दिगंबर पंतांनी आपल्या धाकल्या मुलासाठी, परशुराम साठी मेघनाला निवडलं होतं, लग्नानंतर 3 वर्षांनी ऋग्वेदचा जन्म झाला आणि 2 वर्षांनी वीणा जन्माला आली. घराण्यात सर्वात लहान म्हणून वीणा विशेष लाडकी. तीही मेघना सारखी तडफदार, स्वाभिमानी आणि साहसी होती. म्हणूनच तिने पायलट बनण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्याच्याच शिक्षणासाठी ती बाहेरगावी शिकायला होती.
विनायकचे दोन्ही मुलं टेक्सटाईल बिझनेस मध्ये महत्वाची भूमिका बजावत होते, दोघेही बोर्ड ऑफ डिरेकटर्स मध्ये होते. मोठा मुलगा दिवाकर, त्याची बायको रश्मी ही एक बॅडमिंटनपटू होती आणि धाकल्या दिवकरची बायको एक चित्रकार होती.
दिगंबरांच्या मधल्या लेकाला 2 मुली, आर्या आणि स्वरा..दोघीही खूप हुशार अन चुणचणीत होत्या. घरात या दोघींच्या हसण्याने घर अगदी प्रफुल्लित होत असे.
घरात अशी 13 माणसं रहात होती, पण कधीही कुरबुरी ऐकू आल्या नाहीत. एकत्र कुटुंबात असूनही कुरबुर नाही अशी शक्यता कमीच असते, पण हे शक्य करून दाखवलं तेही या घराण्याच्या एका नियमाने.. नियम असा होता की
“स्वैपाकघर हे बाईच्या एकटीचं आणि हक्काचं असावं..त्यात दुसऱ्या कुणी लुडबुड केलेली कुठल्याही बाईला आवडत नाही..वस्तूंची मांडणी, त्यांची ठेवण हे ज्या त्या स्त्रीची स्वतःची आवड असते, त्यात 2 डोकी एकत्र आली की चवच बिघडते..नात्याचीही अन पदार्थाचीही..”
त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे स्वैपाकघर वेगळे होते. म्हणजे घरात जवळपास 5 स्वैपाकघर होती, आणि एकूण वाडा हा प्रशस्त होताच..पण अजूनही घरी नव्या सुना आल्या की त्यांना त्यांच्या पसंतीचं स्वैपाकघर बनवून घेण्याची मुभा असायची त्यासाठी आजूबाजूला बरीच जमीन शिल्लक ठेवली होती.
एकाच घरात राहूनही स्वतःची स्पेस मिळायला हवी, हा विचार 3-4 पिढ्यांपूर्वी कसा केला गेला असेल?? कुठल्या स्त्रीने हे नियम घालून दिले असतील हा प्रश्न सर्वांना होताच. घरात सर्वात ज्येष्ठ म्हणजे दिगंबरपंत. पण त्यांनाही आपल्या आपल्या पनजीआजी सोडून इतर कुणी आठवत नसे. त्यामुळे ती स्त्री एका रहस्यातच अडकून राहिली.
दिगंबरपंतांच्या कंपनीला आता शाळा कॉलेज मधील युनिफॉर्म चीही ऑर्डर मिळाली होती. शहरातील प्रसिद्ध कॉलेज सावित्रीबाई मेमोरियल आर्टस् कॉलेज मधून ऑर्डर येताच दिगंबरपंत खूप खुश झाले. कारण त्यांनी याच कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. या निमित्ताने कॉलेजमध्ये चक्कर मारुयात या विचाराने त्यांनी ड्रायव्हरला आर्टस् कॉलेजमध्ये गाडी वळवायला लावली.
गेटजवळ गाडी उभी करताच आत त्यांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमलेली गर्दी दिसली.
“सखाभाऊ, काय गोंधळ आहे बघता का जरा??”
ड्रायव्हर गाडीतून उतरून बघतो, तोवर कॉलेजच्या स्टाफला आणि प्रिंसिपल ला दिगंबरपंत येण्याची खबर मिळालेली असते. स्टाफ लागलीच त्यांच्या स्वागताला गर्दीतून वाट करत बाहेर जातो..
