खेळ मांडला (भाग 24)

भाग 1

प्रमिलाचा नवरा नशेत होता, तो बरळू लागला..

“सागर भाऊ, तुमची बहीण गरोदर होती म्हणे लग्नाआधी..”

“दाजी तोंड सांभाळून बोला..”

प्रमिलाच्या नवऱ्याला आवरणं कठीण होत होतं. टीपॉय वरील सर्व सामान त्याने झटकून दिलं आणि वस्तूंची तोडफोड करू लागला..

“अहो ऐका माझं..अहो..”

“अरे काय ऐकू? मला वाटलं आई बापाविन वाढलेली पोर..तुझ्यावर दया दाखवली अन तू..”

“अहो ऐका माझं, घरी चला मी सगळं सांगते..”

खुशी, सागर आणि प्रमिलाला समजलेलं असतं की याने गावाकडून माहिती काढली आहे, आणि प्रमिला कडे असणाऱ्या गरोदर आरोही बद्दल सर्वांनी सांगितलं असेल आणि प्रमिलाचा नवरा मात्र प्रमिलालाच ती गरोदर बाई समजत होता.

सागरला मात्र आपल्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडताना पाहून राहवलं नाही,

“दाजी, ताई गरोदर नव्हती….ती…”

प्रमिलाने सागरचा हात धरून मागे ओढलं आणि पोटतिडकीने त्याला काहीही न म्हणण्याची खूण केली. सागर आधीच चिडला होता, आरोहिमुळे प्रमिलावर संशय घेतला जात होता. दाजींना सगळं खरं सांगितलं असतं पण तिथे 3 व्यक्ती होत्या, मानव, त्याची बायको आणि आरोही. हो गोष्ट बाहेर आली तर…

आरोहीला धक्का बसून तिला काहीही होऊ शकलं असतं… नकुल त्या बाळासाठी म्हणजेच आर्वीसाठी भांडला असता, मानव ला तर हा धक्का सहनच झाला नसता..आणि त्याची बायको? तिचा काहीएक दोष नसतांना तिचा संसार उध्वस्त झाला असता.

“आता काही बोलू नको सागर..तुझ्या बहिणीला आता तुझ्याकडेच ठेव…”

दाजी तावातावाने प्रमिला जवळ जातात, त्यांचा संताप अनावर झालेला असतो..

“काय गं ए भवाने, लाज नाही वाटली तुला असलं काही करतांना? अशी बाई माझ्या गळ्यात मारली गेली ..कुठे तोंड दाखवू मी आता..” त्यांचा आवाज खूप चढला होता आणि प्रमिलाला ते एक चपराक टाकायला गेले तोच…

तोच आरोहीने त्यांचा हात पकडला..

“थांबा…सत्य जाणून न घेता घाणेरडे आरोप करू नका. सत्य ऐकायचं आहे ना तुम्हाला? ऐका तर…ती गरोदर मुलगी मी होते…”

मानव हे ऐकून मटकन खाली बसतो, नकुलला सगळं माहीत होतं पण आरोही ला सगळं आठवलं याचा त्याला जबरदस्त धक्का बसतो..खुशी, सागर हतबल होऊन ऐकू लागतात. दाजींचा नशा एकदम उतरतो.. कान देऊन ते ऐकू लागतात.

