#खेळ_मांडला (भाग 15)
प्रमिला बाळाला अनाथाश्रमात नेते, तिथे तिची चौकशी केली जाते. बाळ कुठे सापडलं वगैरे जुजबी माहिती लिहून घेतली जाते. प्रमिला खोटं बोलून बाळाला तिथे हवाली करते. तिथे एक प्रेमळ आजीबाई होत्या, त्यांनी बाळाला जवळ घेतलं आणि प्रेमाने दूध पाजून झोपवून दिलं. प्रमिलाचा जीव नुसता कासावीस झालेला, पण त्या लोकांसमोर तिला ते दिसू द्यायचं नसतं म्हणून ती आपले भाव लपवत घरी परतते.
प्रमिलाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत असतं. मानवला भेटून सत्य परिस्थिती सांगायची, या अवस्थेत आरोहीची आई मानवसोबत आरोहीचं लग्न लावून देईल आणि बाळाला त्या दोघांच्या हवाली करता येईल असं तिला वाटू लागलं. भावाची परवानगी घेऊन ती शहरात आली.
मानव बद्दल प्रमिलाला नावाशिवाय काहीही माहीत नव्हतं. आणि आरोहीला आता विचारूनही काही फायदा नव्हता. पण प्रमिलाने हिम्मत केली आणि मानवाच्या शोधा साठी ती एकटी शहरात आली. शहरात आल्यानंतर तिने काहींना मानव नावाच्या एका माणसाची कंपनी आहे का म्हणून विचारलं, दुकानदार, स्टेशन वरची माणसं यांना तिने काही जुजबी माहिती विचारली. पण साधं आडनावही माहीत नसलेल्या मुलाला कुणालाही ओळखता आलं नाही. प्रमिला निराश होऊन एका दुकानाच्या पायरीवर बसते. तिथे एक स्त्री काहीशी खरेदी करत होती. एका पिशवीत तिने सगळं सामान घेतलं आणि ती पायऱ्या उतरू लागली. प्रमिला मध्ये बसलेली तिला दिसली नाही, तिचा पाय लागून ती प्रमिला वर पडली, सगळं सामान खाली पडलं आणि प्रमिलालाही धक्का लागून थोडं खरचटलं..
“Extremely सॉरी, तुम्ही इथे बसला आहात हे पहिलंच नाही मी..”
“असुद्या..”
“अहो हे काय, लागलंय तुम्हाला..”
“जास्त काही नाही”
“असं कसं, एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला..जवळच आहे..आणि तुम्ही लांबून आलेल्या दिसताय..”
या निमित्ताने मानवची अजून चौकशी करता येईल या विचाराने प्रमिला होकार देते आणि ती मुलगी प्रमिलाला तिच्या घरी घेऊन जाते. एका अलिशान बंगल्यात ती महिला आणि तिचा नवरा असे दोघेच राहत.
“नाव काय आपलं?”
“प्रमिला..पैंजनपुर ला असते..”
“इथे शहरात काय काम काढलत?”
प्रमिलाला ती मुलगी चांगली वाटते, त्यामुळे तिला सगळं सांगावं आणि तिची मदत घ्यावी असं तिला वाटतं. प्रमिला त्या महिलेला सगळं सांगून टाकते.
“माझा विश्वासच बसत नाहीये यावर, कुणाच्या आयुष्यात इतकं वाईट घडू शकतं? पण तुमचं मात्र कौतुक वाटतं मला, इतक्या लांबून येऊन तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी सगळं करताय..मी हवी ती मदत करायला तयार आहे तुम्हाला..”
प्रमिलाला जरा बरं वाटतं, किमान या घरून तरी मानव पर्यंत पोहोचता येईल.
ती स्त्री प्रमिलाला गेस्ट रूम मध्ये आराम करायला लावते आणि तिच्या कुक ला जेवणासाठी काय बनवायचं याची सूचना देते. दिवसभरात थकवा आल्याने प्रमिलाला झोप लागते. संध्याकाळी जाग आल्यावर एक नोकर तिला चहा आणून देतो. ती चहा घेऊन खाली येते.. ती स्त्री आणि तिचा नवरा बोलत असतात..
