राज्यातील सर्वात मोठी बिझनेस मिट पुणे शहरातील एका प्रख्यात हॉटेल मध्ये होणार होती. विविध उद्योगात यशस्वी झालेले, नवीन व्यवसाय सुरू केलेले किंवा व्यवसाय उभारणी साठी गुंतवणूक करणारे असे सर्वजण येणार होते…
या मंडळीत अर्ध्याहून अधिक महिला होत्या, शतक पुढे जातं तसं महिला सशक्तीकरणही यशस्वी होत होतं..हा इव्हेंट 2 दिवस होणार होता, आणि इव्हेंट ची सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती. राहायची सोय केली गेली होती. बहुतांश स्त्रिया पंचविशी च्या पुढील होत्या, काहींना लहान मुलंही असतील या उद्देशाने तिथे एक स्पेशल किड्स रूम बनवला होता, जिथे लहान मुलांना खेळायला सर्व साधनं होती आणि देखरेखीला 10 माणसं होती. भाषण चालू असताना मुलांचा आवाज नको यासाठी ही व्यवस्था होती…
अखेर इव्हेंट चा दिवस उजाडला…सफाई कामगारांपासून ते कंपनी च्या मालकीणी पर्यंत सर्व स्त्रिया प्रवेश करू लागल्या…
मिस सुजाता, गोल्डन फ्रेश च्या मालकीण…शुभ्र अश्या वन पीस मध्ये आपल्या BMW मधून उतरल्या, शेजारून एक सायकल वाला गेला आणि चिखलाचा हलकासा थेंब तिच्या ड्रेस वर उडाला…त्यांची चिडचिड झाली, सायकल वाल्यावर रोखून बडबड करत त्या आत गेल्या..सोबत त्यांचा 8 वर्षाची मुलगीही आली होती…
नंतर काही गृह उद्योग करणाऱ्या महिला आल्या, कॉटन च्या साडीत… मध्यमवर्गीय असा पोशाख असलेल्या त्या स्त्रिया आत आल्या..बऱ्याच जणींनी आपली मुलं सोबत घेतली होती…
मग काही तिशीतल्या तरुणी आल्या, छानसा पंजाबी ड्रेस आणि पार्लर मधून मेकअप करून आलेल्या त्या स्त्रिया होत्या…
मग हळूहळू स्वयंपाकीन बाया, सफाई काम करणाऱ्या स्त्रिया आपल्या मळकट वेशात आल्या…त्यांचीही मुलं सोबत होती..
आत गेल्यावर सर्वांना त्यांच्या मुलांना किड्स रूम मध्ये सोडायला लावलं, तिथली सुरक्षितता कशी आहे याची खात्री करून सर्व आयांनी आपल्या मुलांना तिथे सोडलं, मुलं तिथे रमली…
मग सर्व स्त्रिया आत गेल्या, मंचावर कार्यक्रम सुरू झाला..राज्यातील आघाडीचे व्यावसायिक मिस्टर देसले प्रमुख पाहुणे होते…त्यांनी बोलायला सुरुवात केली..
“तुम्ही सर्व व्यावसायिक आहात, आणि मला आनंद होतोय की तुमच्यापैकी बहुतांश वर्ग हा महिला वर्ग आहे…”
त्यांनी खोलीच्या बाहेर पाहिलं, सफाई कामगार आणि स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया बाहेर उभ्या होत्या…
“तुम्ही बाहेर काय उभ्या आहात, आत या…”
त्या लाजत आत आल्या …मिस सुजाता च्या पुढे एक सफाई करणारी स्त्री उभी राहिली, तिच्यामुळे सुजाता मॅडम ला स्टेजवरील काही दिसत नव्हतं…
“हॅलो…excuse me… जरा बाजूला होता का..”
2-3 वेळा सांगूनही ती स्त्री हलली नाही..अखेर तिच्या सोबत असलेल्या महिलेने तिला धरून बाजूला केलं..
“माफ करा मॅडम, तिला ऐकू येत नाही..”
