#खेळ_मांडला (भाग 14)
आरोहीने शेवटी माघार घेतली, एक तर मामीमुळे हे बाळ जगात आलंय, मामीचे अनंत उपकार आहेत माझ्यावर आणि बाळालाही मामीच्या रूपाने आई मिळाली, जी त्याची हक्काची आई असेल. माझं उद्या काय होईल काही सांगता येणार नाही. सत्य समजलं तर माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यात येईल, त्यापेक्षा बाळ इथे सुरक्षित राहील या विचाराने आरोहीने मनावर दगड ठेऊन सत्याचा स्वीकार केला.
2-3 महिने असेच गेले, आरोहीच्या आईचाही फोन येत होता की आरोहीला आता घरी पाठवा. तिच्यासाठी त्यांनी स्थळ बघितलं होतं आणि लवकरात लवकर आरोहीचं लग्न उरकून घेण्याचा त्यांचा मानस होता.
अखेर आरोहीचा निरोप घ्यायचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळपासून ती बाळाला छातीशी धरून होती. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नव्हतं. बाळाला मामीची सवय झाल्याने आरोहीचं दूर जाणं फारसं त्रासदायक नव्हतं, तरी आईचं मन मात्र काही मानेना..
मामाने गाडी काढली, प्रमिलाने तिच्याकडे पिशवीत भरपूर खाण्याच्या वस्तू दिल्या.
“बाळंतपण झालंय तुझं, शरीराची झीज झालीये तुझ्या..तुझ्या घरी कुणाला माहीत नाही त्यामुळे ते काळजी घेणार नाहीत. पण तू स्वतःची काळजी घे, यात डिंकाचे लाडू आहेत, रोज खात जा. बाळाची काळजी करू नकोस, मी आहे त्याच्याजवळ..आणि आता इथलं सगळं विसरून जा, तुला मूल आहे हे विसरण्यातच तुझं भलं आहे. नवीन आयुष्याला सुरवात कर..”
मैत्रीण म्हणजे काय हे प्रमिला कडे बघून शिकावं. आरोहीला निरोप देणं तिला जड तर गेलंच पण तिचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून असलेली तळमळ प्रमिलाच्या बोलण्यातून दिसून येत होती.
“मामी, बाळाला घेऊन मला स्टॉप पर्यंत सोडायला येशील?”
मामीने होकार दिला, बाळाला घेऊन मामा, मामी, बाळ आणि आरोही गाडीत बसले.
“प्रमिला, येतेस का गं तुपण?”
“नाही, तिला नजरेआड होताना मला पहावणार नाही..”
प्रमिला रडतच आत गेली, आरोहीला तिच्या बाळापासून दूर होताना बघताना प्रमिलाला आतून प्रचंड वेदना होत होत्या. गाडी गेली तशी प्रमिला बाहेर आली. आरोही गेली अन घर सुनं सुनं झालं.
मामा गाडी चालवत होता, आरोही मामीला सांगत होती..
“मामी, तूच आई आहेस आता माझ्या बाळाची, काळजी घे तिची..तिला काहीही कमी पडू देऊ नकोस, चांगलं शिकव तिला..”
मामीला आरोहीचं बोलणं खटकलं..
“आई बाप झालो म्हणजे इतकी काळजी करणारच ना आम्ही? वाऱ्यावर सोडणार आहोत का बाळाला?”
“माझं सांगायचं काम होतं मामी, काहीही झालं तरी माझं बाळ आहे ते..”
“फक्त नावाला, ते तर मलाच आई समजतंय..”
“समजण्याला काही अर्थ नसतो, खऱ्या आईची सर अश्या उसन्या मातृत्वाला येत नसते..”
मामी आणि आरोही मध्ये जोरदार वाद झाला, मामाला ते सहन होत नव्हतं. दोघीही जवळच्या, मामाने दोघींना शांत करायचा प्रयत्न केला पण दोघीही ऐकेना. मामा वैतागला, त्याने मागे पाहिलं आणि डोकं आपटत स्टीअरिंग वरचे हात सोडून हात जोडून दोघींना शांत राहायला सांगितलं.. पण..
समोरून एक भरधाव ट्रक आली, मामाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी जोरदार ट्रकला जाऊन धडकली. अपघात इतका मोठा होता की दूरवर आवाज गेला. मामाचं डोकं पुढे आपटलं गेलं, मामीचं मस्तक फुटलेल्या काचेच्या मधोमध रक्तबंबाळ झालेलं, आरोही गाडीचं दार उघडून बाहेर फेकली गेली आणि जवळच असलेल्या दगडावर तिचं डोकं आपटलं गेलं…
सागर धावतच घरी आला..
“प्रमिला…लवकर चल, त्यांच्या गाडीचा अपघात झालाय..”
प्रमिलाला विश्वासच बसेना, आत्ता इतक्यात तर समोर होते सर्व..प्रमिला आणि सागर घटनास्थळी गेले, पोलीस एव्हाना आले होते..मामा अन मामीचं छिन्नविच्छिन्न शरीर बघून प्रमिलाने हंबरडा फोडला.
“आरोही?? बाळ? कुठाय??”
पोलीस जवळ आले, “तुमच्या माहितीतली लोकं होती का?”
“हो…एक मुलगी आणि एक बाळ..”
“मुलीची स्थिती गंभीर आहे, बाळाला मात्र या बाईने छातीशी घट्ट पकडून ठेवाल्याने बाळाला काहीही झालेलं नाही..पण त्याची आई मात्र नाही राहिली..”
पोलिसांना काय सांगणार, मामी त्या बाळाची आई नाहीच..सांगितलं तर आरोहीची बदनामी..
