चुकलीस तू..!!!

 अठरा वर्षीय रानुचा कामाचा चपाटा सर्वजण बघतच राहिले. काही दिवसांपूर्वीच तिच्या मावशीची मुलगी बाळंतीण झाली होती, घरी पाहुण्यांची लगबग सुरू झाली..मावशीला एकीकडे मुलीकडे लक्ष द्यावं लागे आणि दुसरीकडे पाहुण्यांच्या पंगती उठवाव्या लागे. अश्या धावपळीच्या प्रसंगी “रानुला बोलावून घ्या” हे वाक्य तिच्या कुटुंबात लोकप्रिय होतं..

रानुची आई, मनीषा…गेले कित्येक वर्षे माहेरीच रहात असे. नवरा दारू पिऊन बायका मुलांच्या जीवावर उठायचा..स्वतःचा जीव सांभाळत मनीषा मुलांना घेऊन माहेरी आलेली. स्वतःवर जे संकट ओढवलं ते आपल्या मुलीवर ओढवायला नको असं कायम तिला वाटायचं..उद्या काही झालं आणि रानु माझ्यासारखीच माहेरी आली तर कसं पोसणार तिला? आधीच मीच माझ्या माहेरी भार, त्यात हिची भर झाली तर? 

म्हणूनच मनीषाने जीव तोडून तिला संसाराच्या आणि घरकामाच्या हरएक गोष्टी शिकवल्या होत्या. स्वयंपाकात तिला येत नव्हतं असं काहीच नव्हतं..टापटीपपणा, स्वच्छता, वस्तूंची निगा, काटकसर या सगळ्या गोष्टींचे धडे तिला फार कमी वयात मिळालेले..मनीषाला एकच वाटे, उद्या हिच्या सासरी हिचा हा गुण बघुन तिचं कौतुक व्हायला हवं..तिला घरातून हकलायला तिच्या सासरच्यांना काही कारणच उरु नये…रानु ला मनीषाने असं काही तयार केलं होतं की जो तो तिच्या कामाच्या कौशल्याकडे तोंडात बोट घालून बघे..

ती मदतीला आली आणि मावशीचा एक भार कमी झाला, पाहुणे यायची खबर लागताच रानु स्वयंपाकाला लागे, पाहुणे यायच्या अर्धा तास आधी सगळं तयार होई, आणि तेही अगदी चविष्ट..पोळ्या इतक्या गोल लाटायची की जणू गोलाकार छापाच मारलाय…मऊसर आणि अगदी सर्व बाजूने मध्यम आचेवर भाजलेली तिची पोळी…कशातही कुठेही कमी नाही. मग पाहुणे आल्यावर त्यांना वाढणं, आग्रह करणं, नंतर सगळं आवरून ठेवणं, भांडी घासनं सगळं कसं एका झटक्यात करून टाके..येणारा जाणारा हमखास तिच्याकडे बघून तिचं कौतुक करी..

काही वर्षांनी रानुचं लग्न झालं. मनीषाने मुलाला चांगलं पारखूनच तिचं लग्न लावून दिलं.. हे स्थळ तिच्या मावशीनेच आणलं असल्याने रानुच्या सासरचे मावशीला चांगलेच परिचित होते. एके दिवशी मावशीने रानु च्या सासरच्यांना घरी जेवायला बोलावलं..जेवण फक्त निमित्त होतं, मावशीला तिच्या रानुचं कौतुक ऐकून घ्यायचं होतं.. नाव ठेवायला जागाच नाही अश्या रानुचं कौतुक तिच्या सासुकडून ऐकायला मावशी आतुर झालेली. जेवणं उरकली, इतर गप्पा झाल्या..पण रानुच्या सासूने रानु बद्दल एक शब्दही काढला नाही..मग मावशीने स्वतःहून विषय काढला..

“आमची रानु फार छान कामं करते हो, माझ्या मालतीच्या बाळंतपणात तिलाच बोलावून घेतलेलं मी..”

“रानु आणि चांगलं काम? काय बोलताय… अहो कितीदा सांगितलं तिला की भाजी जरा तिखट बनव म्हणून..पण कसलं काय, गुळचट लागते नुसती..आणि पोळ्या इतक्या पातळ असतात की पापड खातोय की काय असं वाटतं..जाऊद्या, शिकेल हळूहळू..”

हे ऐकून मावशीला वाईट वाटलं..हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत हे मावशीला लक्षात आलं..आपल्या बहिणीबद्दल सुद्धा वाईट वाटलं..तिने जीव तोडून रानु ला एक परिपूर्ण गृहिणी बनवण्याचा प्रयत्न केला पण झालं काय? पदरी निराशाच…

स्त्री ने कितीही मेहनत घेतली तरी काही ना काही कुरापत शोधून तिच्यावर ठपका ठेवण्याची परंपरा फार जुनी आहे..

दुसऱ्या दिवशी मावशी आपल्या बहिणीला, मनीषाला भेटली..मनिषाच्या चेहऱ्यावर समाधान होतं, रानु तिच्या सासरी सुखाने नांदतेय आणि आपण शिकवलेल्या कामामुळे सर्वांची वाहवा मिळवतेय या गैरसमजाचं निरर्थक समाधान मनीषा पेलत होती..

“काल रानु चे सासू सासरे आले होते म्हणे? काय म्हणाले? रानुचंच कौतुक चाललं असेल दुसरं काय..”

मावशी तिच्याकडे बघतच राहिली..मनीषाला न सांगणंच योग्य असं ठरवून मावशी मौन राहिली..पण मावशीचा आतला आवाज मनीषाला ओरडून ओरडून सांगत होता..

“चुकलीस मनीषा तू, चुकलीस… पोरीला धुणं भांडी शिकवण्यापेक्षा पुस्तकी ज्ञान दिलं असतं तर कौतुकाच्या आशेने राब राब राबायची वेळ रानु वर आली नसती.. रानुला शिकवलं असतं, मोठं केलं असतं तर स्वतःच्या पायावर ती उभी असती..आपल्या कामाचा योग्य मोबदला आणि तिच्या वाट्याचं कौतुक तिने हक्काने पदरात पाडून घेतलं असतं.. चुकलीस मनीषा, तू चुकलीस..”

(मुलगी सासरी सुखाने नांदावी म्हणून तिला केवळ घरकाम शिकवू नका, कारण त्यात 99 कामं केल्याच्या कौतुकापेक्षा 1 काम राहिल्याचा आकांडतांडव जास्त होतो…हेच सत्य आहे, जवळपास प्रत्येक स्त्री च्या वाट्याला आलेलं..म्हणून तिला सक्षम बनवा, कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ देऊ नका..आणि तू छान घरकाम कर तुझं कौतुक होईल अशी खोटी स्वप्न तर मुळीच दाखवू नका)

3 thoughts on “चुकलीस तू..!!!”

Leave a Comment