मिनलचा स्वतःवरच विश्वास बसेना, इतके दिवस या चित्रासाठी इतकी मेहनत केली पण आजवर जमलं नाही, मग आता शुभदाने असं काय केलं की सगळं चित्र बदलून गेलं??
चित्र पूर्ण झालं, सर्वांनी कौतुक केलं. इतक्या वेळ बसून राहिल्याने सर्वजण पाय मोकळे करायला निघून गेले.मीनल शुभदा जवळ जाते..
“शुभदा..अगं काय जादू केलीस?? जे काम आजवर जमलं नव्हतं ते आज कसं जमलं??”
“एवढंच समज की श्रापापासून मुक्ती मिळाली..”
एवढं म्हणत शुभदा निघून जाते, मीनल शुभदाच्या या बोलण्याचा अर्थ शोधतच निघून जाते.
आता शुभदाचा पुन्हा शोध सुरू होतो, पुस्तकाचा दुसरा भाग कुठे असेल??
“शुभदा…अगं मला आज जरा बाहेर जायचं आहे..थोडावेळ गॅरेज मध्ये थांबशील? मी येते एक तासाभरात…”
शुभदाच्या सासूबाई, मेघनाने शुभदाला विचारलं अन शुभदा लगेच तयार झाली. गॅरेजमध्ये बऱ्याच गाड्या होत्या, वेगवेगळी हत्यारं, टायर्स, ट्यूब वगैरे सामान पडलेलं होतं. सासूबाईंना कसं जमतं बुवा हे याचं शुभदाला आश्चर्यमिश्रित कौतुक वाटलं. तासाभरात मेघना परत आली. मेघनाच्या मागोमाग एक गाडी गॅरेजमध्ये आली.
“गाडीच्या इंजिनाचा आवाज येतोय अन खूप गरम होत आहे इंजिन…बघा काय ते..”
गाडीचा चालक मेघनाला सांगतो..
“तुम्ही बसा इथे मी चेक करते..”
मेघना त्यांना बसवून गाडी चेक करते, अन बाजूला येऊन शुभदाला म्हणते….
“पोलिसांना फोन लावावा लागेल..”
“का??”
“गाडीची नंबर प्लेट चुकीची आहे, आणि गाडीत चोरीचा माल दिसतोय..”
“बापरे, तुम्हाला कसं लक्षात आलं लगेच??”
“उभं आयुष्य या गाड्यांमध्ये गेलंय.. एवढं तर लगेच लक्षात येतं..”
मेघना चालक आणि त्याच्या सोबतच्या माणसांना शेजारी असलेल्या हॉटेल मध्ये जेवण करून यायला सांगते. तोवर पोलिसांना ती खबर देऊन ठेवते. शुभदासाठी हे सगळं भीतीदायक होतं, चालकाला समजलं तर जीवावरही उठेल हे माहीत असताना मेघनाने हिम्मत केली. शुभदा गाडीजवळ जाऊन बघते, गाडीच्या आत बराच माल दिसतो.
“आई हे बघा, काय काय माल भरलाय यांनी..”
“बघू..”
गाडीत जुन्या मुर्त्या, जुनी अवजारे, जुने फोटो, जुनी नाणी असा बराच माल असतो..
“ही तस्करी आहे, ऐतिहासिक वस्तूंची…आजकाल ह्या जुन्या वस्तूंना करोडोत विकलं जातं. परदेशी माणसं यात जास्त इंटरेस्ट दाखवतात..”
“म्हणजे आपलीच लोकं आपल्या ऐतिहासिक ठेव्यांचा लिलाव करतात??”
“हो, पैशासाठी माणूस काहीही करू शकतो..पण या दुराचाराला केवळ दुर्गुणी माणूस कारणीभूत नाही, तर सद्गुणी माणसाचं मौनही तितकंच कारणीभूत आहे. सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या सक्रीयतेला वाव देत असते..आपल्या लोकांनी हा ठेवा जपून कुठे ठेवलाय?? हाच ठेवा जेव्हा अमेरिकेच्या प्रदर्शनात मांडण्यात येईल तेव्हा मात्र आपलीच लोकं अभिमानाने त्याचे फोटो बघतील, पण त्यांना हे समजत नाही की हा ठेवा आपल्याजवळ असायला हवा होता..”
शुभदाला मेघनाचं एकूनएक वाक्य पटतं. आत असलेल्या वस्तू ती निरखून बघत असते, पण काचेतून काही गोष्टी अस्पष्ट दिसत असतात.
“आई, का कोण जाणे पण मला या वस्तू पहायची जाम ईच्छा झालीये, दार उघडून देता प्लिज??”
“ठीक आहे, पण लवकर आवर हा..पोलीस केव्हाही येतील..”