दिगंबरपंतांना गर्दीतून वाट काढत स्टाफ मेम्बर्स घेऊन जात असतात…त्यांना धक्का लागू नये म्हणून आजूबाजूला काही शिक्षक आणि सिक्युरिटी गार्ड ने घेराव घातलेला असतो. दिगंबरपंत एकंदरीत हे काय चालले आहे याचा अंदाज घेत असतात. ते प्रिंसिपल ला विचारतात..
“कसला गोंधळ आहे सर हा??”
“मुलांचा अति जोश..अजून काय..”
“म्हणजे??”
“शैक्षणिक फी वाढवली म्हणून आंदोलन करताय..काही नाही, 2 दिवस दमतील नंतर आपोआप आपापल्या कामाला लागतील..”
त्यांचं हे बोलणं आंदोलनाच्या मध्यावर दिगंबरपंतांच्या जवळच टेबलवर उभ्या असलेल्या मुलीला ऐकू जातं..आंदोलनात ती मुख्य असेल असं वाटत होतं..
“सर…आम्ही मागे हटणार नाही…तुम्ही अनधिकृत पणे फी वाढवली…आमच्यासाठी नाही पण जी मुलं दुरून इथे येतात, घरची परिस्थिती नसताना हॉस्टेल, कँटीन ची फी भरतात आणि वर ही वाढवा फी भरतात, त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकून तुम्ही शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा आणत आहात.. शिक्षण माणसासाठी किती महत्वाचं आहे हे तुमच्याशिवाय अजून कोण सांगू शकेल??”
“हे बघा…वाढीव फी ही शैक्षणिक उपक्रमाचाच एक भाग आहे, तुम्ही निरर्थक आंदोलन करत आहात..”
ती मुलगी खिशातून एक कागद काढते..
“मी पूर्ण होमवर्क करून आलीये सर..यावर सर्व फीज ची सर्व माहिती आहे…कितीही वाढवलं तरी तुम्ही सांगितलेली नवीन फी याच्या चारपट आहे..”
समोर पुरावा बघताच प्रिंसिपल घाबरतात..
“दिगंबरपंत तुम्ही या आत.यांच्याशी मी नंतर बोलतो..”
दिगंबरपंत त्या मुलीच्या शौर्याने अन तडफदार बोलण्याने भारावून जातात. आत ऑफिसमध्ये बसताच दिगंबरपंतांना त्यांच्या कॉलेजचे दिवस आठवतात. प्रिंसिपल समोर येऊन बसतात
“सर ती मुलगी खरं बोलत आहे का??”
प्रिंसिपल विषय बदलतात, काही औपचारिक बोलणं झाल्यावर दिगंबरपंत तिथून निघतात. त्यांचं लक्ष पायऱ्यांचा जवळील एका भिंतीवर गेलं, तिथे असलेली झाशीच्या राणीची मूर्ती अजूनही तशीच होती. पण येता जाता पायऱ्यांवरून उडणाऱ्या धुळीमुळे तिच्यावर धूळ बसायची अन ती तसबीर पुसट व्हायची. दिगंबरपंत कॉलेजला असताना ती तसबीर नेहमी स्वच्छ करत. इतर मुलं त्यांना हसायची पण दिगंबरपंत दुर्लक्ष करायचे.
आजही त्यावर धूळ साचून ती पुसट झाली होती, दिगंबरपंत खिशातून रुमाल काढत त्या तसबीरीकडे जायला निघताच ती आंदोलन करणारी मुलगी तिथे येऊन खिशातला स्कार्फ काढते अन ती तसबीर स्वच्छ करते. दिगंबरपंत एकदम चमकतात. त्यांना त्या मुलीत साक्षात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. लागलीच ऋग्वेदसाठी तिचा विचार मनात घोळू लागतो. तिथून जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला ते विचारतात..
“या मुलीचं नाव काय??”
“ती?? कॉलेजची आन बान अन शान…शुभदा नारायणकर…”
क्रमशः
भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-3/
भाग 7
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/
Next blog please….