खेळ मांडला (भाग 13)

#खेळ_मांडला (भाग 13)

“आई बाबा?”

प्रमिलाच्या अंगणातून दोघींनी आई बाबांची गाडी मामाच्या दारात उभी पहिली, आरोहीच्या अंगावर काटाच आला, आई बाबांना माझी ही अवस्था समजली तर? काय होईल?

तिकडे मामी एकटी आई बाबांशी बोलत होती,

“ताई, अचानक कसकाय? फोन केला असता ना यायच्या आधी?”

“तू कधीपासून शहरातल्या माणसांसारखं बोलायला लागली? आजवर कधी कळवून आलोय का आम्ही?”

“तसं नाही, जेवणाचा बेत केला असता ना..”

“अगं नको, इथे एका लग्नाला आलोय आम्ही, जेवण तिकडेच करू..15-20 मिनिटं बसतो फक्त, चहा टाक तेवढा..आणि आरोही कुठेय? बोलाव तिला..”..

मामी निरुत्तर झाली, पटकन आत चहा टाकायला गेली. प्रमिलाला परिस्थिती समजली, तिने आरोहीला एक खाट टाकली अन तिथेच झोपायला लावलं.

“हे बघ, अंगभर ही शाल ओढ, आई इकडे आली तरी अंगावरून काढू नकोस..”

“अगं पण..”

प्रमिला आरोहीला शालीत गुंडाळून मामीकडे जाते.

“मावशी, अहो काढा बनवला का? आरोहीचा ताप काही उतरत नाहीये..”

“ताप? काय गं? मला सांगितलं नाहीस..”

“अहो मावशी आत्ता एकदम अचानक तिला थंडी भरली, म्हणून..”

मामी धावत बाहेर आली, काय करावं तिला सुचेना..

“कुठे आहे ती?”

“माझ्या घरी..”

“तिला बरं नाही अन तुझ्या घरीं काय करतेय? कुठेय बघू..”

आई बाबा दोघे प्रमिला च्या घरी जातात, आरोही शाल ओढून पाय दुमडून एका कानीवर झोपलेली असते.

“काय गं? इथे का झोपलीये??”

“मावशी आहो मामी ला शेतीच्या कामांसाठी बाहेर जावं लागतं.. आरोही कडे लक्ष द्यायला हवं ना कुणीतरी..”

इतक्यात मामा घरी येतो, झालेला प्रकार बहिणीला समजला की काय याची त्याला भीती असते..प्रमिला मामाच्या चेहऱ्यावरचा ताण ओळखते आणि म्हणते..

“काका, डॉक्टरांना फोन केला ना..?”

“अं? हा..हो..”

आई आरोही जवळ जाते, तिच्या कपाळावर हात ठेवू बघते तोच प्रमिला तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणते,

“माझ्याकडे एक औषध होतं त्याने बराच फरक पडला बघ..”

आई हात मागे घेते,

“दादा..अरे मला कळवलं नाहीस तू की आरोही आजारी आहे ते..आणि तुम्हा सर्वांची धावपळ होतेय, मी आरोहीला घेऊन जाते माझ्यासोबत..एक तर ती आधीच आजारी आहे आणि त्यात..”

“नको…तिला राहुद्या इथेच..निदान अजून 4 महिने तरी..”

“अजून चार महिने? का?”

मामी बोलून गेली, पण याचं उत्तर तिला मिळेना..अश्या वेळी प्रमिला पुढे येऊन बोलू लागली..

“काकू अहो चार महिन्यांनी इथे खंडोबाची जत्रा आहे मोठी, म्हटलं आरोहीला एकदा दाखवावी ती जत्रा..”

“पण, मला तिला इथे ठेवणं योग्य वाटत नाहीये, चेहरा बघा तिचा कसा सुजलाय..एखादया पोटूश्या बाई सारखा..”

हे ऐकून आरोही गुंडाळलेली शाल अजून घट्ट गुंडाळते, मामा, मामी, प्रमिला एकमेकांकडे घाबरून बघू लागतात..

“ताई, तुम्ही लग्नाला जाऊन या..तिला राहुद्या इथे, तसं काही वाटलंच तर कळवू आम्ही, मग खुशाल तिला घेऊन जा..”

“नको, मी आत्ताच नेणार तिला..माझ्यासाठी नाही पण तुमची धावपळ नको..”

“ताई, 10 वर्ष झाली, आम्हाला मूल नाही, बाळासाठी आसुसलेल्या आम्हाला पुत्रसुख काय असतं हे गेले काही महिने अनुभवायला मिळतंय..आणि तुम्ही त्याला धावपळ म्हणता?”

मामीचा रोख आरोहीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाकडे होता, पण आईला ते आरोहीबाबत म्हटलेलं वाटलं. आईला गलबलून आलं, दादा वहिनी निपुत्रिक असल्याचं दुःखं आणि आरोहीचा त्यांना मिळत असणारा सहवास आईला जाणवू लागला. आई आपला हट्ट सोडते, आरोहिकडे प्रेमाने एकदा बघते, मानव पासून दूर म्हणून आरोहीला गावी पाठवलं पण आईही तिच्या विरहाने आतून दुःखी होतीच. आपल्याला आरोही आयुष्यभर जवळ असेल पण दादा वहिनीसाठी तरी निदान हिला इथे ठेवूया असा विचार करून आई माघारी फिरली.

