दिगंबरपंत हॉस्पिटलमध्ये आहे हे ऐकताच घरातले सर्वजण हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. दिगंबरपंतांची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्यांना ऑक्सिजन वर ठेवण्यात आलेलं. पुढील काही दिवस इंस्पेक्शन केल्याशिवाय काहीही समजणार नव्हतं. घरावर फार मोठं संकट कोसळलं. ऋग्वेद, विनायक आणि संतोष हॉस्पिटलमध्ये थांबले. बाकीचे घरी आले. घरी येताच बँकेच्या माणसांनी घेरा घातला. जमीन अनाधिकृत असल्याची बातमी एव्हाना सगळीकडे पोहोचली होती. तेव्हा हे 15 कोटीचं कर्ज कसं फेडणार याचीच चौकशी करायला बँकेचे काही कर्मचारी आलेले. कालपर्यंत अगदी मानाने जे घरासमोर मान झुकवत होते ते आता पैसे नाहीत म्हटल्यावर अरेरावीची भाषा करायला लागले. 15 कोटी फेडायचे म्हणजे घरदार सगळं विकावं लागणार होतं. मेघना सुद्धा आपल्या ओळखीतल्या लोकांशी संपर्कात होती पण इतकी मोठी रक्कम कुणीही देऊ करत नव्हतं. संकट फार मोठं होतं, अक्षरशः रस्त्यावर यायची वेळ आलेली. त्यात दिगंबरपंत हॉस्पिटलमध्ये, काय करावं कुणालाही सुचत नव्हतं.
“आपले हे 5 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत, या काळात पेशन्ट स्थिर राहिले तर ते धोक्याच्या बाहेर असतील, नाहीतर..”
डॉक्टर विनायकला सांगत होते. एकंदरीत दिगंबरपंत कधीही सोडून जाऊ शकतात, पुढील 5 दिवस कसे घालवावे हेच संकट सर्वांना होतं.
शुभदा तिच्या खोलीत दिगंबरपंतांच्या पहिल्या भेटीपासूनच्या आठवणी आठवू लागली, कॉलेजमध्ये हसतमुखाने बोलणारे, सासरी आल्यावर वडीलांसारखी माया करणारे दिगंबरपंत.. ते म्हणजे घराचा प्राण आहेत, त्यांना काही झालं तर?? नाही, कल्पनाही करवत नाही..
“शुभदा. आत येऊ??”
रेखा बाहेर उभी असते, शुभदा तुला खुनेनेच या असं सांगते.
“शुभदा..मी कलंक आहे या घराण्याला..मला माफ कर, मला कसलाही खजिना नकोय, माझ्या मुलींनाही नकोय, पण त्याचा शोध घे अन घराला वाचव गं…” हात जोडून रेखा शुभदापुढे विनंती करते.
“आई, ही वेळ अशी आहे की एकमेकांचे अपराध अगदी नगण्य वाटू लागतील. आणि खरं सांगते तुम्हाला, हा खजिना वगैरे सगळं खोटं आहे. आपल्या पूर्वजात दुर्गावती नावाची एक स्त्री होती, तिने 1800 च्या शतकात आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काही संदेश दिलाय, तोच या पुस्तकात आहे, आणि खरं सांगते त्यामुळेच घराण्याचं आज इतकं नाव आहे कारण त्यांचे अनुभव आणि सल्ले आज आपल्याला यशस्वी बनवताय..”
“मी खरोखर स्वार्थी झालेली गं, इतका अमूल्य ठेवा दूर सारून फक्त खजिना खजिना म्हणून ओरडत राहिले..पण..”
“पण काय रेखा आई??”
“पण मग, अरुंधती आई असं का म्हणायच्या की वेळ आली की मगच ते पेपर बाहेर काढ म्हणून..?”
“कसले पेपर??”
“मी विचारण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ.. काहीही समजलं नाही मला, कदाचित मला वाटायचं की एखाद्या मोठ्या जमिनीचे किंवा घराचे पेपर असतील..”
“दुर्गावती देवीने लिहिल्याप्रमाणे असल्या खरेदीचा काहीही उल्लेख नाहीये, आणि त्याकाळात त्यांच्याकडे इतके पैसे येणेही शक्य नव्हतं..”
