“तुम्हाला मामी म्हटलं तर चालेल?”
इतका वेळ निर्धास्त असलेल्या सरिता मावशीला हे ऐकून एकदम धक्का बसला, इतरांनाही प्रश्न पडला की आरोही असं का विचारतेय.
“म..मा…मामी? मी..मला??”
“हो..तुम्हाला मामी म्हणू?”
सरिता मावशीला आता तर घामच फुटला, सगळं पितळ उघडं पडणार, मी घराच्या बाहेर होणार आणि आर्वी..आर्वी पासून मी दूर जाणार…
“माझी आई सांगायची, मला एक मामी होती..खूप छान स्वयंपाक बनवायची, सुगरण होती ती…अगदी तुमच्यासारखी, तिने मामीचं जे वर्णन केलं होतं ना, तुम्हाला बघून मला माझ्या मामीचीच आठवण झाली बघा, म्हणून म्हटलं की…”
“अच्छा असं आहे काय, चालेल की..मामी म्हण मला..”
सरिताचा जीव पुन्हा एकदा भांड्यात पडला. नकुल आणि आरोही गाडीत बसून परत गेले.
____
प्रमिला खूप दिवसांनी आपल्या भावाकडे आली होती. सागरची बायको खुशी गरोदर होती. प्रमिलाचीही मुलं मोठी झालेली, पुण्यात हॉस्टेलवर राहून शिकत होती. प्रमिला एकटीच सागरकडे आलेली. बहीण इतक्या दिवसांनी आली म्हणून खुशी आणि सागर आनंदात होते. दोघांनी मिळून ताईचा यथोचित पाहुणचार केला.
“ताई यावेळी महिनाभर कुठेही हालायचं नाही हं..”
“बरं बाबा..”
प्रमिला तिच्या खोलीत सामान ठेवते आणि फ्रेश व्हायला जाते.
सागर मोबाईल मध्ये काहीतरी करत होता, खुशीने विचारलं,
“काय हो, वैतागलेले दिसताय..”
“माझ्या मोबाईल चा स्टोरेज गं, रोज काही ना काही डिलीट करावं लागतंय, कुठे जातोय इतका स्टोरेज कळत नाहीये..”
सागर मोबाईल चा स्टोरेज पुन्हा चेक करतो, खोलवर जाऊन चेक केल्यावर त्याला समजतं की जास्तीत जास्त स्टोरेज स्पेस ही ऑडिओ फाईल्स ची आहे..
“ऑडिओ फाईल्स? कसल्या आहेत इतक्या ऑडिओ फाईल्स?”
सागर चेक करतो, त्यात कॉल रेकॉर्डिंग च्या ऑडिओ फाईल्स दिसल्या.
“मी कॉल रेकॉर्डिंग कधी ऑन केलेलं? माझ्या माहितीत मी असं काही करत नाही..”
इकडे खुशी घाबरते, ती सेटिंग काही वर्षांपूर्वी तिनेच केलेली..आणि नंतर बदलण्याचं विसरली. कॉल झाल्यावर कॉल रेकॉर्डिंग चं नोटिफिकेशन यायचं पण सागरच्याही ते इतकं लक्षात आलं नाही, त्याने पहिली सर्वात मोठी ऑडिओ फाईल डिलीट करायला घेतली, ज्यात प्रमिला आणि सागरचं आरोही बद्दल संभाषण असतं ती…पण सहज त्याला काय वाटलं कोण जाणे, त्याने मोठ्या आवाजात ती क्लिप सुरू केली..
“हे गुपित फक्त आपल्यात राहील…आरोहीला बाळ आहे आणि ते मानवकडे आहे हे फक्त आपल्याला माहितीये..”
आवाज ऐकून प्रमिला धावतच आली..
“सागर, काय प्रकार आहे हा?”
सागरला सर्व समजतं, तो खुशीवर प्रचंड संतापतो..
“हे सगळे तुझेच धंदे आहेत..का केलंस असं? का माझ्या फोन मध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू केलं? तुझा माझ्यावर संशय होता का? माझ्यावर नजर ठेवत होतीस का तू??”
“सागर माझं ऐकून तर घे..ते मी नकुल साठी..”
“नकुल? वाटलंच, त्याचं नाव कसं आलं नाही अजून…म्हणजे तुझं आणि त्याचं लफडं सुरू आहे तर…आणि नजर मात्र माझ्यावरच, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा..तेच म्हटलं, कॉलेजचे मित्र तुम्ही, फक्त मैत्री कशी असू शकते तुमच्यात? उगाच नाही इतका वेळ घरी चकरा मारत तो…मी असतो तेव्हा तर ठीक आहे पण मी नसताना येत नसेल कशावरून??”
“सागर….” प्रमिलाचे डोळे लाल झालेले असतात, ती जोरात जिना उतरत सागर समोर येते आणि खाडकन त्याच्या कानशिलात लगावते..
“तुझ्या जिभेला काही हाड?? स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय तू? तोंडाला येईल ते बोलतोय? अरे बाप होणार आहेस तू आता…”
सागर भानावर येतो, रागाच्या भरात तो खुप काही बोलून गेलेला असतो. खुशी एकीकडे रडत असते, प्रमिला तिच्याजवळ जाऊन तिला शांत करते..
“खुशी, जे काही असेल ते सांगून टाक…”
“मी काय सांगते ते आता नीट ऐका.. होय, मीच सागरच्या मोबाईल मधून कॉल रेकॉर्डिंग चा ऑप्शन सुरू केलेला. नकुल, माझा कॉलेजचा मित्र. त्याची बायको आरोही, त्याला ती ज्या अवस्थेत सापडली होती तेव्हा सोबत एक बाळही होतं. नंतर त्या बाळाचा थांगपत्ता लागला नव्हता, आरोही आता आई बनू शकत नव्हती, पण नकुलला आरोहीचं ते बाळ हवं होतं, त्याला बाप बनायचं होतं…”
“काय?” प्रमिलाच्या कानात कुणीतरी गरम शिसं ओतलं असा भास तिला झाला..