“होय…मी होते..हा मानव..मी याच्या ऑफिसमध्ये कामाला होते, आमचं प्रेम जुळलं, आम्ही बिझनेस टूरला गेलो. तिथे आमच्याकडून जे व्हायला नको तेच झालं. माझ्या घरी आईला समजलं की मी आणि मानव एकत्र होतो तेव्हा तिने मला धमकी दिली की मानवशी पुन्हा काहीच संबंध ठेवायचे नाहीत, नाहीतर आई तिचं काही बरेवाईट करून घेईल. मला मामा मामीकडे पाठवलं…ही जी समोर उभी आहे ना, तुमची सरिता मावशी..हीच माझी मामी..गावी मामा मामीकडे गेल्यावर मला समजलं की मला दिवस गेलेत. बाळाचं काय करायचं हा प्रश्न असतानाच मामा मामीने निर्णय घेतला की बाळाला आपण वाढवायचं, अश्या कठीण परिस्थितीत माझी ही मैत्रीण, प्रमिला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. गरोदरपणात मोठं पोट घेऊन मी तिच्याकडेच बसून असायची. तेव्हा कुणी मला पाहिलं असेल आणि त्या घरात फक्त प्रमिला राहते म्हणून तिच्यावर आरोप झाले असावे. नंतर बाळ जन्माला आलं.. मी वापस जात असताना मामा, मामी आणि माझा अपघात झाला. माझं बाळ गेलं.मी कशीबशी वाचले..मामी कशी वाचली आणि ती असं तोंड लपवून मानवकडे कामाला का आहे हा प्रश्न मलाही आहे…अपघातात माझी स्मृती गेली होती, नकुलने मला अपघातातून वाचवण्यात मदत केली आणि मला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं..त्या दिवशी त्या डोंगरावर माझ्या जुन्या स्मृती अचानक जागृत झाल्या, मला सगळं आठवायला लागलं…त्या जागेशी खूप भावना जोडल्या गेल्या होत्या माझ्या..पण मी मौन बाळगणंच योग्य समजलं…पण आज मला माझं मौन तोडावं लागलं…समजलं आता सत्य? आताही प्रमिला वर आरोप करणार?”

दाजी हात जोडून प्रमिला समोर उभे राहतात,

“माफ कर प्रमिले, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना तसं झालेलं माझं..”

प्रमिलाला या गोष्टीकडे लक्ष नसतंच मुळात, आरोहीला अर्धं सत्य तर समजलं, पण तिचं बाळ अपघातात गेलं नव्हतं, त्याला मी अनाथाश्रमात सोडलं आणि ते नंतर मानवच्या घरी गेलं हे तिला माहीतच नव्हतं. जे बाळ अपघातात गेलं असं ती समजतेय ते आज समोर उभं आहे..ती मुलगी आर्वी आहे…हे सांगावं का आरोहीला? काय करावं??

मानव आरोही समोर येतो आणि तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवतो, धाय मोकलून रडतो…

“आरोही, आपलं बाळ? आपल्या दोघांचं बाळ? आरोही…मी का शोधलं नाही तुला…तू इतक्या मोठ्या दिव्यातून जात होतीस आणि मी मात्र हतबल होतो…मला का नाही सांगितलं की तुझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय.. तुला मी सोडुन दिलं असतं का? अगं जीवापाड जपलं असतं तुला आरोही….आरोही हे काय होऊन बसलं आरोही…” मानव मधला बाप आज जन्माला यालाही अन तत्क्षणी मेलाही….

नकुलला सुदधा हा धक्काच असतो, तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून आपले बॉसच आहेत…मानव आहे आरोहीच्या बाळाचा बाप..नकुल मनाशीच विचार करू लागला..”पण यात आरोहीची काय चूक? तिची स्मृती गेलेली..तिची काय चूक? तिने प्रेम केलं..तिची काय चूक?”  नकुलने मौन बाळगणं योग्य समजलं..

प्रमिला सारखी आर्वी कडे बघत होती, ज्या बाळाबद्दल हे आक्रोश करताय ती तर समोर उभी…आर्वी हे सगळं बघून खूप हादरली होती, तिच्या वडिलांच्या आयुष्यात असं काही झालेलं हे ऐकूनच तिला धक्का बसला..आरोही बद्दल वाईटही वाटलं..

या सगळ्यात उध्वस्त झाली ती मानवची बायको, ती चक्कर येऊ खाली पडली.. आर्वीने तिला सावरलं,

“आई, आई काय होतंय? आई..”

प्रमिला ते बघतच राहिली… सत्य जरी समोर आलं असलं तरी अर्धं सत्य अजून प्रमिला, सागर आणि खुशीच्या पोटातच होतं.

“ते बाळ अपघातात गेलं..” इथेच विषय सम्पतो..हेच चित्र आता प्रमिलाला समोर ठेवायचं होतं.. कारण आर्वी ही आरोहीची मुलगी आहे समजलं तर तिच्यावरून कितीतरी वाद निर्माण होतील..

