संध्याकाळचे साडेपाच वाजले अन धाकल्या जाऊबाई ऑफिसहून घरी परतल्या. मोठ्या जाउबाई तिला आल्या आल्या चहा देत, पण आज त्या काही दिसत नव्हत्या…सासूबाई सोफ्यावरच आडव्या पडून होत्या. तिने विचारलं,
“साधना ताई बाहेर गेल्यात का?”
“हो…दवाखान्यात..”
“काय झालं? बरं नाही का त्यांना??”
“चक्कर येत होती म्हणे…काय माहीत काय झालं..”
सासूबाईंच्या चेहऱ्यावर कसलीच काळजी नव्हती…इतक्यात मोठ्या जाउबाई आणि जेठ घरी आले…
“आता आराम कर..जास्त धावपळ करू नकोस..”
“ताई…काय झालं??”
“अगं हिच्या पांढऱ्या पेशी जरा कमी झाल्या आहेत…खूप अशक्तपणा आलाय हिला…डॉक्टर म्हणे ऍडमिट करायची गरज नाही, औषध दिली आहेत…”
असं म्हणत जेठ निघून गेले..
“अरे बापरे…ताई, तुम्हाला इतका त्रास होत होता तर सांगायचं ना..”
सासूबाईं उठून बसल्या…औषधं घे…थोडा वेळ पड… संध्याकाळी परत नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे…
“कसला नैवेद्य?” धाकल्या जाउबाईने विचारलं..
“दर तिसऱ्या सोमवारी आपण पुरणपोळी चा नैवेद्य दाखवतो..”
“सासूबाईं, तुम्हाला तर माहीत आहे, मला पुरणपोळी जमत नाही…त्यात आज मला संध्याकाळी परत ऑफिस च्या एका महत्त्वाच्या मिटींग ला जायचं आहे….महत्वाची नसती तर मी सुट्टी घेतली असती…आणि ताईंना बरं नाहीये…त्यांना आराम करू द्या…संध्याकाळी मी आली की खिचडी लावून देईल”
सासूबाईं चिडल्या, आजवर मोठ्या सुनेने त्यांना कधीच असं स्पष्ट उत्तर दिलं नव्हतं…त्यांना सवयच नव्हती असं ऐकायची…मोठ्या जाउबाईही घाबरल्या, कोमल इतकं सडेतोड बोलेल असं त्यांना वाटलं नव्हतं…
“आजवर कधी नैवेद्य चुकवला नाही मी…तुम्हाला काय, आळशीपणा भरलाय नुसता अंगात…कामं नकोत…आणि असं उलट उत्तर देतात का? नसेल जमत तर मी करेन सगळा स्वयंपाक, आहे माझ्या अंगात अजून रग… काही कोणाला सांगत नाही मी..”
“ठीक आहे , आजच्या दिवस तुम्ही करा स्वयंपाक… एक दिवस तुम्ही केलं तर काही बिघडत नाही..”
असं म्हणत कोमल साधनाला तिच्या खोलीत हात धरून नेते आणि स्वतःच्या हाताने औषध देते…
“ताई, आता आराम करा…अजिबात उठायचं नाही..”
“अगं ते जाऊदे… तू सासूबाईंना असं बोललीस…त्या आता बघ किती रागराग करतील आपल्याला…नको ते बोलत जातील..”
“फक्त एवढ्यासाठी ताई तुम्ही जीवाचे हालहाल करून घेताय? केवळ त्यांनी राग धरू नये म्हणून स्वतःकडे किती दुर्लक्ष केलं तुम्ही…”
“अगं मला सवय नाही तुझ्यासारखं स्पष्ट बोलण्याची, काही बोललेच तर उद्धट आहेस असा शिक्का बसतो आपल्या माथी, त्यापेक्षा गपगुमान केलेलं बरं..”
