तुही है आशिकी (भाग 13)

 भाग 

 

कीर्तीच्या घरून सुरज आणि कोमल दोघेही निघतात, 

 

“सूरज मला घरी सोड आता..”

 

“नाही, आज आपण दिवसभर एकत्र घालवणार आहोत..”

 

“का रे?”

 

कोमलला माहीत असतं की आज valentines day आहे ते, आणि सूरज काय करतो हे तिला पाहायचं असतं. सूरज फक्त कार चालवत असतो, कुठे जायचं..काय करायचं, काय गिफ्ट द्यायचं काहीही त्याच्या डोक्यात नसतं.. तो आतून घाबरलेला असतो..कारण कोमलला माहीत असेल आज काय आहे आणि तिला वाटत असेल की मी तिला एखादं सरप्राइज देईन..पण कसलं काय..मी चक्क विसरलो त्या अभिनव आणि कीर्तीच्या गडबडीत…आणि आता ऐनवेळी काय करणार?

 

परेश त्याची बाईक घेऊन सुरजच्या गाडी मागे मागे भरधाव गाडी चालवत पाठलाग करत असतो..

 

“याररर…हा सुऱ्या विसरला आजचं.. आणि विसरला म्हणून तो मलाच धारेवर धरेल की मी आठवण करून दिली नाही म्हणून..यांचं प्रेमप्रकरण मी दत्तकच घेतलंय ना…सुरजला काहीही करून त्या हॉटेलवर न्यावं लागेल.. येड्याने फोन पण सायलेंट वर ठेवलाय..”

 

शेवटी परेश सुरजच्या कारहुन जास्त स्पीड घेतो आणि गाडीच्या समोर जाऊन गाडी आडवी उभी करतो. परेशने हेल्मेट घातलेलं असतं. सूरज एकदम ब्रेक दाबतो..

 

“ए मरायला माझीच गाडी भेटली का?” सूरज पटकन रिऍक्शन देतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की हा पऱ्या आहे..

 

“ए पऱ्या…काय रे?”

 

“सुऱ्या…अरे तिकडे यायला किती वेळ लावलास तू?”

 

“तिकडे….म्हणजे..”

 

“परेश खाणाखुणा करतो पण सुरजच्या लक्षात येत नाही.”

 

“Bro code भाई..bro code..”

 

“हां… हां.. हां..”

 

“चला माझ्यासोबत..”

 

परेश गाडीवर बसतो आणि सूरज, कोमल त्याच्या मागे मागे जातात..परेश एका हॉटेलसमोर गाडी थांबवतो. दोघांना आत नेतो.. तिथे एका टेबल वर छानशी सजावट केलेली असते. भिंतींवर हार्ट च्या आकाराचे लाल पांढरे फुगे लावलेले असतात, टेबलवर सुगंधित मेणबत्त्या लावलेल्या असतात..हे सगळं बघून सूरज म्हणतो..

 

“Wow.. what a pleasant surprise.”

 

कोमल सुरजकडे आश्चर्याने बघू लागते, परेश सुरजकडे डोळे वटारून बघतो.. सुरजच्या आता कुठे लक्षात येतं..

 

“अरे..What a surprise..असंच म्हणशील ना तू कोमल??”

 

“हो..खरंच खूप छान प्लॅन केलाय सूरज..”

 

सूरज कोमलकडे बघतो, मग परेशकडे बघतो…आणि मोठ्या अभिमानाने कोमलला सांगतो..

 

“हो मग…तुला काय वाटलं..मी विसरलो की काय..”

 

परेश कमरेवर हात ठेवून सुरजकडे बघतो.. कोमल त्याला विचारते..

 

“पण तू का आणलंस आम्हाला इकडे?”

 

“अगं ते..सुरजला पत्ता सापडत नव्हता ना..ऑनलाइन बुकिंग केलेलं त्याने..म्हणून..”

 

कोमलला सगळं लक्षात न येण्याइतकी ती ढ नव्हती..सगळं जाणून घेऊनही ती दोघांच्या चाललेल्या खटाटोपीकडे शांतपणे बघत होती. कोमल आणि सूरज दोघेही टेबलवर बसतात..सूरज एकदम बोलून जातो..

 

“परेश तुपण बस ना..”

 

परेश काहीही बोलत नाही, फक्त हात जोडतो आणि निघून जातो.आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यानंतर सूरज त्याचीच जीभ चावतो. कोमल या सगळ्या प्रकारात आपण अनभिज्ञ आहोत अशीच वागत होती, कारण सूरज आणि परेशच्या धडपडीत तिला व्यत्यय आणायचा नव्हता.

 

सूरज एक सुस्कारा टाकतो. वेटरला आवडीचे पदार्थ कोमलला ऑर्डर करायला लावतो. ऑर्डर येईपर्यंत कोमल सर्व सजावटीकडे कौतुकाने बघते. 

 

“सूरज..काल मला फार कसंतरी वाटलं, परेशने आपल्याला पाहिलं झाडाखाली..”

 

“मला तर काहीच नाही वाटलं बुवा..”

 

“का रे? तुझा मित्र आहे म्हणून?”

 

“नाही..मला काहीच वाटलं नाही कारण मी कुठे काय केलं होतं? तूच मागून येऊन मला मिठी मारली…मी आपला निरागसपणे शांत सभ्य माणसासारखा उभा होतो..”

 

कोमलला अजून गिल्टी वाटतं..

 

“कुठून सुचलं मला आणि तुला मागून…shitt..”

 

“असुदे गं.. नको काही वाटून घेऊ..हे बघ, ऑर्डर आलीये. कर सुरवात..”