सुजाता मॅडम ला आता स्टेजवरील सर्व दिसायला लागलं, पण शेजारी असलेल्या त्या मूकबधिर स्त्री च्या कपड्यांचा वास तिला सहन होईना.सुजाता मॅडम ने नाकाला रुमाल लावून कसाबसा वेळ काढला..
मिस्टर देसाई पुढे बोलू लागले..
“आपण सर्वजण व्यावसायिक आहात, आज मी तुम्हाला व्यवसाय यशस्वी करण्याचं एक सिक्रेट सांगतो…एक लक्षात ठेवा, या जगात सर्व गोष्टी बदलत असतात..आपणही बदल स्वीकारला पाहिजे…नुसतं व्यवसाय नाही, तर सगळंच बदलत असतं.. आता हेच बघा ना, विवाहसंस्था जाऊन आता हळूहळू लिव्ह इन चा प्रचार वाढतोय, पूर्वी स्त्रिया पतीला परमेश्वर समजत होत्या, पण आता तो चुकला तर त्याला कायद्याचा धाक दाखवायलाही त्या कचरत नाहीत…प्रेमाच्या व्याख्या बदलल्या आहेत…पूर्वी आई वाडीलांशिवाय घर पूर्ण होत नसे..आता मुलाच्या संसारात ढवळाढवळ नको म्हणून आई वडील स्वतःहून मुलाला वेगळं राहायला सांगताय…सगळीच नाती बदलत आहे यावर मी ठाम आहे…”
त्यांचं बोलणं चालू असतानाच मागून एक कुजबुज ऐकू आली…नंतर मोठ्याने ओरडा ऐकू आला..
“किड्स रूम ला आग लागली आहे…”
ते ऐकू येताच तेथील मुलांच्या आया सैरभैर धावत सुटल्या….हाय हिल्स घातलेल्या लेडीज सँडल तिथेच सोडून वेड्यासारख्या पळू लागल्या, गृहउद्योग करणाऱ्या स्त्रिया, सफाई कामगार… सर्वजणी तिकडे धाव घेऊ लागल्या…
मिस सुजाता जाणार तोच तिला ती मूकबधिर स्त्री एकटी दिसली, तिला काही कळेचना काय झालं आहे ते…इतका वेळ नाकाला रुमाल लावून बसलेल्या सुजाता मॅडम ने तिचा हात धरत तिला किड्स रूम मध्ये नेलं…
तिथे गेल्यावर पाहीलं तर सर्व मुलं आनंदात खेळत होती…आग स्टोर रूम ला लागली होती, पण कुणीतरी चुकीचं ऐकून अफवा उठवली…सर्व आयांनी निःश्वास सोडला आणि आपापल्या जागेवर जाऊन त्या बसल्या .
या गोंधळात मिस्टर देसाईंनी आपलं भाषण थांबवलं होतं ते पुन्हा सुरू केलं…
“तर…मी काही मिनिटांपूर्वी या मताशी ठाम होतो की सर्व नाती बदलतात, पण त्याला असलेला अपवाद मी आज पाहिला. जगाच्या उत्पत्तीपासून आई आणि लेकराचं जे नातं आहे, ते त्रिकालाबाधित आहे…सर्व नाती बदलतील, पण आईचं आपल्या लेकरवर असलेलं प्रेम कधीच बदलू शकत नाही…आज मला दिसलं, पर्स मध्ये हजारो रुपये असलेली स्त्री अन जवळ केवळ सुट्टे नाणे असलेली स्त्री मूल धोक्यात आहे हे समजताच त्याच वेगाने धावून गेली…तिथे लहान मोठा, श्रीमंत गरीब असा प्रश्न आलाच नाही…प्रत्येक स्त्री ला समोर केवळ आपलं मूल दिसत होतं… खरंच, मी या नात्याचं दर्शन आज याची देही याची डोळा पाहिलं….”
त्यांचं भाषण संपलं आणि सर्व महिलांनी डोळ्यात पाणी आणून जोरदार टाळ्या वाजवल्या..
खरंच, जगात सगळी नाती बदलतील, पण आईची माया कधीच बदलू शकत नाही, मग ती वन पीस घातलेली असो वा फाटकी साडी घातलेली…आई ती आईच..