“हेच चुकतं ताई आपलं…आपल्याला हेच शिकवलं जातं की उलट उत्तर द्यायचं नाही, ऐकून घ्यायचं, सांगतील ते ऐकायचं… तुम्ही आजवर तेच केलं ना? काय मिळालं मग? आजारपणातही तुमची साधी कीव केली नाही त्यांनी…आणि उद्धटपणा आणि सडेतोडपणा यातला फरक समजायला हवा…मी काहीच काम करणार नाही, किंवा मला काही सांगायचं नाही, मला काही बोलायचं नाही असं बोलणं म्हणजे उद्धटपणा.. मी काय केलं? जे सत्य आहे ते फक्त सांगितलं… मला ऑफिस मूळे जमणार नाही आणि तुम्हाला बरं नसल्याने तुम्ही करायचं नाही….यात उद्धट काय आहे? हेच सत्य आहे…आपल्याकडे सत्य स्वीकारून त्यात ऍडजस्ट करायला उद्धटपणा म्हणत असतील तर हा शुद्ध अडाणीपणा आहे…जे आहे ते सरळ बोलून दाखवलं मी…’जमणार नाही’ यामागे जर काही शुद्ध कारण असेल तर त्याला उद्धटपणा म्हणत नाही ताई…आणि आजवर तुम्ही फक्त ऐकून घेतलं, त्या मोठया आहेत, त्यांचा मान म्हणून…आपण मोठ्यांचं का ऐकतो? कारण त्यांना अनुभव असतो, आपल्या चांगल्यासाठी ते सांगत असतात…पण यांच्या सांगण्यामागे फक्त ईर्षा, हट्टीपणा आणि द्वेष असेल तर त्या मानाने कितीही मोठ्या असल्या तरी ऐकून घेण्यात आणि स्वतःचे हाल करण्यात काहीही अर्थ नाही..आपण जेवढं ऐकत राहू तेव्हढी समोरच्याची हिम्मत वाढत जाईल..आणि एकवेळ अशी येईल की त्यांना आपलं ऐकून घेण्याची इतकी सवय झाली असेल की आपण कधी ब्र जरी काढला तरी त्यांना सहन होणार नाही….आधीच जर आपण प्रतिकार केला तर समोरचाही त्याच्या ताब्यात राहतो…म्हणूनच, नाही म्हणायला शिका ताई..”
कोमलने आज साधनाचे डोळे उघडले होते..साधनाने ठरवलं, आज काहीही झालं तरी आराम करायचा…इतकी वर्षे कष्ट केली, एक दिवस त्याची झीज भरून काढायला काही हरकत नाही…असं म्हणत त्या झोपी गेल्या, गोळ्यांमुळे त्यांचे डोळे आपोआप लागत होते…मग कोमल आवरून आपल्या ऑफिस मिटिंग साठी निघून गेली…
संध्याकाळी सासूबाई साधना च्या खोलीबाहेर चकरा मारत होत्या. त्यांना वाटलं ही बाहेर येईल अन स्वयंपाकाला लागेल…पण साधना पूर्ण झोपेत होती…
“अगं ए साधना…नैवेद्याचं बघ बाई…किती वेळ झोपा काढणार..”
साधनाला काहीही ऐकू गेलं नाही…अखेर सासूबाईं चरफडत स्वयंपाक घरात गेल्या आणि नैवेद्य बनवायला सुरवात केली…डाळ शिजत घालायलाच अर्धा तास लावला…काही सुचत नव्हतं त्यांना…2 तास अर्धवट काहीतरी करून वैतागून त्या साधनाच्या खोलीबाहेर आल्या अन म्हणाल्या…
“मी तयारी केलीये सगळी, आता बाकीचं तरी कर..”
एवढ्यात समोरुन कोमल नुकतीच आपली मिटिंग संपवून आली…
“काय हो सासूबाईं…सगळा स्वयंपाक करणार होतात ना तुम्ही आज?? काय झालं? दमलात का?”
कोमलचा सासूबाईंनी जरा धसकाच घेतलेला…ही मुलगी साधना सारखी ऐकून घेणाऱ्यातली नाही हे त्यांना समजलं होतं… त्यामुळे घाबरून त्यांनी म्हटलं..
“मीच करणार आहे, मी म्हणाले होते ना..”
सासूबाईं परत किचन मध्ये जातात…काही वेळाने खिचडी चा दरवळ घरात पसरतो.. साधनाला जाग येते..
“सासूबाई, पुरणपोळी नाही आज?”
“अगं देव कुठे म्हणतो की जीवाचे हाल करून मला खायला घाल म्हणून, प्रेमाने जे अर्पण केलं ते स्वीकारतो देव..”
साधना आणि कोमल एकमेकींकडे बघून हसायला लागल्या… आणि सासूबाईंनी पुन्हा कधीच असा हट्टीपणा आपल्या घरात केला नाही…
Mast kahani chhoti pn Bodh ghenyajigi
किती छान लिहिलंय..👌👍
Khup khup chan 👌👌👌
Chaan
पण जमत नाही "नाही" म्हणायला
Khup chan
chhaan
खूपच छान👍❤️
Khup chhan.. Pn nawara sagala ghol ghalato aas wagal ki mg…
मस्त, पण असे प्रत्येकाला वागता येत नाही घरात.पण अश्या कथा वाचून आनंद मिळतो.
खरंय….प्रत्येक वेळी असं वागता येत नाही …पण समोरचा आपला विचार करत नसेल तर पर्याय नाही
👍
कहाणी घर घर की , मुलींनी थोडं धीट रहावं