 

दोघेही जेवणावर ताव मारतात..दुपार झालेली असते..एक तर आधीच पोटभर जेवण त्यात दुपारची वेळ, दोघांना सुस्ती येते. आता घरी जाऊन मस्त आराम करूया असं ते म्हणतात. पण कोमलच्या एकदम लक्षात येतं आणि ती विचारते..

 

“सूरज हे सरप्राइज ठीक आहे पण माझं गिफ्ट कुठेय?”

 

सुरजला धस्स होतं..एक तर तो कोमल साठी कुठलीही गोष्ट करायची सोडत नव्हता आणि शेवटी गिफ्ट राहूनच गेलेलं. 

 

“कोमल, so sorry… गडबडीत राहून गेलं..”

 

“बरं काही हरकत नाही, तू मला किती रुपयांचं गिफ्ट घेणार होता?”

 

कोमलच्या या प्रश्नाने सुरजला वाईट वाटतं. सगळ्या मुली पैशातच सगळं का मोजतात? ततरी कोमलने विचारलं म्हणून सुरजला सांगावं लागतं..

 

“पैशांचं काही नव्हतं गं.. वस्तू चांगली असती तर जेवढे पैसे लागले असते तेवढे मोजले असते..”

 

“तरी? जास्तीत जास्त किती?”

 

सुरजला राग येऊ लागतो पण त्याला आजच्या दिवशी वाद नको असतो..

 

“दहा हजार..”

 

“ठिके, मला दहा हजार दे..मी गिफ्ट मिळालं असं समजेन..”

 

सूरज पाकिटातून दहा हजार काढतो आणि कोमलच्या हातात देतो. कोमलला सुरजचे बदललेले हावभाव लक्षात येतात पण ती फक्त हसू लागते. सुरजला परेशचा मेसेज येतो..

 

“तुमचं आटोपलं की मला भेट, आपल्या नेहमीच्या जागेवर भेट, मी थांबलोय..”

 

कोमल आणि सूरज घरी जायला निघतात. कोमल सुरजला एका ठिकाणी जाण्याचा आग्रह करते, कुठे जायचं ते सांगत नाही पण फक्त आग्रह करत असते. सूरजला अजिबात ईच्छा नसते पण नाईलाज असतो. 

 

कोमल एका वृद्धाश्रमाजवळ गाडी थांबवायला लावते..सुरजला कळेना ही काय करतेय.. दोघेही आत जातात. तिथे आजाराने खंगलेले, काही मनाने खंगलेले असे वृद्ध मंडळी होते..घरच्यांनी टाकून दिलेलं असलं तरी या आश्रमाने त्यांची खूप काळजी घेतली होती.त्यांना कधीही एकटेपणा वाटू दिला नाही.

 

कोमल सर्वांना भेटते, त्यांना बघून सुरजला खूप वाईट वाटतं. सूरज खूप हळवा आहे हे कोमल जाणून होती, अजून काही वेळ थांबले असते तर सूरज तिथेच रडू लागला असता म्हणून कोमल पटकन आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेली आणि सुरजने दिलेले दहा हजार रुपये आणि त्यात स्वतःचे पाच हजार रुपये टाकून त्यांना देणगी म्हणून देऊन टाकले. सूरज चकितच झाला. त्याच्या लक्षात आलं की कोमलने यासाठी पैसे मागितले होते. त्याचा मूड एकदम बदलून जातो..

 

बाहेर आल्यावर तो कोमलला म्हणतो..

 

“तू यासाठी पैसे मागितले हे मला खरंच माहीत नव्हतं, मी उगाच गैरसमज करून घेतला होता..सॉरी..”

 

“अरे सॉरी काय..आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू आणि मी एकत्र आलो म्हणजे केवळ आपल्या कुटुंबाच्या कामी यायला हवं असं नाही..आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, आपलं एकत्र येणं हे समाजासाठी सुद्धा कारणी लागायला हवं.. केवळ एकमेकांना खुश करून काय मिळणार? खरा आनंद तो असेल जेव्हा आपली एकी समाजाला काहीतरी मिळवून देईल..”

 

कोमलच्या या दिव्य विचारांनी सूरज तिच्या अजूनच प्रेमात पडला नसेल तर नवलच..

 

सूरज कोमलला घरी सोडतो आणि परेशला भेटायला त्यांच्या नेहमीच्या जागेवर जातो. परेश समोर उभा असतो, सूरज गाडी थांबवतो, गाडीतून काही पार्सल काढून परेशच्या हातात ठेवतो..

 

“हे काय आहे?”

 

सूरज परेशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो..

 

“मित्रा…माझ्यासाठी एवढं सगळं करतोस आणि स्वतः उपाशी राहतोस? तुला काय वाटलं..माझा मित्र उपाशी असताना मी तिकडे जेवणावर ताव मारेल? घे..दोन घास खाऊन घे…”

 

परेश खरंच उपाशी होता, सुरजचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी येतं.. आपला मित्र कितीही नालायक असला तरी मैत्रीची जाणीव आहे त्याला…

 

परेश खायला सुरवात करतो…सुरजचा कोमलला फोन येतो..

 

“घरी पोचलास?”

 

“नाही, परेशला भेटायला आलोय..जाईल घरी थोड्या वेळाने..”

 

“बरं हॉटेलमध्ये आपलं बरंच जेवण उरलं होतं..खूप पदार्थ उरले होते..त्याचं पार्सल म्हणून तू सोबत घेतलंस..काय केलं त्याचं??”

 

सूरज मागे वळून बघतो, परेश लांब आहे याची खात्री होताच म्हणतो..

 

“अन्न वाया घालवायचं नसतं… दिलंय मी वाटून गरीब दुबळ्याला..”

 

क्रमशः

 

 

4 thoughts on “तुही है आशिकी (भाग 13)”

Leave a Comment