घरटं

 अवनीच्या ध्यानीमनीही नव्हतं तिच्या आई बाबांमध्ये काय वादळ सुरू आहे ते..10 वर्षाची पोर ती, आई आणि बाबा नेहमी आपल्यासोबतच असतील अश्या सहज समजुतीने वावरत होती…पण तिला काय माहीत की कोर्टात अवनीच्या कस्टडी साठी आई बाबा भांडताय म्हणून…

निशा आणि जयेश मध्ये काहीही सुरळीत नव्हतं, त्यांचे वाद घटस्फोटापर्यंत येऊन पोचले होते…घटस्फोट घेऊन अवनीची कस्टडी घ्यायची असा जयेशचा विचार होता. निशा ला राहतं घर देऊन टाकायचं आणि आपण मुलीसोबत नव्या घरात जायचं त्याने ठरवलं…जयेशने नवीन घर पाहायला सुरवातही केलेली..असंच एकदा एका आलिशान फ्लॅट मध्ये agent त्यांना घेऊन गेला. जयेशने अवनीलाही सोबत घेतलं..निशाला तर याची कुणकुणही नव्हती, लेक आपल्यासोबतच असेल यावर ती ठाम होती, जयेशने गुपचूप सगळा कारभार करायचं ठरवलेलं..

नवीन फ्लॅट बघून अवनी खुश झाली..

“बाबा आपण इथे राहायला यायचं?”

“हो बाळा…आवडलं तुला घर??”

“हो…ही माझी खोली, ही आई आणि तुमची खोली..”

“बाळा आई नाही येणार..”

“का??”

तिला काय उत्तर द्यावं जयेशला कळत नव्हतं, इतक्यात एजंट चा आवाज आला..

“हुररर…हट्ट….शुक्…”

“काय झालं??”

“काही नाही…एक खिडकी उघडी होती फ्लॅट ची, एक कबुतर आत आलेलं…हुसकवलं त्याला..”

“खिडकी लावून घ्या, नाहीतर यायचं परत..”

“हो…कसं आहे ना, नवीनच फ्लॅट आहे, अजून कुणी राहायला आलेलं नाही…पण तुम्ही काळजी करू नका.तुम्हाला देतांना सगळी साफसफाई करून मग देऊ..”

हे बोलणं चालू असतानाच अवनी आनंदाने ओरडली..

“बाबा…हे बघा..”

किचन च्या बेसिन मध्ये कबूतराने एक घरटं बनवलं होतं, आणि त्यात दोन अंडी होती…

“बाबा…त्या कबूतराची पिल्लं असतील ना त्या अंड्यात??”

“हो…मिस्टर देसाई…फ्लॅट देताना हे सगळं काढून टाका हा..”

अवनी हिरमुसली…तिचं मन काही मानत नव्हतं…अंडी आत, आणि त्यांच्या आईला बाहेर हाकललं गेलं होतं…थोड्याच वेळाने त्यांची आई कबूतरीण परत आली… खिडकी बंद पाहून ती कासावीस झाली…आत आपल्या पिल्लांकडे जाता येईना…त्यांना आता कोण उबवेल? बाहेर आल्यावर कोण खाऊ घालेल??आत घुसमटून, भुकेने व्याकुळ होऊन ती मरतील…काय वाटलं असेल त्या पक्ष्याला??? ती जोरजोरात खिडकीवर टोचे मारू लागली….पिल्लाकडे जाण्यासाठी धडपडू लागली…

अवनी ते पाहत होती… देसाई आणि जयेश बुकिंगची किंमत आणि हफत्यांची बोलणी करत होते…तिथून परत जायला सगळे निघाले तेव्हा अवनीच्या डोळ्यात पाणी होतं..

“काय झालं बाळा??” फ्लॅटला कुलूप लावता लावता जयेशने विचारलं..

“बाबा…आता त्या पिल्लांचं काय होणार?? त्यांच्या आईला तर तुम्ही दूर केलं….ती पिल्लं आत मरून जातील बाबा..”

जयेश जिना उतरता उतरता अवनीला शांत करत होता…त्याचे पावलं थबकू लागली…आणि अचानक पायरीवरच थांबला…त्याच्या काळजात धस्स झालं…

“अवनी त्या कबुतर आणि पिल्लांसाठी इतकी भावुक होत होती…आपण तर खऱ्या आयुष्यात तिच्या आईला तिच्या पिल्लापासून दूर करत होतो..”

त्या क्षणी धरणीने आपल्याला पोटात घ्यावं असं त्याला वाटू लागलं…तो मागे वळला…फ्लॅट चे दार उघडले…आत गेला अन खिडकी उघडली…खिडकी उघडताच ते कबुतर आत आलं आणि त्याच्या अंड्यांजवळ जाऊन बसलं…

अवनीच्या डोळ्यात खूप सारा आनंद होता..ती खुशीने उड्या मारू लागली…

जयेश म्हणाला…

“अवनी बाळ, ती खोली तुझी… आणि ती दुसरी माझी अन तुझ्या आईची…”

“म्हणजे आईपण येणार ना??”

“हो बाळ…पिल्लाला आईपासून दूर करण्याचं पातक करण्यापासून वाचवलं तू मला..”

Leave a Comment