तुही है आशिकी (भाग 21)

 

पातेलेभर खिचडी बघूनच दोघांचं पोट भरून गेलं. अण्णा पाटील हसत निघून गेले. सूरज आणि परेश दोघांनी एकेक प्लेट घेऊन खिचडी घेतली आणि जेवायला बसले. परेशने एक घास तोंडात टाकला आणि खिचडी बोटाने चाळू लागला..

 

“काय बघतोय?”

 

“बघतोय की खिचडीत काय टाकायचं राहिलंय?”

 

“सगळं तर टाकलंय..”

 

“मग अशी पांचट का लागतेय?”

 

“असुदे.. पोट भरतय ना, तेवढं पुरे..”

 

दोघांनी कशिबशी खिचडी खाल्ली, खूप उरली होती. दोघांनी झाकून ठेवली. रात्रीची वेळ झाली, सूरज खाटेवर झोपी गेला.. परेशने दोन तीन चादरी शोधल्या आणि उशाशी बॅग घेऊन झोपी गेला..

 

दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजताच त्यांना जाग आली. परेश उठला..

 

“सुऱ्या..प्रेशर आलंय.. टॉयलेट कुठेय..”

 

“दरवाजात जा, तिथून डावीकडे..”

 

परेश पळतच जातो आणि परत येतो..

 

“कुठेय रे? तिकडे शेत आहे सगळीकडे..”

 

“मग तिथेच बसायचं.”

 

“काय??”

 

“चल मी दाखवतो..”

 

सूरज रिकामे दोन रंगाचे डबे घेऊन त्यात शेजारच्या टाकीतून पाणी भरतो..दोघेही हातात डबडे घेऊन शेताच्या दिशेने चालू लागतात..

 

“पऱ्या तू त्या साईडला बस..मी या साईडला बसतो..”

 

दोघेही वेगवेगळ्या दिशेने बसतात…

 

“पाणी नेमकच वापर रे…तेवढंच आहे..नळ नाही इथे..”

 

“हो रे..” परेश कण्हत उत्तर देतो..

 

दोघांचं आवरलं जातं.. परेश तर ओकारी देत तिथून चालायला लागतो..सूरज त्याच्या मागोमाग येत असतो…

आल्यावर दोघेही चुलीवर पाणी गरम करतात आणि झोपडीच्या शेजारी असलेल्या दगडाजवळ अंघोळ करतात. अंघोळ झाल्यावर दोघेही आत येऊन बसतात..

 

“हुश्श..आत्ता कसं फ्रेश वाटतंय..”

 

“बरं नाश्त्याचं काय?”

 

दोघेही चुल पेटवून कालची खिचडी गरम करून खातात..

 

“आज जरा बरी लागतेय खिचडी..”

 

“होना..मुरली असेल..”

 

“लोणचं मुरतं तशी?”

 

“हो, maybe..”

 

“बरं पऱ्या..आता कामाला लागू…पुढे काय आणि कसं करायचं याची प्लॅनिंग करूया..”

 

दोघेही पुढचा प्लॅन ठरवत बसतात..

 

______

 

“बाबा तुम्ही खोटं का बोललात सूरजशी? त्या आजीची मुलं काही शेत बित विकत नाहीयेत… सुरजला देता आली असती ना ती जमीन?”

 

“बेटा तुला कसं सांगू आता..सूरज इथे आले तर गावातली लोकं काय म्हणतील? प्रतापचा जावई नोकरी सोडून शेती करायला आला, तेही त्याच्या होणाऱ्या बायकोच्या माहेरी..बरं दिसतं का ते?”

 

“पण बाबा शेती हे त्याच्या कंपनीचा एक भाग आहे, केवळ सहा महिन्यासाठी..”

 

“हो पण लोकांना नाही समजणार हे..”

 

“एक तर त्याला सवय नाही गावाकडची..कसा राहत असेल, काय  खात असेल देव जाणे..”

 

सुरजला जेव्हा कोमलकडून हे समजतं तेव्हा त्याला वाईट वाटतं, खरंच शेती करणं इतकं कमीपणाचं का वाटतं लोकांना? शेती करणारा मुलगा नको, शेतकऱ्याच्या घरात मुलगी नको..खरं तर शेतकऱ्याने किती अभिमानाने मिरवलं पाहिजे या देशात..

 

____

 

“मला अजून कळत नाहीये तुम्ही माझ्या मुलीचा पिच्छा का सोडत नाहीये? अहो लग्न ठरलंय तिचं..आणि मागच्या वेळी शेतीत आग लावायचा तुम्ही जो प्रकार केलाय ना त्याबद्दल पोलिसात रितसर तक्रार करणार आहे मी..”

 

“हे 30 लाख घ्या, कोमलचं माझ्याशी लग्न लावून द्या, आणि उरलेल्या 2 मुलींसाठी सुद्धा स्थळ शोधलीत मी..”

 

“निघ अभिनव इथून, नाहीतर मी गावाला जमा करेन..”

 

अभिनव कोमलच्या वडिलांना शेतात गाठून त्यांच्याशी सौदा करत असतो..

 

“तुमचं कर्ज कुठून फेडणार तुम्ही? तुमच्या मुलींच्या भल्याचंच सांगतोय मी..”

 

“निघतोस का?”

 

“ठीक आहे…तुमच्या तिन्ही मुली शहरात आहेत ना शिकायला? एक इंदिरा नगर आणि दुसरी महात्मा चौकात? पेपर मध्ये हल्ली फार विचित्र ऐकायला येतंय..”

 

“अभिनव..माझ्या मुलींच्या वाटेला जायचं नाही..”

 

“आता ते तुमच्या हातात आहे…चार दिवसात मला निर्णय कळवा..”

 

कोमलच्या वडिलांना दरदरून घाम फुटतो.. त्या दिवशी आत्महत्या करून जीव गेला असता तर बरं झालं असतं असं त्यांना वाटू लागतं..

 

क्रमशः

 

 

2 thoughts on “तुही है आशिकी (भाग 21)”

Leave a Comment