भाग 1
https://www.irablogging.in/2020/07/1.html
आशिष चं वागणं एकदम बदलून जातं.. कालपर्यंत जो प्रेमळ, काळजी करणारा नवरा होता तो आज एकदम बदलून गेला..स्वराकडे सपशेल दुर्लक्ष करू लागला आणि कायम त्याच्याच विचारात गढून राहू लागला.
एके दिवशी आशिष सोफ्यावर tv समोर बसला होता…छोटी खुशी त्याचाजवळ जाऊन बसली, पप्पांचं लक्ष नाही पाहून त्यांचा मांडीवर जाऊन बसली.
“बाजूला बस गं… मोकळं सोड मला जरा..”
आशिषने चिडून तिला बाजूला केले…आशिष पहिल्यांदा असा वागला होता, खुशी हिरमुसून निघून जाते. स्वरा हे सगळं बघते आणि तिचा संयम सुटतो. स्वतःच्या बाबतीत हा असं वागतो ते सहन केलं मी पण खुशी च्या बाबतीत असं झालेलं तिला सहन झालं नाही…
“आशिष…काय चाललंय तुमचं?? माझ्याशी असं तुटक वागताय ते खपवून घेतलं पण खुशी सोबत असं वागायचं काय कारण? ईशिका च्या येण्याने तुमच्यात असा काही बदल झालाय ना, आता जे काही असेल ते मला स्पष्ट सांगा…”
स्वरा चा ताबा सुटलेला असतो, सासू सासरे देवळात गेलेले असल्याने निदान त्यांना याची खबर लागली नाही. स्वरा च्या या बोलण्याने आशिष भानावर आला, आपण असं का वागतोय हे त्याचं त्यालाच कळलं नाही…तो काहीही न बोलता मौन बाळगून होता..स्वरा चिडली, शांत झाली, काही वेळ रडली…पण आशिष फक्त मौन बाळगून होता.एरवी स्वरा च्या डोळ्यात एकही अश्रू न येऊ देणारा आशिष आज तिला खुशाल रडू देत होता.
स्वरा ला एकावर एक असे धक्के मिळत होते…अखेर तिने डोळे पुसले…आशिष जवळ गेली, त्याच्या गालावर हात ठेवले…आणि जिवाच्या आकांताने आशिष ला विचारलं…
“आशिष काय चुकलं माझं सांग..कुठे कमी पडले मी बायको म्हणून? काय कमी राहिली माझ्या प्रेमात? सांग…”
आशिष स्वरा च्या डोळ्यात बघतो…तिची निरागसता बघून त्याला वाईट वाटतं… खरंच काय चुकलं होतं तिचं?
“स्वरा…माफ कर, मला तुला दुखवायचा हेतू नव्हता…पण ईशिका…”
“ईशिका…तिचं काय..”
“मी स्पष्टच सांगतो…आम्ही लहानपणापासून एकत्र…मैत्रीतून प्रेम कधी झालं हे समजलच नाही…ती दुसऱ्या देशात निघून गेली आणि आत्ता परत आली..”
“तुम्ही प्रेमाची कबुली दिली नव्हती?”
“मी प्रयत्न केला होता, पण हिम्मत झालीच नाही माझी…आणि ती तिकडे गेल्यावर मला वाटलं की तिच्या मनात माझ्याबद्दल काहीही नसेल, नाहीतर तिने माझ्याशी संपर्क केला असता..”.
“मग आज असं का वाटलं तुम्हाला की तिचं तुमच्यावर प्रेम होतं?”
“तू पाहिलस ना? ती घरी आली होती, आणि माझं लग्न झालंय हे समजल्यावर तडकाफडकी निघून गेली..”
“बरं… पण आता आपलं लग्न झालंय, आपल्याला एक मुलगी आहे…अश्या परिस्थितीत काय करणार तुम्ही? “
आशिष रागाने तिला बोलतो…
“बोललीस ना टिपिकल बायको सारखी…”
“यात काय टिपिकल बायको सारखं?? कुठली बायको आपल्या नवऱ्याचं दुसरीवर दिसत असलेलं प्रेम डोळ्यासमोर बघू शकेल??”
“तुला आमचं प्रेम समजणारच नाही…”
असं म्हणत आशिष तिथून निघून जातो…
इथे स्वरा डोळ्यात पाणी आणून स्वतःशीच बोलते..
“मला प्रेम समजणार नाही??? मला?? …आयुष्यात कुठल्याही मुलासोबत नाव जोडलं गेलं नाही, लग्न करून नवऱ्यालाच आपलं सर्वस्व मानलं..खरच मला प्रेम समजत नाही…. लग्न करून फक्त आशिषवरच नाही, त्याच्या आई वडिलांवर जीव ओवाळून टाकला…खरंच मला प्रेम समजत नाही…या घरासाठी माझं करियर ला तिलांजली दिली…खरंच मला प्रेम समजत नाही…”
स्वरा तिच्या खोलीत येते..खुशी ला कडेवर घेते आणि तिला कुरवाळते..तिचे मुके घेते..आरशात स्वतःला बघून ती खंबीर होते आणि आता यापुढे मिळमिळीत न राहता खंबीरपणे सामोरं जायचं असं ठरवते…
सासू सासरे देवळातून येतात, आल्या आल्या स्वरा त्यांना सांगते..
“आई मी काय म्हणते, ईशिका आलीच आहे तर तिला जेवायला बोलवूया संध्याकाळी….मी आज छान बेत करते…”
“चालेल की..उत्तम कल्पना आहे..आशिष, ईशिका ला फोन करून दे ..”
आशिष चक्रावला… स्वरा ने असं का वागावं? काय आहे तिच्या मनात?
स्वरा आता खंबीर झाली होती…आयुष्यात आलेलं वादळ पेलायचं तिने ठरवलं होतं…त्याला आपल्या पद्धतीने शमवायचं तिने ठरवलं. तिने हवं तर आई बाबा, सासू सासरे यांना सांगून सगळी पोलखोल केली असती…पण यातून काय साध्य झालं असतं?? घरात ज्येष्ठ व्यक्ती आहेत, एक कुटुंब आहे, लहान मूल आहे…या सर्वांना तिला सांभाळायचं होतं… संसार पुन्हा रुळावर आणायचा होता… एक जबाबदार व्यक्ती म्हणून तिला सगळं सावरायचं होतं… या सगळ्यात तिला असंख्य वेदना, हृदयावर अनेक घाव सहन करावे लागणार होते…पण संसार पेलून धरण्यासाठी ती आता रणरागिणी बनली होती..
ईशिका ला आशिष ने फोन लावला..
“हॅलो..”
“Hmm..”
“बोलायचं नाही का?”
“काय बोलू मी आता, सगळं संपवलं तू..”
“संपवायला सुरवात तरी झाली होती का?”
“का फोन केलास?”
“संध्याकाळी घरी ये…जेवायला.. स्वरा ने सांगितलंय..”
“माझ्याकडून तिला तुझी बायको म्हणून बघवणार नाही..”
खूप आढेवेढे घेत अखेर ईशिका तयार झाली…
क्रमशः