डिलिव्हरी बॉय

 

डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन घर शोधत होता…बराच वेळ होऊनही घर सापडलं नाही मग अखेर त्याने दिलेल्या नंबर वर फोन केला..

“गांधीं रोड नंतर कुठे यायचं? मला घर सापडत नाहीये…तुम्ही लोकेशन पाठवलं असतं तर बरं झालं असतं…”

“मला नाही येत बाबा ते करता…एक काम कर, तिथल्या मारुती मंदिराजवळ थांब…तिथे आला की फोन कर..”

एका वृद्ध माणसाचा फोन…

डिलिव्हरी बॉय गजानन विचारत विचारत मंदिरापाशी पोचतो… आणि परत फोन करतो..

“आलास? बर तिथून सरळ ये…जितू नावाचं घर आहे तिथे थांब…पोरा…एक मदत करशील का रे? मंदिरा बाहेर माझा नातू उभा आहे..मला घ्यायला जावं लागतं रोज.. पण आज काही माझे पाय चालू देत नाहीये…तेवढं आणतोस रे त्याला??”

डिलिव्हरी बॉय गोंधळला… हे काय भलतंच? कंपनी ला समजलं तर? तो मुलगा सोबत येईल का? काय करावं? एक ना अनेक प्रश्न त्याचा मनात आले….पण अखेर वृद्धाची दया येऊन त्याने होकार दिला..

गजानन ने मंदिराजवळ पाहिले…4 वर्षाचा एक मुलगा एकटाच उभा होता…त्याचकडे पाहताच गजानन ला आतून वेगळाच भास झाला…तो जवळ गेला..”आजोबांजवळ चालतोस ना रे?”

“हो..”

तो मुलगा चटकन उडी मारत गजानन च्या गाडीवर बसतो. गजानन त्याला घेऊन घर शोधू लागतो…खूप फिरला तरी घर सापडेना…त्याने फोन लावला तर फोनही बंद….मग त्या मुलाला विचारलं…”घर कुठेय” म्हणून..

तो काहीही सांगत नव्हता…

आता मात्र गजानन ला घाम फुटला… बरीच चौकशी केली, पण आजोबांच्या नावाचं तिथे कुणीही राहत नव्हतं…

अखेर गजानन च्या लक्षात आलं..आपल्याला फसवलं गेलं…मुलगा आपल्या माथी मारलाय…

नाईलाजाने तो त्याला घरी घेऊन गेला…बायको वाट बघत होती…त्या मुलाला पाहिल्यावर तिला अनेक प्रश्न पडले…गजानन ने त्याला सर्व हकीकत सांगितली…त्याच्या बायकोने सगळं ऐकलं आणि जितू ला जवळ घेऊन पटापट मुके घेतले…तिची ममता जागी झालेली… काय करणार, तिची कूस काही उजवत नव्हती…मुलासाठी ती आसुसली होती पण देवाने तिची ओंजळ भरलीच नव्हती…

“आता हा आपला मुलगा…मी वाढवेन याला..”

“अगं हे आपलं मूल नाही…याचे आई वडील याला शोधत येतीलच..”

गजानन ची बायको असलं काही ऐकायच्या मनस्थितीत नसतेच…मुलाला तिने उचललं, त्याचे पटापट मुके घेतले, त्याला गोंजारलं, हातांनी खाऊ पिऊ घातलं आणि मांडीवरच गाणं म्हणत त्याला झोपवलं…

आईच्या मायेला पारख्या झालेल्या जितुला त्या काही क्षणात आईची उणीव पूर्णपणे भरली गेली आणि तिचीही आईपणाची सल भरून निघाली..

बरेच दिवस झाले, जितू आता त्यांना आई बाबा म्हणायला लागलेला…गजानन ने त्याला आई वडिलांबद्दल गपचूप विचारायचा प्रयत्न केला पण तो काहीच सांगेना…

गजानन आणि त्याची बायको खुश होते…जितू ला शाळेत घातलं, त्याच्यावर प्रेमाची पाखरण करता करता त्यांना काय करू अन काय नको असं झालं..

