“मुलीला बोलवा”
मुलाची आई म्हणाली. कोमल पुन्हा त्याच अवतारात यांत्रिकपणे समोर आली. तिची ही काही पहिली वेळ नव्हती, कित्येकदा तिला असं यावं लागलेलं. सुरवातीला थोडी भीती वाटायची तिला पण आता ती खरंच खूप कंटाळली होती.
मुलगा अभिनव, दिसायला इतका रुबाबदार होता की कोमलच्या वडिलांना पाहताक्षणी पसंत पडला. कोमलवर याचा यत्किंचितही परिणाम होणार नव्हता, कारण तिला समोर फक्त आपल्या वडिलांच्या डोक्यावर असलेलं कर्ज आणि बहिणीची जबाबदारी दिसत होती.
“मग, काय काय येतं तुला?”
“आमच्या कोमलला सगळं येतं, घरातली सगळी कामं येतात..” वडिलांनीच उत्तर दिलं..
“लग्नानंतर नोकरी वगैरे करणार का?”
“हो..” कोमलने एका शब्दात उत्तर दिलं..
“नोकरी करायची तशी गरज नाही, अभिनवला भरपूर पगार आहे..”
मुलाची आई असं बोलली अन तिला रागच आला, मोठ्या मुश्किलीने तिने वडिलांकडे बघत उत्तर द्यायचं टाळलं. मुलाची आई जरा विचित्रच वागत होती, खिडकीतून बघत असलेल्या बहिणींकडे तिची सारखी नजर जायची.
“तुझ्या बहिणी वाटतं..”
“हो..”
“काय वय आहे?”
शक्यतो विचारताना मुलींचं नाव, शिक्षण विचारतात, पण मुलाची आई त्या मुलींचं वय विचारत होती.
“एकीचं वय 18 आणि दुसरीचं चौदा..” वडिलांनी उत्तर दिलं..
अभिनवच्या चेहऱ्यावर काहीसे भीतीचे भाव होते, आईला तो सतत शांत बस अशी खूण करत होता.
“मुलाचे वडील कुठे असतात? ते नाही आले?”
वडिलांनी विचारले,
“ते…वडील..”
आई जरा गोंधळून गेली, अभिनव लगेच म्हणाला..
“मला वडील नाहीत, माझ्या लहानपणीच वारले..”
“अरे..माफ करा..कधी गेले ते? कोणत्या वर्षी?”
“1990”
“2015”
अभिनव आणि आईने वेगवेगळी उत्तरं दिली. सर्वांना आता शंका येऊ लागली, अभिनवने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला..
“वडील गेल्यापासून आईच्या मनावर परिणाम झालाय..तिला नीटसं काही आठवत नाही..”
कोमलच्या वडिलांना हे पटलं असलं तरी कोमल आणि तिच्या आईला संशय येऊ लागला. अभिनव आणि कोमलला बोलण्यासाठी बाहेर पाठवण्यात आलं.
“जॉबला कुठे आहेस?”
“पुण्याच्या एका आयटी कंपनीत..”
“किती पगार असतो?”
“मी फ्रेशर आहे त्यामुळे सध्या कमीच असतो, 20 हजार महिना देताय..”
“अच्छा..अमेरिकेत गेल्यावर तिकडे तिकडचं कल्चर accept करशील ना?”
“हो..पण पाच वर्ष इथेच राहायचं ते काही समजलं नाही मला..”
“हो, तिथे पाच वर्षात मला स्वतःची कंपनी टाकायची आहे, आई म्हणतेय की दुसरा जॉब बघ पण मला स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे..”
“पण मग मीही आले तर काय बिघडतं?”
“लग्न झालं म्हणजे जबाबदारी आली, मला निदान पाच वर्षे काहीही नकोय”
“मग पाच वर्षांनी लग्न केलं असतं ना?”
“हे बघा तुम्ही फार प्रश्न विचारताय, पाच वर्षांनी मला इथे यायला जमणारही नाही आणि वय झालेलं असल्याने कुणी मुलगी देणारही नाही..तुमचा होकार असेल तर कळवा नाहीतर याच गावातल्या दुसऱ्या मुलींची स्थळं आली आहेत मला..”