सर्वांचा जीव भांड्यात पडला. एक मोठं गुपित, जे मामा, मामी, प्रमिला, सागर आणि आरोही जपत होती ते आज बाहेर पडण्यापासून वाचलं..

एकीकडे पुत्रसुखाची आस आणि दुसरीकडे बहिणीशी खोटं बोलतोय याची सल मामाला होती, पण या दोघांत मात्र पुत्रसुखाची ओढ जिंकली.

पुढील महिने आरोहीची चांगली काळजी घेतली जात होती. तिला वेळेवर औषधं, खाणं पिणं मिळेल याची काळजी प्रमिला घेत होती. सागरभाऊ आरोही साठी तिला हवं ते बाजारातून आणून देई..ऐके दिवशी मामा सागरला म्हणाला..

“आमची पाहुनी तुम्हीच दत्तक घेतली की आता..”

“हो मग, आता आपण एका लेव्हलला आलो बरं का..”

“ते कसं?”

“आधी तुम्ही मामा होतात, आता मीही होणार..”

“हो की रे..”

“नुसतं हो नाही, तुमची भाची तुम्ही तुमच्याजवळ ठेवलीत, आता आमचा भाचा/भाची आम्ही आमच्याजवळ ठेवणार..”.

“हे मात्र चुकीचं आहे राव..”

दोघांमध्ये विनोद चालु असताना प्रमिला धावतच बाहेर आली,

“सागर, पटकन गाडी काढ.. आरोहीच्या पोटात दुखतंय..”

आरोहिचे दिवस भरत आले होते, मामा आणि सागरने आधीच एका गाडीची व्यवस्था करून ठेवली होती. सर्वांनी आरोहीला गाडीत बसवलं आणि सर्वजण हॉस्पिटलमध्ये गेले.

आरोहीला कळा सहन होत नव्हत्या, प्रमिलाचा हात ती घट्ट पकडून होती. मामा आणि सागर धावपळ करत होते तर दुसरीकडे मामी देवाच्या धावा करत होती. आरोहीला आत घेण्यात आलं. तासाभरात बाळाचा रडायचा आवाज आला आणि सर्वांचं लक्ष बाळाला घेऊन येणाऱ्या नर्सकडे लागलं..

नर्स बाळाला घेऊन बाहेर आली,

“अभिनंदन, मुलगी झाली आहे..”

“सर्वांनी बाळाकडे डोळे भरून पाहिलं, दुसरी आरोहीच होती ती..नाजूक डोळे, नाजूक ओठ, गोरापान रंग..डोळे बंद ठेवूनच ती हसू लागली तेव्हा मात्र सर्वांच्या हृदयात स्पंदनं झाली..मामीला तर आपलं मूल जन्माला आलं याचाच आनंद झाला होता..”

मामीने बाळाला हातात घेतलं, इतके दिवस सहन करत आलेली वांझोटेपनाची ओटी आज देवाने भरली होती. बाळाला कुठे ठेऊ अन कुठे नको असं मामीला झालं.

चार दिवस हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर सर्वजण घरी आले. मामीने बाळ बाळंतिणीची पूर्ण सोय केली होती. प्रमिला पूर्णवेळ आरोहीकडे होती. प्रमिला आता मामीच्या घरातली कामं आटोपत असे, कारण मामी पूर्णवेळ बाळाच्या आसपास असे..मामा मामी दोघेही आई बाबा झाल्यासारखे खूप आनंदी होते. हा आनंद प्रमिलाने त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यांदाच बघितला होता..

आरोही बाळंतपणाच्या दुखण्यातून वर येत होती, बाळासाठी ती आसुसलेली असायची, मामी केवळ पाजण्यापूरती आरोहिजवळ बाळाला आने, नंतर पुन्हा घेऊन जाई..प्रमिला सगळं बघत होती, तिला भविष्यात येणारं वादळ दिसू लागलं..

आरोही कितीही म्हटलं तरी आई होती, आपल्या बाळाचा विरह तिला सहन होत नसे, पण मामा मामीशी आधीच बोलणी केलेली की हे बाळ मामा मामीला देण्यात येणार..मामा मामी त्याच बोलणीनुसार बाळाला आपलंसं करत होते, आरोहीचा जीव मात्र आता तीळतिळ तुटत होता. ज्या मामा मामी मुळे हे बाळ या जगात आलं त्यांचे उपकार एकीकडे आणि दुसरीकडे आईची ममता..प्रमिलाला याचंच भय होतं आणि ते खरं ठरलं..एकदा मामी शेतात गेली असता बाळ रडायला लागलं, काही केल्या शांत होईना..काही वेळाने मामी जेव्हा आली आणि तिने बाळाला छातीशी धरलं तेव्हा कुठे बाळ शांत झालं.. आरोहीच्या हृदयात एकच कळ उठली..आपलं बाळ आपल्याला नाही,तर मामीलाच आई मानत आहे..

क्रमशः

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14/

भाग 15
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15/

भाग 16
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-16/

भाग 17
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-17/

भाग 18
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-18/

भाग 19
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-19/

भाग 20
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-20/

भाग 21
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-21/

भाग 22
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-22/

भाग 23
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-23/

भाग 24
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-24/

भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

2 thoughts on “खेळ मांडला (भाग 13)”

Leave a Comment