मानव, त्याची बायको, आर्वी आणि शुभम घरी जातात. नकुल आणि आरोहीही घरी परततात..प्रमिला तिच्या नवऱ्याला माफ करून परत पाठवते. सागर, खुशी आणि प्रमिला.. एकत्र बसले असता बोलू लागतात..

“कधी ना कधी हे होणारच होतं..”

“पूर्ण सत्य बाहेर आलं असतं तर मोकळं झालो असतो..ह्या असत्याचा भार आता जड होऊ लागलाय..”

“सत्यासाठी केलं गेलेलं असत्य हेही सत्यच..”

“काय सत्य?”

“तू पाहिलं नाहीस? मानवची बायको, आर्वी तिलाच आपली आई मानते…तिचाही आर्वी वर प्रचंड जीव.. आता वयाच्या या टप्प्यावर त्यांची ताटातूट करायची का?”

“पण आरोहीला मातृसुख कधी मिळणार?”..

“प्रत्येकाला प्रत्येक सुख मिळेल अशी मागणी चुकीची आहे..शेवटी नशिबावर आहे आता सगळं..”

इकडे नकुल हे सत्य जाणून घेतल्यावर काय म्हणेल ही आरोहीला चिंता होती. पण नकुल मात्र नेहमीसारखाच वागत होता. शेवटी तिनेच विषय काढला..

“नकुल…माझा भूतकाळ…”

“आरोही, तू काहीही स्पष्टीकरण देऊ नको…तुला बाळ होतं हे मला आधीपासूनच माहीत होतं..”

“काय?? कसं?”

“तुझा अपघात झाला तेव्हा तुला हॉस्पिटलमध्ये नेताना मी तुझ्या तोंडून शब्द ऐकले होते..माझं बाळ, माझं बाळ म्हणून. तुला माहीत नसेल पण त्या बाळासाठी मी खूप प्रयत्न केले…त्याला शोधण्याचे..”

“अहो पण ते बाळ तर अपघातात…”

“अपघाताच्या वेळी मी होतो, तिथे कुठलंही बाळ नव्हतं… नंतर मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला..कारण मला ते बाळ हवं होतं.. तुझं होतं ते आणि पर्यायाने माझंही…”

“बाळ अपघातात गेलं नाही, मग गेलं कुठे?”

“एका अनाथाश्रमात होतं पण एका आजाराने ते गेलं..”

आरोहीचे अश्रू अनावर होतात, आपल्या बाळाचे झालेले असे हाल तिला विचारानेच त्रास होऊ लागतो.. नकुल मोठ्या मुश्किलीने तिला शांत करतो…आरोही शांत होते आणि नकुलला विचारते..

“एवढं सगळं माहीत असून तुम्ही माझ्याशी लग्न केलं?”

“दोन समदुखी माणसांना एकमेकांची साथ पुरेशी असते आरोही..”

आजवर तडजोड म्हणून आरोही नकुल सोबत दिवस काढत होती, पण नकुलच्या चेहऱ्यामागे असलेला समजूतदार आणि प्रेमळ चेहरा तिला आज पहिल्यांदा दिसला. स्वतः इतक्या दुःखांतून गेलेला असताना दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा नकुल…केवळ बायकोचा गर्भ म्हणून त्याचा बाप कुणीतरी दुसरा असताना त्या बाळाला मिळवण्याचा प्रयत्न करणारा नकुल…तो बाप म्हणजे आपलाच बॉस आहे हे समजूनही त्यात कुणाचीही चूक नाहीये इतकी समज दाखवून शांत राहणारा नकुल….आज आरोही खऱ्या अर्थाने नकुलच्या प्रेमात पडली… कोण म्हणतं प्रेम पुन्हा होत नाही?

बाहेरचा वादळी पाऊस शांत झाला होता. वादळ शमून गेल्यानंतर जाणवणारी शांतता जास्त भयानक वाटते. वादळ शांत झालं होतं, पाऊस थांबला होता पण जागोजागी चिखल साचला होता, काही वृक्ष कोलमडून पडली होती, पिल्लं भेदरून गेली होती आणि काहींची घरटी उध्वस्त झाली होती…

क्रमशः

भाग 24
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-24/

भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

8 thoughts on “खेळ मांडला (भाग 24)”

Leave a Comment