जितू बाहेर खेळत असताना अचानक एक भिखारी आला आणि भीक मागू लागला…गजानन च्या बायकोने त्याला 5 रुपये दिले…त्याने जितू कडे पाहिलं आणि तो निघून गेला…

अधून मधून तो घराकडे येतच असे…

एक दिवशी गजानन ला ज्याची भीती होती तेच झालं.. तातडीने हॉस्पिटलमध्ये या असा निरोप आला…जीतूचे आजोबा तिथे ऍडमिट आहेत…

गजानन ने बायकोला सांगितलं तसं तिने जितू ला अजून घट्ट पकडून ठेवलं..तिच्या अश्रुधारा थांबत नव्हत्या…

गजानन एकटाच गेला…

बेडवर त्या वृद्ध व्यक्तीला बघताच त्याला धक्का बसला..

“तुम्ही??”

“हो…किती शोधलं तुला….माझ्या मुलीसोबत प्रेम केलंस, लग्नाचं आश्वासन दिलंस आणि निघून गेलास…प्रेमाची निशाणी मागे ठेवलीस…”

“काका?? म्हणजे…छाया???”

“होय…तुला माहीत नव्हतं…”

“कसं कळणार.. आपलं हातावरचं पोट…नवीन ठिकाणी काम सुरू झालं आणि तिथे गेलो..आल्यावर तुम्हाला शोधलं पण तुम्ही सापडला नाही…”

“आम्ही गावी निघून गेलेलो…पोटुशी मुलीला या समाजात घेऊन कसं वावरणार?? अखेर एका सुईनी कडून तिचं बाळंतपण केलं…बाळ जगलं पण ती गेली….”

“काय?? छाया??”

गजानन ला दुसरा धक्का बसला…त्याचा डोळ्यात पाणी आलं…

“होय…मी 4 वर्ष कसंबसं मुलाला सांभाळलं…मध्यंतरी एका श्रीमंताच्या घरी कामाला होतो…बरे पैसे मिळू लागले…मग स्वतःचं काम सुरू केलं…घर केलं, गाडी घेतली…आता मी श्रीमंत झालेलो…एक दिवस फूड ऑर्डर केल्यावर डिलिव्हरी बॉय मध्ये तुझं नाव आणि फोटो दिसला आणि मी ठरवलं… तुझा मुलगा तुझ्या हवाली करायचा..”

“म्हणजे?? जितू??”

“हो, तुझाच मुलगा… मी आजारी पडत चाललो होतो, मासे दिवस जास्त राहिले नाहीत हे लक्षात आलं..जितू ला कोण सांभाळेल हाच प्रश्न समोर होता आणि त्या सर्वात हे घडलं…मी तुला चुकीची दिशा सांगून भुलवलं…जितू ला नीट समजवलं, की तुला तुझे वडील भेटतील… माझं नाव कळू देऊ नकोस…आपला पत्ता सांगू नकोस…जितू ने तेच केलं..आणि मी त्याला तुझ्या हवाली केलं..मी भिखारी बनून अधूनमधून जितू ची खुशाली बघायला येत होतो…त्याला आईचं प्रेम मिळालं…वडिलांचं छत्र मिळालं अन मी मरायला मोकळा झालो…”

गजानन जड मनाने परत गेला..जितू बद्दल त्याला खास ममता का फुटायची त्याचं कारण त्याला समजलं…घरी जाऊन बायको नाना प्रश्न विचारू लागली…

तिला खरं खरं सांगून मन मोकळं केलं..
गजानन ला भीती होती की खरं कळल्यावर बायको सोडून जाईल की काय..

पण तिने जितु ला जवळ ओढून त्याचे खूप मुके घेतले..

“म्हणजे माझा जितू मला सोडून कुठेच जाणार नाही….छाया माई…तू गेलीस, पण माझी ओंजळ भरून गेलीस…तू जिथे असशील तिथे निर्धास्त रहा…मी जितू ला आईची माया कधीही कमी पडू देणार नाही..”

गजानन ने डोळे मिटून मनोमन देवाचे आभार मानले…

3 thoughts on “डिलिव्हरी बॉय”

Leave a Comment