गाजर हलवा

 “अगं झाली का तयारी? बॉस येतीलच अर्ध्या तासात..”

“हो हो, हे काय..”

मालविका सुंदर अश्या पोपटी साडीत आपल्या रेशमी केसांची वेणी घालून समोर आली अन कार्तिक तिच्याकडे बघतच राहिला. दीड वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. मालविका आईकडे असताना एका ठिकाणी अकाउंटंट म्हणून नोकरी करत होती. इकडे आल्यावर मात्र मनाजोगती नोकरी काही मिळेना. एक तर इथे मोठ्या शहरात स्पर्धा खूप, आणि ओळखिशिवाय काम होत नसे.  कार्तिकच्या कंपनीत अकाउंटंट ची जागा निघालेली, मालविकाला कार्तिकच्या कंपनीत काम मिळालं तर दोघांना खूप सोयीचं होईल, पगारही चांगला मिळेल या अनुषंगाने मालविका अन कार्तिकचा तसा प्रयत्न चालू होता. अश्यातच कार्तिकचा बॉस कामानिमित्त कार्तिकच्या घरी येणार होता, हीच संधी साधून बॉस समोर मालविकाच्या नोकरीचा प्रस्ताव मांडावा असं ठरलं..”

अर्धा तास बाकी असताना बॉस चा फोन आला,

“कार्तिक सर, मी येतोय अर्ध्या तासात..एक विनंती आहे..वहिनींना छानपैकी हलवा बनवायला लावा, त्या दिवशी तुमच्या डब्यातल्या हलव्याची चव म्हणजे..अहाहा…सॉरी पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही..”

“अहो सर त्यात काय, हक्काने सांगा.. या तुम्ही मी वाट बघतोय..”

कार्तिकने पटकन मालविकाला कळवलं..

“अहो…हलवा काही असा पटकन होत नसतो..गाजर आणण्यापासून सुरवात आहे..आता बाजारात जाऊन आणायचं म्हटलं तर अर्धा तास लागेल..”

“काय यार तू, घरात आणून ठेवायचे ना..”

“आता मला काय माहीत तुमचे सर हलव्याची फर्माईश करतील म्हणून? मी आधीच ढोकळे आणि चटणी बनवून ठेवलेली..”

दोघांची चिडचिड होत होती, इतक्यात खालून भाजीवल्याचा आवाज आला..

“देव पावला बाई..फक्त त्याच्याकडे गाजर असली म्हणजे झालं..”

नशिबाने त्याच्याकडे गाजर मिळाली, मालविका पदर खोचून तयारीला लागली. गाजर धुतले, पटकन किसले, कढईत तूप गरम करायला ठेवलं, त्यात गाजराचा किस परतवला, बाजूला काजू बदाम कापायला घेतले..किस मऊ होताच दूध टाकलं, दूध आटत असताच शेवटी साखर, वेलदोडे आणि थोडं केशर घातलं. हे सगळं ती साडीतच करत होती, धावपळीत साडीला बरंच खरकटं चिटकलं होतं, घाईघाईत हात सवयीप्रमाणे साडीलाच पुसले गेले, साडी काही ठिकाणी ओलसर तर काही ठिकाणी तुपकट झालेली. 

दारावरची बेल वाजली, कार्तिकने दार उघडताच बॉस चं स्वागत केलं. 

“अहाहा..काय सुगंध दरवळतोय..वा…”

“हो सर..तुम्हाला आवडतं म्हणूनच…बसा ना..”

कार्तिक आणि बॉस मध्ये गप्पा होत असतानाच मालविकाने मस्त मोठ्या ताटलीत ढोकळे, चटणी आणि एका मोठया वाटीत बदाम पेरलेला हलवा पुढे केला..बॉस आधीच खाद्यप्रेमी, त्यात इतका छान नाश्ता समोर येताच तो एकदम खुश झाला.

दोघांनी पोटभर खाल्लं, मालविकाने आग्रह करून करून जास्तच वाढलं. शेवटी दोघांनी हात धुतले अन बॉस ढेकर देत पुन्हा सोफ्यावर विराजमान झाला.

“वहिनी, काय सुंदर बनवतात हो तुम्ही, खरंच तृप्त झालो आज..”

हीच योग्य संधी आहे ओळखत कार्तिक विषय काढायला सुरवात करणार तोच त्याचं लक्ष समोर मालविकाच्या बरबटलेल्या साडीकडे गेलं.त्याने डोक्याला हात लावला, 

“फर्स्ट इम्प्रेशन असं असेल तर काय व्हायचं? कितीही छान खायला बनवलं तरी नोकरीच्या ठिकाणी माणूस किती नीटनेटका राहतो याला महत्व असतं..” कार्तिक आतल्या आत राग काढत होता..त्याने मालविकाला खुणवायचा प्रयत्न केला..मालविकाला काही समजेना, ती तशीच उभी..तीही हातवारे करत काय काय म्हणून विचारत होती. दोघांच्या खानाखुणा बॉस च्या नजरेत आल्या..

“काय झालं काय खाणाखुणा चालल्यात??”

“काही नाही, सर..एक विनंती होती, आमची मालविका आपल्या कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरी करू इच्छिते. तिला अनुभवही आहे कामाचा आणि चांगलं काम करेल ती..तर तुम्ही एकदा…”

“अच्छा..म्हणून खाणाखुणा चालू होत्या का..”

“नाही सर..माफ करा पण आज धावपळ झाली, ही नेहमी अशी राहत नाही, आज स्वयंपाक करताना साडी जरा खराब झाली हिची..तिला खूण करून हेच सांगत होतो की साडी बदलून ये..”

“अच्छा..काय कार्तिक..अरे माणसाची त्याच्या कापड्यावरून थोडीच पारख करायची असते? आणि नोकरीचं म्हणशील तर वहिनी, तुमची नोकरी पक्की..मी शब्द देतो..”

दोघेही आनंदले, कार्तिकने सरांचे आभार मानले, मालविकानेही हात जोडून धन्यवाद केले.

“सर, मुलाखत न घेता तुम्ही सरळ नोकरीवर घेतलंत..खरंच तुमचे उपकार..”

“कोण म्हणे मी मुलाखत घेतली नाही ते? आज मी जे पाहिलं ती मुलाखतच होती की..वहिनींना ऐनवेळी हलवा सांगितला, अश्यावेळी वेळेचं बरोबर नियोजन करून त्यांनी वेळेच्या आत हलवा तयार केला..आणि त्यांची ही बरबटलेली साडी त्यांच्या मेहनतीचं आणि कर्तव्यदक्षतेचं प्रमाण देतेय..हीच खरी मुलाखत.. प्रत्यक्षात माणूस कठीण प्रसंग कमी वेळेत कसा मॅनेज करतो याला महत्व आणि वहिनींनी त्यात यशस्वी होऊन दाखवलं..”

बॉस गेला आणि बायकोच्या गुणांशी कार्तिकची नव्याने ओळख झाली.

Leave a Comment