ती ‘वेगळी’ राहते

काळ जसा पुढे जातोय तसतसं माणूस जुन्या अनेक पद्धतींना फाटा देत जातोय. त्यातलीच एक म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती. एक काळ होता जेव्हा अनेक लोक एकत्र विनातक्रार राहत असत. तसे संस्कारही कुटुंबावर होत असायचे. त्याग, समर्पण, जिव्हाळा या गोष्टी शिकवाव्या लागत नसत, आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांना पुरेपूर आदर दिला जाई.

नंतर समाजव्यवस्था बदलली, माणूस दुसऱ्याला आपल्या वर्चस्वाखाली ठेवायला बघू लागला..सासुरवास सुरू झाला आणि इथेच एकत्र कुटुंब पद्धतीला फाटे फुटू लागले..

जर समाजात असलेल्या कुटुंबाचं निरीक्षण केलं तर एक लक्षात येईल, की एकत्र कुटुंबपद्धतीच्या ऱ्हासाला केवळ घरातल्या ‘सुनेला’ जबाबदार ठरवण्यात येतं… पण असा एक अनुभव आला की याला नेमकं कोण जबाबदार याचं याचं उत्तर सापडलं…

स्नेहा माझी लांबची बहीण, एकत्र कुटुंबात लग्न झालेली. तिच्याकडे एकदा जायचा प्रसंग आला..गेल्या गेल्या मी तिला मिठी मारली…पण ती आता आधीसारखी राहिली नव्हती…काळजीत दिसत होती.. तिला कारण विचारलं तर म्हणाली..

“अगं खूप कामं आहेत, जरा इकडे तिकडे झालं की सासूबाईं बडबड सुरू करतात..”

“बरं बाई, कामं आवरून घे तुझी..मग बोलू आपण..”


ती आवरायला गेली अन सासूबाईंनी मला पाहिलं, माझ्याशी अगदी गोड बोलल्या, प्रेमाने विचारपूस केली…

मनात म्हटलं उगाच ही स्नेहा तक्रार करते…किती प्रेमळ सासू आहे…इतक्यात त्यांनी स्नेहा ला आवाज दिला..

“स्नेहा, वर कपडे वाळत घातलेत…जा पाहून ये…”

त्यांचा बोलण्याचा सूर एकदम बदलला होता..जणू घरातल्या एखाद्या नोकराला त्या बोलताय..

इतक्यात ताईची नणंद आली..

“Hi… कशी आहेस??”

“मी मस्त..”

” बरं आई मी बाहेर जातेय..”

इतक्यात स्नेहा येते…”ताई गाडी लागत होती मला..”

“तुला कशाला लागतेय आता??”

“बँकेत चेक टाकायचा आहे, शेवटची तारीख आहे..”

“नंतर कर…सुशीला जा तू गाडी घेऊन..”

नणंद बाई गाडी घेऊन जातात…

इतक्यात ताईचा दिर येतो…

“आई माझं पाकीट पाहिलं का?”

“त्या टेबल वर असेल बघ..”

तो तिकडे जातो अन टेबल वर बघतो…तिथे ताईच्या काही वस्तू ठेवलेल्या असतात..पाकीट सापडत नाही म्हणून तो रागरागात त्या वस्तू भिरकावून देतो…

“अरे काय मोहित हे…आमचा भैय्या पण ना…वस्तू सापडली नाही की घर डोक्यावर घेतो..”

त्यांच्या बोलण्यात तक्रार कमी अन कौतुक जास्त वाटत होतं… त्यांनी चटकन उठून त्या वस्तू उचलल्या आणि टेबल वर परत ठेऊन दिल्या..ताईच्या वस्तू मात्र तश्याच खाली पडू दिल्या… ताई आली अन तीने पाहिलं… काहीही न बोलता चुपचाप वस्तू जागेवर ठेवून दिल्या…

माझा प्रचंड संताप झालेला…पण मौन बाळगणं मी योग्य मानलं…

मनात विचार आला, की ताई एकत्र कुटुंबात राहतेय म्हणून तिने सर्वांची कामं आपली समजून पूर्ण करावी…सर्वांचा स्वयंपाक करावा , सर्वांच्या खोलीची साफसफाई करावी, कुठलीही गोष्ट असुदे, ती सर्वांसाठी करावी अशी अपेक्षा…मग तिच्या बाबतीत ही लोकं तशी का वागत नाही?? तिच्या वस्तू भिरकावून देऊन, तिच्या वैयक्तिक कामांना महत्व न देऊन ही लोकं एकत्र राहूनही सुनेला मात्र वेगळं ठेवतात…मग प्रश्न पडतो, की एकत्र कुटुंबाचा अट्टहास करणारे स्वतः एकत्र कुटुंबासाठी किती योगदान देतात?? की आलेल्या सुनेने फक्त सर्वांना आपलं मानायचं, आणि तिला मात्र आम्ही स्वतःपासून कायम वेगळं ठेवणार…मग आपल्याला असं वेगळी वागणूक देण्यात येत असेल तर तिला काय जिव्हाळा राहील त्या कुटूंबाबद्दल?? उद्या तिने वेगळं राहण्यासाठी विचारलं तर यात दोष कुणाचा??

एकत्र कुटुंब पद्धती टिकवायची असेल तर प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाले पाहिजेत…केवळ एका व्यक्तीला दोषी धरून तिच्यावर खापर फोडणे हा दृष्टीकोन आता बदलायला हवा..

(एकत्र कुटुंब पद्धतीची एक हृदयस्पर्शी कथा नुकतीच मी लिहिली आहे, गूगल वर “Sanjana Ingale blogs samrajya” टाकून तुम्हाला ती सहज मिळेल.

8 thoughts on “ती ‘वेगळी’ राहते”

Leave a Comment