राजेश खिन्न मनाने मुलाला भेटून परत आले होते. खरं तर दूरगावी पाठवलेल्या आपल्या मुलाला आपण भेटल्यावर खूप आनंद होईल असं वाटलेलं, पण राजेशना जेवढी ओढ आणि तळमळ होती तेवढी मुलात वाटली नव्हती. आल्या आल्या बायकोने त्यांना पाणी दिलं, त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नता तिच्या लगेच लक्षात आली. तिने काहीही न विचारता शांत बसणं पसंत केलं.
थोड्या वेळाने राजेशरावांनीच विचारलं,
“जेवण झालं तुझं?”
“हो झालंय, तुम्हाला वाढते आता”
“आई जेवली का?”
“हो..आजही विचारत होत्या, राजू येत का नाही खोलीत म्हणून..आज तर त्यांच्या मेंदूचं नियंत्रण फारच बिघडलेलं, मला म्हणे राजुला लपवून ठेवलंय तू..मला भेटू देत नाहीस म्हणे..”
“अरे देवा..रोज म्हणतो म्हातारीजवळ बसून थोडं गप्पा मारू, पण कसलं काय, कुठे वेळ मिळतो मला. काल कचेरीत कामाला गेलो, आल्यावर घाईघाईत जेवण केलं, लगेच सुयशला भेटायला जायचं म्हणून गाडी पकडली..परवाचा दिवसही असाच गेला, म्हातारीला भेटतो आता.”
राजेशराव जेवण करून हात धुतात, ऊन लागल्याने त्यांना भोवळ येते, ते बायकोला आवाज देतात तशी ती धावत येते, त्यांना पडायला लावते आणि पटकन पाणी आणून देते. राजेशराव जरा पडतात अन त्यांना बरं वाटतं.
“कसला एवढा विचार करताय? आल्यापासून बघतेय कसल्यातरी विचारात आहात..”
“वाटलं नव्हतं सुयश इतका दुर्लक्ष करेल म्हणून, हॉस्टेलला जाताना गळ्यात पडून पडून रडलेला, पण आता? 5 मिनिटही माझ्याशी नीट बोलला नाही”
“आहो कामात असेल तो कसल्या..”
“ज्या आई बापाने लहानाचं मोठं केलं त्या बापासाठी वेळ नाही? असं काय महत्वाचं काम होतं त्याला? पिलांनी आकाशात भरारी घेतली की ते घरटं विसरतात हेच खरं..”
राजेशराव बोलून तर गेले, पण बोलता बोलता एकदम काहीतरी गवसलं..डोळे पुसत तडक म्हातारीकडे गेले आणि तिच्याशेजारी बसले.
“लेकरा..किती दिवस झाले भेटला नाही, किती हुरहुर लागलेली जीवाला.. बरा आहेस ना तू??”
“आधी नव्हतो बरा..आता डोळे उघडले..”
म्हातारीचं समाधान होईस्तोवर राजेशरावांनी तिच्याशी गप्पा मारल्या, राजेशलाही समाधान वाटलं. म्हातारीशी बोलून येताच बायको म्हणाली,
“अहो, सुयशचा फोन होता, त्याला खूप वाईट वाटतंय झ तुमच्याशी बोलता आलं नाही म्हणून, खरं तर त्याचा त्या वेळी निकाल होता आणि तो त्याच गडबडीत होता, सोबतच रिझल्ट चं टेन्शन..त्यामुळे नीट बोलता आलं नाही त्याला, माफी मागितली त्याने..”
राजेशराव म्हणाले,
“असो..शेवटी बाप तसा बेटा..”
खूप छान