अतिशय उद्धटपणे अभिनवने कोमलशी चर्चा केली. कोमलला राग तर आलेला, पण तिला हे समजत नव्हतं की इतक्या मोठ्या हुद्द्यावर असलेला, देखणा, अमेरिकेत असलेला मुलगा अगदी कोपऱ्यातल्या गावातल्या मुली का बघतोय?
मनात असंख्य प्रश्न होते. कार्यक्रम झाला, मुलाकडच्यांनी मुलीच्या हातात पैसे ठेवले.. दोघांनी 2-2 हजारच्या नोटा ठेवल्या. सर्वजण बघतच राहिले. पाहुणे गेले अन घरात चर्चा सुरू झाली.
आई म्हणाली,
“मला जरा विचित्रच वाटताय ही लोकं..रावसाहेब कुणाच्या ओळखीतून आणलं हे स्थळ?”
“माझ्या मित्राच्या मित्राने सुचवलं, खरं तर मलाही यांची नीटशी ओळख नाही, तुम्ही स्वतः चौकशी करून मगच निर्णय घ्या..”
“चौकशी कुठे करणार? तिकडे अमेरिकेला? कोण आहे आपलं तिकडे? एक तर या मुलाचे नातेवाईक कोण हेही त्यांनी नीट सांगितलं नाही. आम्ही फार कधीचे अमेरिकेत आहोत त्यामुळे इथे जास्त संबंध नाहीत असे ते म्हणाले, मग इतक्या छोट्याशा गावातली मुलगी यांनी का पहावी? त्याला अमेरिकेतच किंवा मोठ्या शहरातली मुलगी कशीही मिळाली असती.” आईने शंका व्यक्त केली. पण वडील मात्र ठाम होते.
“हे बघ, त्यांनी 2 हजार रुपये हातात ठेवले म्हणजे किती श्रीमंत आहेत ते..आणि मुलगा म्हटला ना आईच्या दुःखाचा परिणाम तिच्यावर झालाय म्हणून..त्यामुळे तुम्हाला नको त्या शंका येताय मनात..कोमलला पाठवू आपण तिकडे, इथे राहिली तर आयुष्यभर आपलं पुरेल तिला. आधीच काही कमी केलेलं नाही तिने आपल्यासाठी..” मुलीच्या काळजीपोटी वडील म्हणाले..
घरात द्विधा मनस्थिती होती सर्वांची. आई, बहिणीला वाटायचं सूरज आपल्या कोमलचा नवरा असावा, आणि दुसरीकडे वडिलांना वाटे अभिनवसोबत कोमलचं लग्न व्हावं. कोमलला मात्र कुणाशीही लग्न चालणार होतं, ज्याच्याशी लग्न करून आपल्या घराकडे बघता येईल असा मुलगा हवा होता.
____
इकडे सूरजचं चित्त ठिकाणावर नव्हतं. त्याला सतत कोमलचा चेहरा समोर दिसत होता.
“पप्या, चल जरा एक झुरका मारून येऊ… मी येतो तुझ्याकडे..”
“तू कधीपासून ओढायला लागलास? मला नाही, तुझ्यासाठी..
माझं फिरणं होईल तेवढच..”
“आज स्वारीचं काहीतरी बिनसलं आहे वाटतं.. मुलगी पाहायला गेलेला ना?”
“ते सोड रे..मी येतोय..”
सूरज मनोमन कोमलला आपलं हृदय देऊन बसलेला पण त्याचं हट्टी मन ऐकायला तयार नव्हतं. थोडं फिरून आलं तर बरं वाटेल असा विचार त्याने केला. सुरजने गाडी काढली, परेशला मागे बसवलं आणि निघाले दोघेही.
सूरज गाडी चालवत होता आणि परेश त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडत होता. सूरज काहीही उत्तर देत नव्हता. कारण आपल्याला एखादी मुलगी आवडली हे सांगायला त्याला प्रचंड लाज वाटत होती.. रस्त्यावरुन जात असताना रस्त्याच्या बाजूला एक फुल विकणारी मुलगी होती, सुरजने तिच्याकडे पाहिलं आणि गाडी थांबवली..
“कोमल तू?”
“दादा हार घेता का, 10 रुपयाला एक..”