मेघना शुभदाला गाडीचे दार उघडून देते. आत असलेल्या एकेक वस्तू ती बघते. त्यातली काही चित्र तिला विचलित करतात. अगदी 1800 च्या शतकातील हुबेहूब प्रसंग एका चित्रकाराने चितारलेले असतात. इंग्रजांविरोधात केलेली चळवळ असो, खेड्यातील दैनंदिन जीवन असो…सर्व अगदी लाईव्ह चित्रित केल्यासारखं भासत होतं. शुभदाला कलाकाराचं मोठं कौतुक वाटतं. समोरचं चित्र मनात साठवून या चित्रकाराने प्रसंग अगदी हुबेहूब साकारले होते. भारताच्या लेण्यांवर जसे रामायण, महाभारतातले विविध प्रसंग चितारले होते त्यावरूनच या चित्रकाराने प्रेरणा घेऊन समोर चालू असलेल्या घटनांचे हुबेहूब चित्रण रेखाटले होते. त्यातच तिला एक कुटुंबाचं चित्र दिसलं. जवळपास 7-8 माणसांचं ते चित्र होतं. ती निरखून ते चित्र बघते, त्यातली स्त्री शिवलिंग जवळ घेऊन बसलेली असते. शुभदाचे हात थरथरायला लागतात, डोक्याला झिणझिण्या येतात, तिची वाचाच बंद होते.
“शुभदा…अगं काय झालं??”
“आई, हे चित्र…हे चित्र..”
“काय झालं या चित्राचं??”
“हे चित्र..आपल्या पूर्वजांचं आहे..”
“काय?? कशावरून??”
“सगळं नंतर सांगते…मला हे चित्र हवंय..”
“हे बघ, आपल्याला हे मिळणं शक्य नाही…हे सरकारी वास्तुत द्यावं लागेल..पोलीस येतीलच आता..”
या चित्रावर मालकी हक्क दाखवायला वेळ लागणार होता, शुभदा पटापट त्या सर्व चित्रांचे फोटो काढून घेते.
पोलीस येतात, बरीच गर्दी जमते, अखेर ते गुन्हेगार आहेत हे सिद्ध होऊन पोलीस त्यांना अन त्यांच्या गाडीत असलेला ऐवज घेऊन जातात. जाताना मेघनाला बक्षीस म्हणून रक्कम मान्य करतात..
“नाही साहेब, आपल्या पूर्वजांचा ठेवा जपणं हे आपलं कर्तव्य आहे, त्या बदल्यात बक्षीस नको…”
मेघनाने बक्षीस नाकारलं. पोलीस कौतुक करत निघून गेले.
मेघनाला शुभदाच्या या वागण्याने धक्का बसतो, ती शुभदाला उलट सुलट प्रश्न विचारते,
“आई, मी सगळं सांगेन, मला थोडा वेळ द्या..”
शुभदा ते चित्र घेऊन मीनल कडे जाते. कारण चित्रातलं मिनलला जास्त ठाऊक होतं.
“कुठलाही चित्रकार चित्राखाली स्वतःचं नाव लिहीत असतो.. यातही त्याचं नाव असेल बघ..आणि हे चित्र जरा चुकीचं बनलंय, म्हणजे बघ, रंगसंगती चुकल्या आहेत आणि मानवकृत्या चुकीच्या बनल्या आहेत..”
दोघीजणी चित्र झूम करून नाव शोधू लागतात. एका कोपऱ्याला “डेव्हिड” असं नाव असतं.
“डेव्हिडची चित्र?? अगं शुभदा हा 1800 च्या काळातील प्रसिद्ध चित्रकार होता. इंग्रजांनी खास भारतीय लोकांची चित्र चित्रित करण्यासाठी याला नेमलं होतं. डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना हुबेहूब चितरण्यात याचं प्राविण्य होतं.. गुगल वर याची माहिती मिळेल बघ..”
दोघीही लगेच त्याची माहिती गुगल वर शोधतात. त्याच्या चित्रांखाली असलेलं त्याचं नाव अन शुभदाच्या मोबाईल मधील असलेल्या फोटोखालचं नाव हुबेहूब होतं. शुभदाला खात्री पटते, हाच तो चित्रकार ज्याने दुर्गावतीला शिवलिंगाची पूजा करण्याबद्दल हटकलं होतं.
“पण एवढ्या मोठ्या चित्रकाराने हे चित्र चुकवावं म्हणजे मोठं नवल आहे..”
शुभदा मिनलकडे बघून फक्त असते, मनातल्या मनात म्हणते,
“कसं सांगू तुला, यालाच श्राप होता तो..”
शुभदा इतर फोटो बघते, त्यात एका चित्रात वेगळाच प्रसंग साकारला गेला होता. एका स्त्रीच्या हातात एक पुस्तक असतं, तिच्या चेहऱ्यावर घबराट असते, एक माणूस तिच्या हातातलं पुस्तक खेचत असतो..त्या पुस्तकाचे 2 भाग झालेले असतात, एक भाग दारात उभी असलेली एक स्त्री घेऊन बाहेर पळाण्याच्या मार्गावर असते, जो माणूस त्या पुस्तकाचा अर्धा भाग खेचत असतो त्याला मागून एक तरुण मुलगा थांबवत असतो..
