झालं…”

रुचिता दुःखी झाली, सर्वांना समान वागणूक देऊनही श्रीधर ने का असे आरोप लावावे?

 

एके दिवशी रुचिता आजारी पडली, तिला खूप अशक्तपणा आला, ती सासूबाईंना म्हटली आई आजच्या दिवस तुम्ही स्वयंपाक कराल का plz? मला उभं ही राहता येत नाहीये..”

“अगं मलाही बरं नाहीये, आआआ…पाय फार दुखताय, आणि डोकं…आई आई गं…” बळेच सोंग घेऊन सासू म्हणाली,

शेवटी रुचिता ने कसाबसा स्वयंपाक केला, नंतरचं सर्व आवरलं, काम खूप पुरलं, ती अजून तापाने फणफणली…

ती आजारी आहे याचं सासरी कोणालाही काही घेणं नव्हतं,एरवी सर्वांचं तीच करायची पण निदान आजारी असताना तरी थोडा आधार द्यावा ना सासरच्यांनी…तेही नाही, फक्त त्यांची कामं तेवढी झाली पाहिजे..

 

अशातच रक्षाबंधन आलं, रुचिता ला श्रीधर माहेरी सोडायला गेला.

तिच्या आई वडिलांनी दोघांना आत बोलावले, रुचिता चा चेहरा बघून आई वडील जवळ आले, आईने कपाळाला हात लावला,

“बेटा काय गं? इतकी आजारी आहेस? ताप कितीये तुला…”

“थांब मी लगेच डॉक्टर ला बोलावतो…”

“ताई चल तू तुझ्या खोलीत पड, मी चहा नाष्टा सगळं जागेवर आणून देतो तुला…”

सर्वांनी रुचिता ची आल्या आल्या काळजी केली..

दुसरीकडे श्रीधर चा पाहुनचारही मानाने चालू होता..

श्रीधर सर्व पाहत होता, त्याला हळूहळू फरक समजू लागला, तो जायला निघण्या आधी रुचिता ला निरोप द्यायला तिच्या खोलीत आला..

“रुचिता काळजी घे, मी येतो..”

“थांबा, तुम्ही म्हणत होता ना की मी सासर आणि माहेरात दुजाभाव करते? आत्ता जे झालं ते पाहून काय वाटतं तुम्हाला? मी आजारी आहे म्हणून सासरी तुम्ही मला कशी वागणूक दिलीत, आणि माझ्या माहेरी मला कशी वागणूक मिळाली? मग मला सांगा दुजाभाव मी करतेय की तुम्ही?

लग्न करून मी तुमच्याकडे आले, तुम्ही माझ्याकडे नाही आला…मी नवीन होते, मला सांभाळून घेण्याचं, मला सुरक्षित वाटू देण्याचं काम तुमचं होतं, पण काय केलंत तुम्ही? नेहमी माझ्या चुका काढत राहिले आणि चांगल्या कामाची कधी जाणीवही ठेवली नाही, तुमच्या कंपनीत जर कोणी नवीन माणूस आला तर तुम्ही असंच वागतात काय?

आणि हो, मी माणूस आहे, एखादं यंत्र नाही की ज्याला जश्या सूचना दिल्या तो तसाच वागेल, हाडा मांसाची जिवंत माणूस आहे मी जिला भावना आणि वेदनाही आहेत, आणि ज्या घरात 25 वर्ष काढली त्या घराला, त्या आई वडिलांना एका दिवसात विसरून त्यांचा विचार सोडून काल बनलेल्या सासू सासर्यांना सर्वस्व अर्पण करणं हे कितपत शक्य आहे? तरीही आम्ही मुली ते शक्य बनवतो, आणि जन्मदात्या आई वडिलांचा विचार लग्ना नंतर मुलीने केला तर काय असा गुन्हा असतो? तुम्ही आईच्या पोटातून जन्म घेतलाय तसा मीही घेतलाय, मी काही लग्न झाल्या झाल्या आभाळातून तुमच्या घरात नाही पडले, माझंही बालपण आहे, मलाही आपली माणसं आहेत,

आणि हे अत्यंत नैसर्गिक आहे की जिथे माणसाला प्रेम मिळतं तिथेच तो आकर्षिला जातो. जी माणसं किंमत करत नाही, आपल्याला समजून घेत नाही त्या माणसांबद्दल अपार प्रेम बाळगायला मी काही देव नाही…
तरीही तसं अनैसर्गिक वागण्याचा प्रयत्न जेव्हा मी केला तरीही शेवटी दोष मलाच मिळाला…यापूढे मी दुजाभाव करते असं म्हणायच्या आधी तुम्ही स्वतः कसे वागलात याचा विचार करत जा…”

श्रीधर ला चूक कळली, मान खाली घालून तो तिथून निघून गेला.

2 thoughts on “दुजाभाव”

Leave a Comment