“माझा स्वार्थ म्हणून नाही शुभदा, पण माझी ही गोष्ट खरंच ऐक, दुर्गावती देवींनी खूप मोठी संपत्ती आपल्यासाठी राखून ठेवलीय.. त्याचा फक्त शोध घे अन घराला कर्जातून मुक्त कर..”
रेखा निघून जाते, शुभदाचा अजूनही विश्वास बसत नाही, दुर्गावती ज्या परिस्थितीत जगत होती त्या परिस्थितीत तिच्याकडे पैसे असणं शक्यच नव्हतं..आणि त्याकाळात मूल्य तरी किती होतं? त्याची किंमत आज अगदी नगण्य.. मग अरुंधती आजी कसल्या पेपर बद्दल बोलत होती??
शुभदा शेवटची काही पानं वाचायला घेते, त्यात लिहिलेलं असतं..
“आयुष्याचा खूप मोठा अनुभव मी लिहून टाकलाय, काहीतरी केलंय पुढील पिढीसाठी याचं खूप मोठं समाधान मला वाटू लागलंय. मी आता माझं लिखाण अंतिम टप्प्यात आणते. पांडुरंग आणि कांता राजस्थान ला आहेत. सुखाने संसार करताय, पद्मिनीचा नवरा तिला सोडून गेलाय, ती अधूनमधून जाऊन येते राजस्थानला अन खबर आणते. जगदीशपंतांना माझ्यावर संशय येऊ लागलाय, त्यांना जर पुस्तकाविषयी समजलं तर ते माझ्यासकट त्याला जाळून काढतील. पुढच्या महिन्यात पांडुरंग येतोय म्हणे मला भेटायला, कांताला चौथा महिना सुरुय..नातवाच्या नावाने तरी जगदिशपंत माफ करतील अशी आशा करते. आमचे बनलेले चित्र तो चित्रकारही येणार आहे म्हणे लवकरच. जेनीबाई अन माझी खूप छान गट्टी जमली. पण आता त्या परत जायचं म्हणताय, पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही, पण तिची खूप आठवण येईल मला. शेवटच्या दिवशी तिच्यासोबत फिरले मी, ती मला कुठेकुठे घेऊन गेलेली. शेवटी आम्ही बॉम्बे ऑफिसात गेलो, यावेळी पहिल्यांदा मी ऑफिसच्या आत पाऊल ठेवायचं धाडस केलं, इतरवेळी भीती वाटायची, जेनीच आत जायची. काय समाधान वाटलं म्हणून सांगू. जेनीबाई परत गेल्या, पद्मिनी होती सोबतीला, पण जगदिशपंत असताना तिलाही समोर येता येईना, तिला म्हटलं मी, लेकीकडे राहायला जा..पण लेकीच्या घरचं पाणीही पिणार नाही म्हणे. काय हे नियम, कुणी आणलेत देव जाणे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, संकटं ही माणसाला घडवतात, धीट बनवतात, नव्याने उभी करतात, संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा, पहा आपल्या एकाच कटाक्षाने कसं नामोहरम होतं ते. आपली इच्छाशक्ती ही भल्याभल्या संकटांना गारद करते, हे नेहमी लक्षात असुद्या, आयुष्यात जर कुणी खचलाच, निराश झाला किंवा अंथरुणाला खिळलाच.. तर माझे हे वाक्य त्याला सूनवा.. बघा कसा ताडकन उठून बसतो ते. बरं, माझं लिखाण आता मी अंतिम टप्प्यात आणते. शेवटच्या काही गोष्टी फक्त सांगून जाते, ते उद्या लिहीन..”
दिगंबरपंतांमध्ये सुधारणा दिसत नाही, याक्षणी काहीही सांगणं कठीण होतं, पण दिगंबरपंत शुध्दीवर यायच्या आधी 15 कोटीची सोय करणं आवश्यक होतं. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे दुर्गावतीची वाक्य दिगंबरपंतांना ऐकवायची होती, पण कशी?? मध्ये कुणालाही जाऊ देत नव्हते, शुभदाने खूप विनंत्या केल्या पण कुणीही ऐकेना. अखेर तिने एक शक्कल लढवली, काही स्तोत्र रेकॉर्ड केले अन स्तोत्राच्या शेवटी दुर्गावतीची वाक्य स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवली. एका नर्सला सांगितलं की हळू आवाजात दिगंबरपंतांना ऐकू जाईल अशी ही स्तोत्र लाव. डॉक्टरांची परवानगी घेऊज नर्स ते हळू आवाजात दिगंबरपंतंजवळ लावते.
