त्याला उत्तर देताच आलं नाही. कारण अश्या तात्विक गोष्टींवर कधी खोलवर विचार केलाच गेला नाही. एक काळ होता जेव्हा तरुण पिढी आदर्शांच्या मागे वेडी होती, तत्ववादी होती. नकुल ला सगळी उत्तरं देता आली पण या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याची सल त्याचा मनात होतीच.
आता काहीही झालं तरी आपला आदर्श आपण शोधायचा असं त्याने ठरवलं. बराच शोध झाला, प्रत्येक आदर्शल चांगली आणि वाईट अश्या दोन्ही बाजू होत्या. नकुल ला काही आपला आदर्श गवसला नाही.
नकुल घरी गेला, आईने विचारलं की तेवढं दळण करून आणतोस का बेटा? तो वैतागलेला होता, त्याने सरळ नाही सांगितलं. आईने थोड्या वेळात त्याला गरम गरम नाष्टा दिला. आईने आज संपूर्ण घर आवरायला काढलेलं, एकटीच सगळं आवरत होती, त्यात तिचं शिवणकाम चालूच होतं, मधेच पाहुणे यायचे, त्यांचा पाहुणचार, एका वेळी किती कामं..बाबा पाहुण्यांना घेऊन आले, घरातलं शांत आणि पवित्र वातावरण पाहून पाहुण्यांनी कौतुक केलं..बाबा म्हणाले “हो शिस्तच अशी लावलीये मी…”
खरं तर आईच्या घर राखण्यामुळे घराला घरपण आलेलं, पण बाबांच्या हो ला हो लावून आईने बाबांनाच क्रेडिट दिलं.
एक दिवशी हताश होऊन नकुल ने आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारला,
“आदर्श म्हणजे नेमकं काय हो? आदर्श कसा असावा?”
त्यांनी सांगितलं,
“आदर्श निरपेक्ष असावा, कुठलीही अपेक्षा न करता आपलं कर्तव्य बजावणारा असावा. त्याला प्रसिद्धीची हाव नसावी, तो कष्टाळू असावा आणि सतत कार्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणारा असावा…”
नकुल ला दुसऱ्या क्षणाला त्याचा आदर्श डोळ्यासमोर आला..
पुढच्या खेपेला external ने विचारण्याआधी त्याने सांगितले,
“माझा आदर्श मला मिळाला…निरपेक्ष, कष्टाळू आणि कार्यशील…अशी माझी आई…”
जगातील सर्व प्रसिद्ध व्यक्तिंना डावलून त्याने आपल्या आईला आपल्या आदर्शस्थानी विराजमान केलं.
____