परेश गोंधळून गेला..
“अरे फुल विकणारी मुलगी आहे ती..चल पुढे..”
सुरजने गाडी पुढे घेतली, एका चहा टपरी पुढे गाडी थांबवली, दोघांनी चहा घेतला.
“20 रुपये झाले..”
परेश कडे सुट्टे नव्हते, सुरजने पाकीट काढलं..50 रुपयांची नोट दिली..आणि 20 रुपये परत घेतले..
“कोमल 10 रुपये अजून दे की परत..”
परेश पुरता खजील झाला, ती पैसे परत करणारी जाडजूड वयस्कर चहावली आ वासून पाहत राहिली, तिचा नवरा कमरेवर हात ठेवून डोळे वटारत सूरजकडे चालत आला आणि परेश सुरजला ओढत बाजूला घेऊज गेला..
“असुद्या असुद्या 10 रुपये..”
“सुऱ्या… आज आपण दोघे नक्की म्हसनात जाणार..तू बस मागे मी गाडी चालवतो..”
सूरज गाडीच्या मागे बसतो, पण मनातून कोमलचे विचार काही जात नाही..परेशला चिंता वाटते, या पोराला काय झालं असेल नक्की? मुलगी पाहायला गेला तेव्हा कुणी जादूटोणा तर नसेल केला याच्यावर?
गाडी चालवत असताना परेशला पाठीवर एकदम गुदगुल्या होऊ लागल्या, एखादी मुंगी असेल म्हणून परेश वाकडातिकडा झाला, पण हळूच दोन हात त्याच्या कमरेपाशी आले आणि त्याची कंबर आवळली गेली, कानात हळूच शब्द ऐकू आले..
“माझी कोमल…”
परेशने तणतणत गाडी थांबवली… त्याच्या कमरेपाशी गुंडाळले गेलेले हात झटकले आणि सूरजला मारायला खालून एक दगड उचलला..
“सुऱ्या…काय बुद्धी झाली तुला आज?”
“काय केलं मी?”
“काय केलं? मला असं पकडून ठेवलं जसं मी तुझी बायको आहे..”
सूरजची नजर भिरभिरते, तो एका बाकड्यावर मटकन बसून घेतो..त्याला काय होतंय त्यालाच समजत नसतं..दोन्ही हात डोक्याला लावून तो बसतो..परेशला सगळं समजतं, तो हळूच हसतो आणि सूरजच्या पाठीवर हात ठेवून म्हणतो..
“मित्रा, मान्य कर किंवा नको…हे प्रेम आहे…प्रेमात पडलाय तू मित्रा..”
“गपे पऱ्या..मी आणि प्रेमात? तुला तर माहितीये ना, कॉलेजमध्ये इतक्या मुली होत्या पण एकीकडेही वळून पाहिलं नव्हतं मी..”
“हो, कारण त्या मुलींमध्ये कोमल नव्हती, आपलं माणूस आपल्याला भेटलं ना की अशीच स्थिती होते..जशी तुझी झालीये.”
सुरजला क्षणात ते पटायचं आणि क्षणात तो त्याच्या मूळ रुपात यायचा..परेश गाडी काढतो, सुरजला मागे बसवून थेट त्याच्या घरी गाडी नेतो..सुरजचे आई वडील हॉल मध्ये बसलेले असतात..
“काका, मावशी अभिनंदन… मुलाला मुलगी पसंत आहे..”
आई हातातलं पुस्तक बाजूला ठेवते, वडील पेपर जमा करून सोफ्यावर ठेवतात, दोघांनाही धक्का बसतो..
“खरंच? चला, शेवटी इतक्या मुली पाहिल्यानंतर एक पसंत पडली म्हणायची..”
“अहो बाबा नाही. ते..”
“हो काका..मुलगी पसंत आहे, आता पटापट लग्नाचा बार उडवून द्या.”
“परेश अरे…”
“मी देवापुढे साखर ठेवते..”
“आई अगं..”
“काय आई, बाबा, परेश परेश चाललंय तुझं? काय बोलायचं आहे तुला?”
सूरज शांत झाला, नाही शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडेना…
क्रमशः
खूपच छान
Next part kadhi