“आरोही आणि बाळ कोणत्या दवाखान्यात आहे? मला घेऊन चल सागर .”
दोघेही दवाखान्यात जातात. बाहेर एक महिला पोलीस बाळाला मांडीवर घेऊन बाटलीने दूध पाजत असते. प्रमिला धावतच जाते..
“हे बाळ..मी याची मावशी..”
“बरं झालं आलात, आम्हाला चिंता होती की या बाळाची आई तर गेली, पण याला आता कुणाकडे देणार? तुम्ही आता घेऊन जा याला..”
प्रमिला बाळाला आपल्या ताब्यात घेते. आरोहीला बघायला आत जाते. तिथे डॉक्टर बोलत असतात….
“मुलगी शुद्धीवर आली आहे, पण डोक्याला मार लागल्याने तिची स्मृती गेलीय..तिला काहीही आठवत नाही, आणि पोटाला इतका जोरात मार बसलाय की ती आता आई होऊ शकेल असं वाटत नाही..”
हे ऐकून प्रमिलाच्या काळजात धस्स झालं..कित्येक प्रश्न समोर येऊन ठाकले.
आरोहीला काही आठवत नाहीये, काय सांगणार तिला? हे बाळ तुझं आहे म्हणून? आरोहीच्या आई वडिलांना काय उत्तर देणार?
तिथे नकुल नावाचा एक माणूस आरोहीच्या रूम बाहेर डॉक्टरांशी बोलत असतो..
“यांच्यासोबत एक बाळही होतं..”
“हो..या मुलीचे नातेवाईक घेऊन गेले त्याला..तुम्ही मात्र खूप माणुसकी दाखवलीत, अनोळखी व्यक्तीला ताबडतोब गाडीत बसवून हॉस्पिटलमध्ये आणलं आणि म्हणून तिचा जीव वाचला..”
नकुल काय सांगणार, अपघात झाला तेव्हा नकुल तिथूनच जात होता. आरोहीच्या तोंडून शब्द येत होते,
“माझं बाळ, माझं बाळ..”
नकुलला आपल्या बायकोची आठवण झाली,
“अगदी अशीच कण्हत होती माझी बायको” एकट्या पडलेल्या नकुलला आरोही मध्ये त्याची बायको दिसली, त्याने तडक बाळाला आणि आरोहीला काही लोकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेलं. नकुल आरोहिचे आई वडील येईपर्यंत थांबला होता, आरोहिचे आई वडील आले आणि त्यांचं बोलणं नकुलने ऐकलं..
“इतके दिवस पोरीला दूर ठेवलं, आणि आता जेव्हा घरी येणार तेव्हा हे काय होऊन बसलं… थाटामाटात लग्न करायचं होतं तिचं, सासरी पाठवणी करायची होती, पण आता तर ती सगळं विसरली, तिला मुलही होणार नाही म्हणताय डॉक्टर.. कसं होईल माझ्या मुलीचं??”
वडील रागानेच म्हणतात,
“आपली मुलगी वाचली आहे हेच खूप आहे, नाही का??”
नकुल सगळं ऐकत असतो, आरोहीचं लग्न व्हायचं होतं, मग ते मूल कुणाचं? आणि ती माझं बाळ माझं बाळ म्हणून काय बोलत होती?? नकुलला प्रकरण जरा वेगळं वाटलं. त्याने मौन बाळगणं योग्य समजलं. आई बाबांनी नकुकचे आभार मानले.
पुढे आरोहीला आई बाबा घरी घेऊन गेले. आरोहीला सगळंच नवीन होतं, मागचं तिला काहीही आठवत नव्हतं. या काळात नकुल तिला अधून मधून भेटायला जाई, त्याच्या बायकोची आठवण आली की आरोहीला तो भेटे. आरोहिच्या आईच्या मनात लगेच चक्र फिरू लागली. नकुल आपल्याच जातीतला, त्याच्या गर्भार बायकोला देवाज्ञा झालीये, तो एकटा पडलाय..आरोहिशी त्याने लग्न केलं तर??
_____
इकडे प्रमिला बाळाला घेऊन घरी येते. सागर तिच्याकडे बघतो आणि त्याला आपल्या बहिणीच्या मनात काय चालू असेल याचा अंदाज येतो..
“हे बघ प्रमिले, माणुसकी म्हणून त्या मुलीचं आपण खूप केलंय, पण आता या बाळाची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही..”
“दादा कुठे जाईल हा कोवळा जीव? मामा, मामी, आरोही, तू अन मी..आपल्यातच फक्त हे सगळं गूढ माहीत होतं, मामा मामी गेले अन आरोहीची स्मृती गेली..उरतं कोण?”
“आपण ठेका घेतलाय का मदत करायचा? आणि या बाळाला सोडून ये आरोहिकडे, तिच्या आई बाबांना सांगून टाक सगळं खरं..”
“काय बोलतोय दादा, तिच्या आईला सत्य समजलं तर अश्या अवस्थेत ती तिला घराबाहेर काढेल..आणि आरोहि? तिला बिचारीला समजनारही नाही की माझ्याशी असं का वागताय?”
“ते काहीही असो, उद्या मला हे बाळ घरात नकोय..मलाही समाजात प्रतिष्ठा आहे, लोकं उद्या विचारतील, हे मूल कुणाचं..काय उत्तर द्यायचं? आपली परिस्थिती ही अशी, कसं वाढवणार आपण त्याला??”
दादापुढे प्रमिलाचं काहीएक चाललं नाही. ती बाळाला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेते, पण …तिथून त्याची रवानगी त्याच्या वडिलांकडे कशी होईल याची ती शक्कल लढवते.
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Link open nhi hot aahe
Khup chan katha
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.