“अहो आपल्याकडे प्रमिला म्हणून एक मुलगी आली आहे, तिची गोष्ट ऐकलीत तर खूप वाईट वाटेल तुम्हाला..ही बघा, प्रमिला..ये प्रमिला..आराम झाला ना नीट?”
“हो ताई, तुमचे खूप आभार..”
“हे माझे मिस्टर. मानव..”
“मानव???”
“हो..मोठी कंपनी आहे आमची..”
प्रमिलाला एकदम धक्का बसतो, पण हा तोच मानव आहे कशावरून? कशी माहिती काढणार?
“नमस्कार.. कुठे आहे आपली कंपनी?”
“इथून 4 किमी वर..”
इतक्यात एक सेल्समन दारापाशी येतो,
“Excuse me मॅडम..”
“आम्हाला काहीही नकोय, प्लिज जा तुम्ही..” ती स्त्री त्याला म्हणते..पण मानव तिला थांबवतो..
“अगं सेल्समनला अशी वाईट वागणूक द्यायची नाही..”
“अरे हो, विसरलेच.. एकेकाळी कॉलेज प्रोजेक्ट म्हणून सेल्समन बनून तुम्ही घरोघरी गेला होतात ना? म्हणून..”
“अगं हो..सेल्समन ला कशी वागणूक दिली जाते आणि त्याला कसं वाटत असेल याची पुरेपूर जाणीव आहे मला त्यामुळे वस्तू घेऊ नको पण त्याच्याशी नम्रतेने बोल..”
मानव बायकोला सांगत होता आणि प्रमिलाची खात्री पटली..हाच तो मानव..आरोहीने या प्रसंगबद्दल सांगितलेलं प्रमिलाला आठवतं. पण हे काय होऊन बसलं? मानवचं लग्न झालंय, आता ते मूल?? आरोही कोणत्या तोंडाने सांभाळणार? मानवकडे तरी कसं देणार? मानवला त्या बाळा बद्दल सांगितलं तर…तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील, आरोही, मानव आणि त्याची बायको…प्रमिलाने ठरवलेला सगळा प्लॅन फसतो. आता काय करायचं? बाळाची सोय कुठे लावायची?
“चल मला आज ऑफीसला लवकर जायचं आहे, चॅरिटीसाठी काही लोकं येताय, बघू त्यांना काही मदत करता येते का..”
“थांबा..” प्रमिला एकदम ओरडते आणि सर्वजण बघतात..
“म्हणजे, मला एक सांगायचं आहे..”
“बोला ना..”
“आमच्या इथे एक अनाथाश्रम आहे..तिथे तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची गरज आहे..म्हणजे अगदीच डोनेशन नको पण तिथे येऊन त्या मुलांना एकदा भेटून गेलात तरी खूप समाधान मिळेल तुम्हाला..”
प्रमिला एकदम प्लॅन बदलते आणि मानवला त्याच्या बाळा पर्यंत कसं पोचवता येईल याचा मार्ग मोकळा करते.
“चालेल, आम्हाला पत्ता द्या, आम्ही नक्की येऊ..”
प्रमिला मानवला पत्ता देते..मानव तिथे येईल या आशेने प्रमिला काहीशी निर्धास्त होते.तिला माहीत होतं, बाप-लेकीची दोर इतकी पोकळ नसते, बाप आपल्या लेकीला ओळखण्यात चूक करणार नाही. फक्त मानवला त्या आश्रमात पोहोचवण्याचं काम होणं महत्वाचं होतं.
प्रमिला घरी परतते, सागर तिच्यासाठी आता स्थळं बघत असतो. एक सुयोग्य वर बघून तिचं लग्न लावून देण्यात येतं. लग्न होतं तसं प्रमिला मागच्या आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न करते. एका नवीन आयुष्याची सुरवात करते, आपल्या संसारात रंग भरत असते. या काळात तिचं आश्रमात जाणं होत नाही..पण बाळाची आठवण तिला मधूनमधून परेशान करत असते. एकदा जाऊन यावं बाळाकडे असं तिला वाटत राहायचं, पण सासर आश्रमापासून बरंच दूर होतं..बरीच वर्षे अशीच लोटतात.
