“मी मध्ये कुठेही गाडी थांबवणार नाही हा आधीच सांगून ठेवतो…”
“नको थांबवूस बाबा, तू येतोय सोबत हेच खुप आहे…”
सुधीर ची ईच्छा नसताना आई आज त्याला मुद्दाम गावाकडच्या एका कार्यक्रमात घेऊन आलेली, शहरात वाढलेला सुधीर, त्याचा खेडेगावाशी काही संबंध नव्हता आणि साहजिकच फारसा जिव्हाळा त्याला नव्हता…
पण गाडी चालवत असताना सुधीर च्या मनात केसचाच विचार चालू होता, ऑफिस मधील फाईल्स गहाळ झाल्या होत्या आणि रोख रवी कडे होता. रवी ने सहकार्य करायचं सोडून आगपाखड करायचा पवित्रा घेतला अन तिथेच ठिणगी पडली…
“केस केली की बरोबर ठिकाणावर येईल…इतके दिवस मित्र म्हणून खूप सहन केलं त्याचं, पण आता त्याला त्याची जागा दाखवावीच लागेल..”
सुधीर आणि आई कार्यक्रम आटोपून घरी जायला निघतात, एका ठिकाणी गणेशोत्सव चा कार्यक्रम चाललेला असतो आणि गावची मंडळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवून प्रसाद घेऊन, जेवण करून मगच माघारी पाठवत होती…
पांढरा पण बराच मळलेला सदरा, खाली पातळ धोतर, खांद्यावर उपरणं आणि डोक्यावर टोपी असा वेष असलेल्या 2 इसमांनी रस्ता अडवला…सुधीर काही क्षण स्तब्ध झाला, रस्त्यात गाडी अडवून लुटणाऱ्या बातमीची त्याला आठवण झाली…पण पुढचं काही मनात यायच्या आत त्या दोन्ही इसमांनी अगदी कळकळीने हात जोडले आणि त्यांच्या पूजेत प्रसाद घेऊन जाण्याचा आग्रह केला…आईने माझ्याकडे एकदा बघितलं, त्या 2 माणसांची कळकळ दुर्लक्ष करण्याजोगती नव्हती… मी होकार देताच आई खुश झाली..
सुधीर गाडीतून उतरताच भरपूर बच्चे मंडळी आजूबाजूला गोळा झाली, इतकी चकचकीत कार त्यांनी आज जवळून पाहिली होती…
गावात एखादी नवीन चारचाकी आली की रस्त्यावरील म्हातारी मंडळी अश्या नजरेने बघत जसं कुणीतरी परग्रहवासी गावात शिरलाय, गाडीचा अगदी ठिपका होईपर्यंत मान वाकवून ही मंडळी बघत असत…असो.
सुधीर आणि आई खाली उतरले तसा त्या दोन्ही इसमांना आनंद झाला…दोघांना ते गणेश मूर्ती जवळ घेऊन गेले आणि प्रसाद दिला, शेजारीच पंगत बसली होती, त्यातल्या दोघा तरुण मुलांना बाजूला सरकायला लावून जेवायला बसायचा आग्रह केला…
आईला वाटलं सुधीर काही बसणार नाही पण आई सुधीर कडे बघायच्या आत सुधीर बसून गेला होता, का कोण जाणे, हे वातावरण त्याला आवडलं होतं…
पंगत बसली, वाढीपींनी वाढायला घेतलं..इतक्यात मागून जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू आला…सुधीर मागे वळून बघायला लागला..साधारण 35 ते 40 वयामधील 2 माणसं जोरजोराने भांडत होती..सुधीर दचकलाच…त्यांचं बोलणं अगदी टोकाचं होतं..
“बाप्या जीव घेईल तुझा…माझ्या वावरातून तुझं नांगर बाजूला घे…नाहीतर..”
“बाळ्या, थोबाड बघितलं का आरशात, म्हणे जीव घेईल..आणि नांगर ठेवलंय ती जागा माझी आहे..”
“हरा*मखोर…भड***…तुला बघतोच मी..”
“हा निघ..”
सुधीर च्या कपाळावर घाम जमा झाला, हे असलं भांडण त्याने पहिल्यांदा पाहिलं होतं…पण विशेष म्हणजे या भांडणाकडे कुणीही लक्ष देत नव्हतं…जो तो आपापल्या कामात मग्न होता…
वाढपींच्या मध्ये ते दोघे येताच वाढपींनी त्या दोघांना बाजूला केलं…”सरका…तिकडं जाऊन कजा करा जा…”
इतकं lightly कसं घेताय लोकं? हा प्रश्न सुधीर ला पडला…
त्यांचं भांडण अगदी मारामारी पर्यन्त गेलं..एकमेकाला बऱ्यापैकी चोप दिल्यावर दोघेही निघून गेले..
सुधीर चा जीव भांड्यात पडला…
“हुश्श…काय माणसं आहेत…नक्की एकमेकांवर केस ठोकणार ही…”
सुधीर ला त्याचं आणि रवी चं भांडण आठवलं अन त्यालाच हसू आलं…किती फरक असतो ना, सुशिक्षित लोकं भांडतात तेही सरळमार्गी…नाहीतर ही लोकं…
सुधीर ने जेवण आटोपलं..आरती झाली…दोघेही जायला निघाले… बाहेर ढोल ताशा चालू होता अन सर्वजण नाचत होते… त्यांची वेड्यागत नाचण्याची तऱ्हा पाहून सुधीर ला हसू आलं…इतक्यात त्याचे पाय थबकले…
हे काय पाहतोय मी??? तो पुन्हा मागे वळला…आणि जे पाहिलं त्यावर त्याचाच विश्वास बसेना…
बाळू आणि बापू, जी दोन लोकं भांडत होती..त्याच बाळूने बापू ला खांद्यावर घेतलं होतं आणि दोघेही गाण्यावर थिरकत होते…एकमेकांकडे बघत हसत खिदळत होते…
हे कसलं भांडण? विसरले पण ?
सुधीर ला आपल्या “सुशिक्षित भांडणा” च्या विचारा बद्दल आता लाज वाटू लागली…