शुभदा पुढची काही पानं चाळते, 2 पानांचं लिखाण झाल्यानंतर काही आकडेमोड असलेले कागदपत्रे तिला दिसतात, इंग्रजीत असतं ते सगळं अन त्यावर सही म्हणून एक अंगठा असतो.
“ही कुठली कागदपत्रे आहेत?? चुकून तर आली नसतील ना?? नाही, जीर्ण झालेल्या पानांवरून नक्कीच ही दुर्गावतीची कागदपत्रे आहेत. पण याचा उल्लेख पुस्तकात कुठेही नव्हता. दुर्गावती ने जाणूनबुजून तो उल्लेख टाळला नसावा ना?? कागदोपत्र चुकीच्या हाती लागू नये म्हणून? आणि अरुंधती आजी सांगायची त्याप्रमाणे खरंच यात खजिना होता का?? काय असेल त्या कागदपत्रात??
घराला वाचवण्यासाठी शुभदाला ती कागदपत्र कसली आहेत यांचा शोध लावणं खूप गरजेचं होतं, घरातील इतर मंडळी दिगंबरपंतांच्या कारभारात व्यस्त असल्याने शुभदाने हे काम स्वतःच करायचं ठरवलं. तिने ती कागदोपत्र वकिलाला दाखवली, पण वकिलही ते ओळखू शकला नाही. मग तिने काही CA लोकांना भेट दिली, त्यांनाही त्याचा अर्थ उमजेना. विचित्र अशी आकडेमोड, टक्केवारी, प्रति मूल्य, एकूण मूल्य अशी नावं त्यावर होती. शुभदा खूप फिरली, अखेर दमून एका मंदिरात जाऊन बसली. मंदिरात कुणीही नव्हतं. सावली अन गार वाऱ्याने तिचा थकवा जरा कमी झाला. ती उगाचच इकडे तिकडे बघू लागली, देविमायला नमस्कारही करून झाला. इतक्यात मागून एक वृद्ध आजोबा, जवळपास 90-92 वर्षाचे असतील त्यांनी हाक दिली,
“बेटी, काही मदत हवीय का??”
“नाही आजोबा. ठीक आहे मी..”
जे काम मोठमोठ्या वकिलांना अन CA ला जमलं नाही ते यांना थोडीच जमणार?
“तुझ्या हातात काय आहे बघू??”
शुभदा हातातले पेपर दाखवते, आजोबा चमकतात..
“तुला पैशांची गरज आहे??”
“हो..पण तुम्हाला कसं कळलं??”
“माझ्या आजोबांचा एक मित्र होता, पांडुरंगदादा..त्यांच्याकडे असेच पेपर होते..”
“पांडुरंगदादा?? म्हणजे दुर्गावती चा मुलगा?? आजोबा..मी त्यांचीच वंशज, कसे होते पांडुरंगदादा?? त्यांची आई दुर्गावती.. कशी होती सांगा ना..”
शुभदाला अगदी त्या पुस्तकातुन 1800 चा काळ बाहेर आलाय असं वाटू लागलं. पुस्तकातील एकही पात्र आज हयात नसताना त्या पात्रांना स्पर्शून गेलेलं केवळ एक व्यक्तिमत्त्व सापडलं अन शुभदाला जणू देवच भेटला असं झालं…
“फार काही आठवत नाही, हा पण हे पेपर आठवताय, माझे बाबा हे काम करायचे..”
“मग याची उकल कुणाकडे मिळेल??”
“एक काम कर, मी एक ऑफिसचा पत्ता देतो तिथे जा..”
शुभदाला मुंबईतील एका ठिकाणचा पत्ता दिला जातो अन ती प्रवास करून मुंबईला पोचते.
खूप मोठया प्रतीक्षेनंतर शुभदाला आत घेण्यात येतं, ती ते पेपर दाखवते. ते बघताच अधिकारी चमकतो..
“तुम्हाला कल्पना आहे का? तुम्ही 500 करोडच्या संपत्तीचे मालक आहात??”
क्रमशः
3 thoughts on “घराणं (भाग 13) ©संजना इंगळे”