टिक टॉक हाणून पाडणारा हा कॅरी मिनाटी आहे तरी कोण?
नुकतेच फेसबुकवर “200 रुपये… मिठाई दुकान” चे मिम्स दिसू लागले होते…त्या मिम चा अर्थ काही समजला नाही. मग नंतर “youtubeVsTiktok” असा हॅशटॅग ट्रेंड झालेला..आणि मग अचानक tiktok ची रेटिंग 4.2 वरून 1.3 वर आली…
मग लक्षात आलं की मीडिया जगतात भयंकर काहीतरी वादळ येऊन गेलंय. मग काही दिवसांनी #isupportcarry असा हॅशटॅग ट्रेंड झाला…हे सतत फेसबुक फिडवर वाचताना शेवटी हा कॅरी मीनाटी नक्की कोण आहे यावर अभ्यास करायला घेतला..आणि त्याच्या बाबतीत जे काही समजलं ते वाचून चार दिवस मला झोप आली नाही…
दिल्ली जवळील फरिदाबाद मध्ये जन्मलेला हा कॅरी, त्याचं खरं नाव अजेय नागर…अभ्यासात रस नाही, लहानपणापासून फक्त खेळ, व्हिडीओ गेम्स मध्ये गुंतून असायचा. वयाच्या 10व्या वर्षी युट्युब बद्दल समजलं, मग वेगवेगळे व्हिडीओ टाकायला सुरवात केली..फूटबॉल चे, कधी व्हिडीओ गेम्सचे…मग हळूहळू सनी देओल च्या आवाजात कमेंट्री असलेले व्हिडीओ टाकायला सुरवात केली…पण त्यांना हवं तेवढं यश मिळत नव्हतं… पण हळूहळू त्यातच रस वाढत गेला आणि रोस्ट करणारे म्हणजेच दुसऱ्याची खिल्ली उडवणारे व्हिडीओ टाकायला त्याने सुरवात केली.
बघता बघता त्याचं चॅनेल लोकप्रिय होऊ लागलं…पठयाने युट्युब साठी 12वीची बोर्डाची परीक्षाही दिली नाही…आपल्याकडे एव्हाना असं करणाऱ्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं.
त्याच्या चॅनेल ला 20 लाख सबस्क्राईबर मिळाले, पण कहर तर तेव्हा झाला जेव्हा त्याने टिकटॉक वरील आमिर सिद्दीकी ची प्रचंड खिल्ली उडवली…हा व्हिडीओ वेड्यासारखा व्हायरल झाला…त्याचे अचानक 9 ते 10 मिलियन सबस्क्राईबर वाढले…त्याच्या व्हिडीओने सर्व रेकॉर्ड तोडले…याच एका व्हिडीओ ने टिक टॉक वर रोष ओढवला गेला आणि लोकांनीं tiktok ला अक्षरशः भारतातून हाकलून लावायचा कयास धरला…tiktok अनेकांनी मोबाईल मधून काढून टाकलं, त्याला 1 स्टार रेटिंग दिली… एवढं सगळं असतानाच युट्युब ने कॅरी चा तो व्हिडीओ डिलीट केला…त्यावरून अजून तमाशा…
कॅरी ने युट्युब वर असलेला राग यलगार नावाच्या एका व्हिडीओ मधून बाहेर काढला आणि हा व्हिडीओ लोकं अक्षरशः डोक्यावर घेताय, युट्युब, गाना सर्व अँप वर हे song ट्रेंडिंग ला आहे…
आता तुम्ही म्हणाल यात तुला न झोप यायचं कारण काय??
याचं कारण असं, की हे पोरगं फक्त 20 वर्षाचं आहे, आणि करोडो मध्ये कमाई करतोय, तेही बारावी नापास असताना… विचार केला की मेलं आपण काय करत होतो 20 वर्षाचे असताना? युट्युब वर ज्या वयात फक्त full मुव्ही सर्च करत होतो तेव्हा या पठयाने युट्युब गाजवायला सुरवातही केली होती…केवळ आपल्या बोलण्यावरून या मुलाने मोठमोठ्यांना गार केलं…
अजेय नागर हा एक सेलिब्रिटी व्यक्ती बनला आहे, सोबत bodyguard घेऊन त्याला फिरावं लागतं… मोठं मोठ्या कंपण्या त्याच्यासोबत काम करायला लाईन लावताय…
यश जे म्हणतात ना ते हेच…
यावरून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, आपल्या भारतात इंटरनेट चा वापर फक्त फालतू गोष्टींसाठी केला जातोय, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पिढी ला इंटरनेटची ओळख खूप उशीरा झाली…
असो, सांगायचं एवढंच, की आपलं कौशल्य ओळखून त्यावरच फोकस केला तर कॅरी मिनाटी सारखं बनायला वेळ लागणार नाही…