“होय, त्यासाठी त्याने मला तुमच्याकडुन माहिती काढायला लावली…त्याला माहित होतं की गावी प्रमिला ताई आणि सागर हेच त्या सर्व घटनेला साक्षीदार म्हणून होते ते..”
प्रमिला मटकन खाली बसते..नकुलला सगळं सत्य समजलं तर? आता…याचा परिणाम..
“प्रमिला ताई, मी सगळं रेकॉर्डिंग ऐकलं…मला सर्व गोष्टी समजल्या, सगळी गुपितं समजली…पण जेव्हा मी विचार केला की हे गुपित बाहेर येईल तेव्हा कितीतरी आयुष्य उध्वस्त होतील.. तेव्हा मात्र मी नकुलला खोटं सांगितलं.. बाळ या जगात नाहीये असं सांगितलं आणि विषय तिथेच सम्पवला..”
“खुशी, खरं बोलतेय ना तू? खरंच त्याला काही कळलं नाही ना?”
“नाही ताई, विश्वास ठेवा माझ्यावर..”
हे सगळं ऐकून सागर खजील होतो. त्याला खूप अपराधी वाटतं.. तो खुशीची माफी मागतो आणि खुशीही त्याला माफ करते. कारण गोष्टी ताणून धरायच्या नसतात हे तिच्या मानसशास्त्राच्या अभ्यासाने तिला चांगलंच शिकवलं होतं.
तिघेही या विषयावर चर्चा करतात,
“ताई, आपण ही गुपितं जपली आहेत पण उद्या हे सगळं कधी न कधी बाहेर येईलच..आरोहीला जरी काही आठवत नसलं तरी तिला समजेल ना की आपल्याला मूल होतं..त्याला इतकी वर्ष दूर ठेवलं म्हणून किती त्रास होईल तिला? आणि जेव्हा मानवला समजेल की आर्वी त्याचीच मुलगी आहे तेव्हा काय होईल?”
“ही सगळी वादळं उद्भवू न देणं आपल्या हातात आहे, पण जेव्हा ही वादळं न जुमानता पुन्हा तोंड वर काढतील तेव्हा मात्र आपल्या हातात काहीच नसेल..आपल्या हातात सध्या हेच आहे की जेवढं या गोष्टीला लपवून ठेवता येईल तेवढं ठेवायचं..खुशी, मला तुझं कौतुक वाटतं, सारासार विचार करून तू नकुलला खोटं सांगितलं, त्यामुळे चार आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचली..”
____
“अनाथाश्रमात तुम्ही बाळाला सोडलं होतं..”
प्रमिलाचा नवरा पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर आणत होता. अनाथाश्रमातुन कोणती माणसं आलेली? का आलेली? कुणाचं मूल?
राकेशला या गोष्टींनी सतत त्रास दिला होता, ते मूल कुणाचं? प्रमिलाचं?? ही खदखद तो कायम मनात घेऊन वावरत होता. प्रमिला भावाकडे गेली आहे म्हटल्यावर त्याने तिच्या खाजगी वस्तूंना चाचपडून पाहिलं, काही सुगावा मिळतोय का ते पाहिलं..पण त्याच्या हाती काही लागलं नाही. शंकेचा किडा राकेशला काही शांत बसू देईना, प्रमिला इथे नाही, आता तिच्या गावी जाऊन सर्व गोष्टींचा छडा लावतो असं राकेश मनाशी पक्क करतो.
चार दिवसांनी सुट्टी काढून राकेश गावाकडे रवाना होतो. राकेश त्याच ठिकाणी त्याच घरासमोर उभा राहतो जिथे प्रमिला आणि सागर राहत होते.त्याला कुलूप होतं.शेजारी एक घर होतं तिथे काही माणसं राहत होती. त्याने तिथे चौकशी केली पण काहीही माहिती मिळाली नाही.
आसपासच्या घरात त्याने चौकशी केली.
“आपल्याला हे घर विकत घ्यायचं आहे, याचा मालक कुठे आहे त्याची माहिती काढायला आलोय” असं राकेश खोटं सांगत होता.
तिकडे काही झोपड्या होत्या, तिथली काही माणसं सागरच्या शेतावर मजुरी साठी यायची, प्रमिलाच्या घरासमोरून त्यांचं येणं जाणं असायचं. राकेश तिथे जाऊन पोहोचला..
“मला एक कळेल का की इथे कोण राहत होतं?”
“इतकं काही माहीत नाही, माझी आई जायची त्यांच्या शेतात कामाला..”
“अच्छा…पण तिथे कोण राहायचं काही सांगितलं का?”
“हो, एक गरोदर मुलगी होती तिथे..तिचं लग्न झालेलं नसताना ती पोटूशी आहे अशी कुणकुण येत होती कानावर, म्हणजे माझी आई आणि तिच्या मैत्रिणी अश्या चुगल्या करायच्या…”
राकेशला काय करावं समजेना, त्या घरात फक्त प्रमिला राहत होती, दुसरी कुणीही मुलगी नव्हती, मग गरोदर कोण होतं? या बायकांनी कुणाला गरोदर पाहिलेलं?
” जर इथे फक्त प्रमिला राहत होती म्हणजे…म्हणजे भाऊ घरी नसतांना, ही घरी एकटी असताना हिने..कुणालातरी बोलावलं असेल…आणि..”
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
खूपच छान
Next page
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?