मानव आर्वीला घेऊन गेला तसं आरोहीला एकदम वेगळंच जाणवू लागलं, असं वाटत होतं जणू तिच्या शरीराचा एक भाग कुणीतरी तिच्यापासून विलग करतोय. मानवच्या कपाळावर आठ्या तश्याच होत्या, त्याने आरोहीच्या आई बाबांकडे एकदा पाहिलं आणि पंधरा वर्षांपूर्वी केलेला अपमान त्याला आठवला. यावेळी आरोहिचे आई वडील मात्र जरा ओशाळले होते. काळ खूप विचित्र असतो, कुठली गोष्ट कधी बदलेल काही सांगता येत नाही.
“अरु बेटा कुठे गेलेलीस? असं पळायचं नाही..मम्मा कट्टी घेईल बरं मग..”
“नो ममा… सॉरी..”
“गुड गर्ल..”
मानवची बायको मिथिला आर्वीला जवळ घेऊन तिचे मुके घेऊ लागली..
“दादा कुठेय? त्याचा हात का सोडलास?”
“दादा तिकडे गेला खेळायला.. मलाही जायचं होतं त्याच्यासोबत..”
मंदार हा मानवचा मोठा मुलगा, वय वर्ष सात. मानव सारखाच हट्टी आणि जिद्दी, पण लहान बहिणीवर जीवापाड प्रेम, आर्वी म्हणजे घराची जान होती. इतका मोठा व्यवसायाचा डोलारा संभाळत असतानाही आर्वी सोबत वेळ घालवल्याशिवाय मानव ला चैन पडत नसे.
इकडे लग्न उरकून सर्वजण घरी गेलेले, प्रमिला नववधूच्या स्वागतासाठी तयारी करत होती. नववधूचं स्वागत झालं, उरलेले कार्यक्रम आटोपले आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. प्रमिला अजून काही दिवस भावाच्या बंगल्यावरच थांबणार होती, तिला थांबणं भाग होतं, आई वडील नसल्याने भावाचं सगळं काही तीच होती. नवीन नवरीला घरातल्या रीती भाती, कामकाज समजावून सांगायला प्रमिला शिवाय कुणीही नव्हतं.
आता घरात फक्त प्रमिला, तिचा भाऊ आणि त्याची बायको..असे तिघेजण उरलेले. या तिघांशिवाय घरात 5-6 नोकर मंडळी होतीच, अगदी स्वयंपाकापासून ते साफसफाई पर्यंत सगळ्या गोष्टी या लोकांना दिल्या होत्या. घरात काम असं काहीही उरलेलं नव्हतं, सकाळी जागेवर चहा, टेबलवर आयता नाश्ता, जेवण मिळत असे. नवीन नवरीला काम होतं ते फक्त नवऱ्याची काळजी घेण्याचं आणि व्यवसायात नवऱ्याला मदत करण्याचं.
नवीन नवरी, खुशी..एक मानसोपचार तज्ञ होती. माणसाच्या हावभावावरून ती ओळखायची, की त्याच्या मनात काय चाललंय. प्रमिला तिची नणंद जरी असली तरी दोघीत एकदम मैत्रीपूर्ण नातं होतं. प्रमिलाच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव आणि चिंता खुशीच्या नजरेतून सुटलीच नव्हती.
प्रमिलाने खुशीला घरातील सर्व कामकाज समजावून दिलं, इथली व्यवस्था लावून तिला परत आपल्या घरी परतायचं होतंच. एके दिवशी प्रमिला तिच्या खोलीत कपाटातून एक फोटो अल्बम काढते आणि एकेक फोटो पाहू लागते. तिच्या लहानपणीच्या फोटोत तिला रस नसतो, ती पटापट पानं उलटते आणि तिचा व आरोहीचा एकत्र असा फोटो बघत बसते.
“ताई, चहा..”
मागून खुशी येताच प्रमिला दचकते. खुशीचं लक्ष फोटोकडे जातं..
“कुणाचा फोटो आहे?”
“अं? कुणाचा नाही..”
“या आमच्या लग्नात होत्या ना? चेहरा तसाच दिसतोय..”
“नाही..तू चहा का आणलास? मी आले असते की खाली..”
प्रमिला विषय बदलत आहे हे खुशीच्या नजरेतून सुटण्यासारखं नक्कीच नव्हतं.
“ताई एक सांगू? मनातल्या गुपितांना एक सुखद आठवण म्हणून फक्त पाहायचं.. त्यांचा त्रागा करून घ्यायचा नाही..”
खुशीला हे गुपित माहीत झालं की काय असं प्रमिलेला क्षणभर वाटलं, पण खुशी एक सहज वाक्य बोलून गेली होती. प्रमिलेने चहा संपवला..इतका वेळ दोघीत फक्त शांतता होती, खुशी प्रमिलाचं मन वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसरीकडे प्रमिला स्वतःला सावरण्याचा निरर्थक प्रयत्न. प्रमिला म्हणाली,
“जेव्हा एखाद्या गुपिताचे साक्षीदार केवळ आणि केवळ आपण असतो, तेव्हा ते दडपण आभाळाएव्हढं असतं..”