शुभदाला लक्षात येतं, या चित्राचा ती एक अंदाज बांधायचा प्रयत्न करते, कारण पुस्तकाचे 2 भाग कसे झालेले असतात याची उकल या चित्रात असते.
डेव्हिड जेव्हा पूर्ण झालेल्या चित्राला फ्रेंम करून दुर्गावती च्या घरी द्यायला गेला असेल तेव्हा दुर्गावती च्या नवऱ्याला म्हणजेच दिगंबरपंतांना या पुस्तकाची माहिती समजली असेल. धर्म भ्रष्ट केला वगैरे आरोप लावून ते हे पुस्तक नष्ट करायला निघाले असतील..तेव्हा दुर्गावती ने पुस्तक वाचवण्याचा प्रयत्न केला असेल. पुस्तकाचे दोन तुकडे झाले असता दुर्गावती ने एक भाग उचलला असेल अन दुसरा भाग तरी जपला जावा म्हणून दारातली ती स्त्री ते उचलून बाहेर पळत असावी. दुर्गावतीचा मुलगा पांडुरंग पुस्तक वाचवण्यासाठी वडिलांना विरोध करत असेल. चित्रात पाहून हीच घटना घडलेली असावी अशी शुभदाला खात्री पटते.
पण ती दुसरी स्त्री कोण असावी?? तिने का हे पुस्तक वाचवायचा प्रयत्न केला असेल?? पुस्तकाच्या अवतारावरून पुस्तकाचे तुकडे होताना झटापट झालेली असावी हा संशय खरा ठरतो.
शुभदा मनोमन देवाचे आभार मानते, त्यानेच असा एकेक मार्ग दाखवलेला असतो. पण ती दुसरी स्त्री कोण असावी?? “पद्मिनी??” दुर्गावतीची बालपणीची मैत्रीण?? तीच, जिच्या मुलीचं, कांताचं दुर्गावती च्या मुलावर म्हणजेच पांडुरंग वर प्रेम होतं?? मग पांडुरंग ने हे पुस्तक वाचवून कांताकडे सोपवलं असावं?? आणि कांताची सून आल्यावर दुर्गावती ने अखेरचा श्वास घेतला असावा, कांताने सुनेला शहरात अभ्यासाला पाठवून पुस्तकाची उकल करायला लावलेली.
बऱ्यापैकी गोष्टी आता शुभदाच्या बुद्धीच्या आवाक्यात आल्या होत्या. आता फक्त उरलेला दुसरा भाग शोधणं गरजेचं होतं, कारण त्यात बरेच खुलासे असणार होते.
या काळात ऋग्वेद अन शुभदाचं वैवाहिक जीवनही सुरळीत सुरू होतं. ऋग्वेद नेहमी तिला म्हणायचा,
“तुझ्या डाव्या गालावरची तीळ माझा वीक पॉईंट आहे..इतकी सुंदरता कुठून आणलीस??”
“माझे पूर्वज एका दिव्य स्त्रीच्या सहवासात असल्यानेच हे तेज आलंय” असं ती सांगे..ऋग्वेदला काही समजत नसे पण हसत खेळत दोघांचा संसार चाललेला.
शुभदा तिच्या टेबलवर पुस्तकाचा पहिला भाग पुन्हा एकदा चाळते. तिथेच तिला मिळालेली दुर्गा देवीची तसबीर ठेवलेली असते. दिगंबरपंत अचानक येतात अन टेबलवरील फोटो पाहून नमस्कार करतात.
“ही तसबीर बरीच जुनी दिसतेय..कुणी दिली??”
“रुद्र शंकर गुरुजींनी दिली..”
“जुन्या काळी काही महत्वाचे ऐवज जपण्यासाठी याचा वापर करत..”
एवढ्यात दिगंबरपंतांना फोन आला अन ते बाहेर निघून गेले. शुभदा फोटोकडे पुन्हा एकदा बघते अन तिला अचानक आजीचे शब्द आठवतात…
“हा नुसता फोटो नाही, तुझ्या यशाचा मार्ग आहे त्यामागे..”
“काय अर्थ असेल आजीच्या वाक्याच्या?? यशाचा मार्ग?? आणि त्यामागे म्हणजे??”
शुभदा फोटो हातात घेते, फ्रेम बरीच जाडजूड असते. ती फ्रेम उलटी करते, त्या लाकडी चौकोनामधून काही जीर्ण कागद बाहेर आलेले असतात. शुभदा एकदम चमकते, पटकन ती फ्रेम खोलते अन खोलताच 50-60 पिवळसर पानं घळाघळा टेबलवर पडतात..
क्रमशः
2 thoughts on “घराणं (भाग 10) ©संजना इंगळे”