एके दिवशी हिम्मत करून प्रमिला आश्रमात जाते, आरोहीच्या बाळाला कधी एकदा पाहते असं तिला झालेलं. तिथल्या आजीने प्रमिलाला बरोबर ओळखलं.
“पोरी..आलीस? फार वाट पाहिली तुझी..”
“माझी? का?”
“अनेक लेकरं सांभाळली मी, इथे सोडून जाणाऱ्या माणसांमध्ये जराही भाव नसतो..पण तू या बाळाला सोडलं ते मनावर दगड ठेऊन… मी बरोबर ओळखलं होतं..”
प्रमिलाला तिथेच बांध फुटतो..
“काय सांगू आजी तुला..माझ्या मैत्रिणीचं लेकरू ते..तिच्या आयुष्याचा असा खेळ मांडला गेलाय ना…दुर्दैव सुद्धा ते पाहून रडेल इतका खेळ झालाय तिच्या आयुष्याचा…”
“पोरी, काळजी करू नको..एक जोडपं घेऊन गेलं तिला..”
प्रमिला काळजीत पडते..
“कोणी नेलं तिला?”
“मोठा श्रीमंत माणूस होता, तो अन त्याची बायको आलेली, एक मुलगा होता त्यांना..या पोरीला पाहून त्या माणसाच्या मनात काय कालवाकालव झाली देव जाणे..सोडतच नव्हता तो त्या पोरीला..मग तो अन त्याच्या बायकोने तिला नेण्याचा निर्णय घेतला…रीतसर दत्तक म्हणून घेतलं..”
प्रमिलाला लक्षात आलं, हा मानवच होता.. प्रमिलाने मोबाईल मध्ये असलेला मानवचा फोटो दाखवत आजीला विचारलं..
“हाच का तो?”
“व्हय..ह्योच व्हता..”
प्रमिला भरून पावते, शेवटी बाळाला तिच्या हक्काच्या घरी जागा मिळाली होती…
(सागर जुनं सगळं आठवून डोळे मिटून घेतो आणि फोनवर हे सगळं सांगत असलेल्या प्रमिलाचं फक्त ऐकत असतो..फ्लॅशबॅक मधून दोघेही बाहेर येतात)
_____
“सागर, आठवतंय ना सगळं? काय होऊन बसलं होतं..एक समाधान आहे की लेक बापाच्या घरी सुखरूप आहे, पण दुःखं याचं की तिला आईची माया करणारी हक्काची आई भूतकाळ विसरून बसलीये..आरोही आणि तिचा सामना झालेला तेव्हा आईचं मन बरोबर हेलावलं गेलेलं..आठवतय का सागर?”
“होय, माझ्या लग्नात आर्वी आणि आरोही समोरासमोर आले होते, मानव ने आरोहीला ओळखलं…पण आरोहीने मानवला ओळखलं नाही..आरोहीने लेकीला जवळ घेतलं, पण ती तिचीच लेक आहे हे ओळखलं नाही, मानव आर्वीला लेक म्हणतो, पण दत्तक नसून पोटची पोर आहे हे त्याला माहित नाही..ताई काय खेळ मांडून ठेवलाय गं दैवाने..”
“दैवापुढं कुणाचं चालतं सागर, बरं चल..फोन ठेवते..आणि हो, हे गुपित गुपितच असुदेत… शेवटपर्यंत…”
“हो ताई, काळजी करू नको..”
सागर फोन ठेवून देतो, बाहेर चक्कर मारायला म्हणून फोन चार्जिंग ला लावून बाहेर निघून जातो. सागर बाहेर गेलाय याचीच संधी साधत खुशी आत येते, त्याचा मोबाईल घेते आणि तिने call रेकॉर्डिंग चं सुरू केलेलं ऑप्शन ऑफ करते आणि सेव्ह झालेली रेकॉर्डिंग ची ऑडिओ फाईल पटकन स्वतःच्या मोबाईल मध्ये घेते..
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Pudcha bhag post kra
Pudhcha part kadhi post karnar