एवढं बोलून प्रमिला निघून जाते. खुशीला एवढं मात्र कळतं की त्या फोटोतल्या मुलीचा आणि प्रमिलाचा काहितरी खोलवर संबंध आहे.
____
नकुल आणि आरोही घरी परतलेले असतात,
“हुश्श…प्रवास आवडत नाही मला खरं तर..पण आई बाबांच्या हट्टामुळे जावं लागलं..”
नकुल तिच्याकडे प्रेमळ कटाक्षाने बघतो..
“असं काय झालं बघायला?”
“शेवटी तू त्यांना आई बाबा म्हणालीस..”
“म्हणालीस म्हणजे? आहेच ते माझे आई बाबा..आता माझ्या अपघातानंतर मी मागचं सगळं विसरले, मान्य आहे की सुरवातीला मला सगळेच अनोळखी होते, पण एकेकाशी हळूहळू नव्याने ओळख केली.. स्मृती गेली असली तरी नाती मात्र बदलत नाही ना..”
“हम्म…बरं झालं तुझी स्मृती जाण्याआधी मी तुझ्या आयुष्यात नव्हतो, नाहीतर मलाही विसरली असतीस..आणि केलं असतं लग्न दुसऱ्या सोबत..”
“सांगता येत नाही, केलं असतं बहुतेक..”
असं म्हणत आरोही हसायला लागते. नकुल तिच्या हसण्यात सामील होतो पण आतून त्याला एक वेगळं सुख भासत असतं, आरोही आत्ता कुठे माणसात आली होती, अपघातांनंतर तिचा पुनर्जन्मच झाला होता.
___
आरोहीचे आई वडीलही घरी परततात…
“मानव तसा चांगला मुलगा होता असं नाही वाटत तुला?”
“मुलगा चांगला आहे की नाही यापेक्षा तो आपल्या जातीतील आहे की नाही हे महत्त्वाचं… आरोही नादान होती तेव्हा, या मानवला समोर आणून ठेवलं तिने. याच्याशीच लग्न करणार म्हणे..”
“मग काय फरक पडला असता आपण ऐकलं असतं तर? ना तू चिडून तिला गावी पाठवलं असतं ना तिचा अपघात झाला असता..मानव आज इतका मोठा बनलाय की त्याचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे..”
“नकुलराव वाईट आहेत का? काय कमी आहे त्यांच्यात? जातीतले आहेत, प्रेमळ आहेत. अजून काय हवं?”
“पण शेवटी बीजवरच ना..दुसरं लग्न आहे त्यांचं..पहिली बायको सोडून गेली अन मग आपल्या आरु ला बांधलं त्याच्या गळ्यात..”
“मग अश्या अपघात झालेल्या, स्मृती गेलेल्या आणि…कधीही आई न होऊ शकणाऱ्या मुलीशी कुणी केलं असतं लग्न?”
वडील आजही मुलीच्या बाजूने खंबीर होते, पण आई मात्र जातपात, रीती, परंपरा, सामाजिक स्थान यालाच कवटाळून होती. आतुन तिला पश्चाताप होताच, की मानवसोबत लग्न लावून देणं योग्य होतं, पण वास्तवाचं सुखद चित्रण बळेच डोळ्यासमोर उभं करायचं आणि कृत्रिम समाधानी व्हायचं हेच आरोहीची आई करत होती. मानवच्या वेळेस वडिलांचं काहीएक चाललं नव्हतं, त्यावेळी मुलीचा निर्णय आईच चांगला घेऊ शकेल म्हणून वडील गप होते, पण आज ते विचार करत होते..”मी मुलीच्या बाजूने असतो तर??”
_____
प्रमिला, खुशी आणि सागर सर्वजण रात्रीचे जेवण एकत्र करत असतात, सागर अचानक म्हणतो,
“आरोही आली होती का लग्नाला??”
प्रमिला एकदम दचकते, ती दचकते तसं खुशी तिच्यासमोर पाण्याचा पेला सरकवते. आरोहिचं नाव काढल्याने प्रमिलात झालेले बदल खुशीला चांगलेच दिसत होते.
“हो आलेली..”
दोघांचं संभाषण इथवरच थांबलं पण खुशीने मात्र मुद्दाम विचारलं..
“कोण ही आरोही?”
सागरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला..
“गावी तिच्या मामा मामीकडे आलेली ती.. ताई आणि ती सख्ख्या मैत्रिणी..तिच्यासोबत खूप वाईट झालं होतं, मोठं पोट घेऊन ती…”
प्रमिलाने सागरकडे रागीट कटाक्ष टाकला तसा तो एकदम गप झाला..
“मोठं पोट घेऊन म्हणजे?”
खुशीने विचारलं..
“हे बघ खुशी…आरोही, मी आणि सागर..तरुण असतांना एकत्र वाढलो आहोत. आरोहीच्या आयुष्यात अश्या काही घटना घडल्या आहेत की ज्या फक्त मी आणि सागरने पाहिल्या आहेत..त्यांची वाच्यता कुठेही झाली तरी मोठा अनर्थ होईल, त्यामुळे यापुढे या विषयावर मौन बाळग..”
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Interesting
छान
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/tr/join?ref=V3MG69RO
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.