डॉक्टर शिल्पा दवाखान्यात व्यस्त होती तर तिचे मिस्टर रोशन हे पोलीसांच्या वर्दीत राहून आपलं कर्तव्य निभावत होते.
“वहिनी, मेडिकल सायन्स सगळ्या आजारावर उपचार का करू शकत नाही?”
अक्षरा च्या या अनपेक्षित प्रश्नाने शिल्पाला आश्चर्य वाटलं…पण काहीतरी उत्तर तर द्यायचंच होतं..
“माणसाच्या शरीरातील काही घटक इतके गुंतागुंतीचे असतात की त्यावर मेडिकल सायन्स काहीही करू शकत नाही…”
अक्षरा चा चेहरा एकदम पडला…
शिल्पा बरेच दिवस अक्षरा ला बघत होती, गेले काही दिवस अक्षरा ची मनस्थिती काही ठीक दिसत नव्हती…शिल्पा च्या ते लक्षात आलं…एक दिवस ठरवून शिल्पा ने अक्षरा ला विचारलं…
“अक्षरा…काय झालंय नक्की? गेले काही दिवस खूप उदास दिसतेय तू…”
“काही नाही..”
“जे असेल ते स्पष्ट सांग मला..”
हे ऐकताच अक्षरा रडू लागली…
“अक्षरा??? अगं इतकं असं काय झालंय??”
“वहिनी, सागर ला कॅन्सर चं निदान झालंय…”
“काय?? कधी?”
“कालच कळलं…”
शिल्पा ते ऐकून हैराण होते…कॅन्सर म्हटलं की सगळंच संपतं…
“वहिनी, तू डॉक्टर आहेस ना…कर ना काहीतरी… प्लिज..”
अक्षरा अक्षरशः गयावया करत होती. शिल्पा ला ते पहावले नाही…
“उद्या सागरला माझ्यासोबत क्लिनिक मध्ये घेऊन ये…”
अक्षरा दुसऱ्या दिवशी सागर ला घेऊन वहिनी च्या क्लिनिक मध्ये जाते… सागर ने सगळी रिपोर्ट्स सोबत आणलेली असतात…
शिल्पा समोर तो येतो आणि शिल्पा त्याला बघतच राहते, अक्षरा ला शोभेल असा राजकुमार होता तो…पण, कुणाला माहीत की या राजकुमाराचं आयुष्य फार थोडं उरलं आहे ते??
शिल्पा सागरची तपासणी करते, त्याचे रिपोर्ट्स बघते…ती दोघांना बाहेर पाठवते, ज्या हॉस्पिटलमध्ये सागर ची ट्रीटमेंट सुरू होती तिथे फोन लावते…त्यांच्यात काहीतरी बोलणं होतं… शिल्पा बराच वेळ काहीतरी विचार करते…आणि दोघांना आत बोलवते…
“काय रिकामा ताप दिलास रे सागर सर्वांना… हे रिपोर्ट्स खोटे आहेत…काही कॅन्सर वगैरे नाही तुला..”
“काय??? तुम्ही खोटं बोलताय…उगाच माझी समजूत घालण्यासाठी…”
“हे बघ..तुझ्या हॉस्पिटलमध्ये मी फोन केला होता…बोलणं झालं आमचं..त्यांनी चुकून असे रिपोर्ट्स दिलेत.”
“कसं शक्य आहे?”
“अरे होतं असं…मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतका व्याप असतो की इकडचं तिकडे होउ शकतं..”
सागर आनंदाने वेडा होतो…अक्षरा शिल्पा ला मिठी मारते…
“वहिनी…थँक्स गं… तुला माहीत नाही तू किती महत्वाचं काम केलंस माझ्यासाठी ते..मनावरचं ओझं एकदम कमी झालं बघ….”
“उगाच टेन्शन घेत होतीस तू…आणि हो सागर, तुझ्या घरी कळव बरं आधी..”
सागर घरी कळवतो…
“हे बघ सागर, जरी तुला कॅन्सर नसला तरी तुला चेकिंग साठी दर महिन्याला माझ्याकडे यावं लागेल…”
“कशासाठी??” इतका वेळ आनंदी असलेल्या सागर च्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली…
“घुसलं पुन्हा डोक्यात?? अरे तुझंच नाही, या अक्षरा चं सुद्धा दर महिन्याला मेडिकल चेकप करते मी…रेग्युलर चेकप असतं… चांगल्या हेल्थ साठी…”
“अच्छा…मग ठीक आहे..”
अक्षराची गाडी आता पुन्हा रुळावर आली, ती पुन्हा खुश राहू लागली…शिल्पा ला बरं वाटलं…पण…. सत्य बदलणार नव्हतं, शिल्पा कडून फक्त एक शेवटचा प्रयत्न होणार होता…असो…
इकडे आकाश ची धावपळ सुरू होती, लोकांना भुलवून आणि त्यांना मारून टाकून त्यांचे अवयव विक्रीस नेणाऱ्या गॅंग ने हैदोस मांडला होता. आकाश कडे ती केस होती आणि आकाश दिवसरात्र त्यामागे काम करत होता.
त्याच्या हाती काही महत्वाच्या गोष्टी लागलेल्या, गरीब नोकरदार व्यक्तींना उपचार करतो म्हणून काही माणसं हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतात आणि त्यांना मारून त्यांचे अवयव काढून घेतात हे त्याला समजलं होतं. अश्या खालच्या स्तरावरील लोकांना शंका येण्याचं काम नव्हतं, त्यामुळे या गुन्हेगाराचं चांगलच फावत होतं.
एक दिवस शिल्पा कडे एक वकील स्त्री आपल्या मोलकरणी ला घेऊन आली आणि सांगितलं की हिला शुगर चा त्रास आहे, ट्रीटमेंट करायची आहे. शिल्पा ने रिपोर्ट मागितले तेव्हा ती म्हणाली की तिच्या झोपडपट्टीत काही डॉकटर आले होते त्यांनी सांगितलं….
शिल्पा ला नवल वाटलं, कुठल्याही टेस्ट शिवाय शुगर चं निदान कसं केलं? तिने पुन्हा एकदा तिची टेस्ट करायला सांगितली…
घरी आल्यानंतर आकाश ने शिल्पा ला त्याच्या केस बद्दल कळवलं…आकाश ची केस आणि शिल्पा कडे आज आलेली पेशंट यात बरेच धागेदोरे मिळणार होते..
क्रमशः
1 thought on “डॉक्टर cool (भाग 3)”