आरोहीला दिवस गेलेत ही गोष्ट आरोहीने प्रमिलाला सांगितली. प्रमिलाला धक्का बसला, आरोहीने प्रमिलाला विश्वासात घेऊन सगळी हकीकत सांगितली. प्रमिला काळजीत पडली. ही गोष्ट फक्त प्रमिला आणि आरोहीत होती, आरोही आधीच सर्व प्रकारामुळे नैराश्यात होती, त्यात हे असं..आरोही आता मोठ्या संकटात सापडते, एक चूक किती महागात पडली हे तिच्या लक्षात आलं
“आरोही, मानवला आत्ताच्या आत्ता कळव. तो करेल काहीतरी..”
“नाही, मानवला जर मी संपर्क केला तर मी माझ्या आईला मुकेल..”
“आईला कसं कळेल हे? कळूच द्यायचं नाही आपण..”
“आपण कळू दिलं नाही तरी मानवला हे समजल्यावर तो मला घेऊन जाईल, कुणाचाही विचार करणार नाही, मी चांगलं ओळखते त्याला..”
“अगं पण..”
“मला आईला गमवायचं नाहीये..”
या विवंचनेतच 3 महिने निघून जातात. या काळात आरोही अगदी सुन्न होऊन जाते, पुढे काय करायचं, काय होईल, कसं सर्वांना सामोरं जायचं इतका विचार करण्याइतपतही तिची मानसिक स्थिती ठीक नसते. दिवसभर शून्यात नजर भिडवून बसून असायची, मामा मामीला मुलाचं प्रकरण आहे हे समजलं होतं, त्यामुळेच कदाचित आरोही असं करत असेन असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या परिने त्यांनी आरोहीला जमेल तितकं आनंदी ठेवायचा प्रयत्न केला. मामा तिच्या आवडत्या वस्तू तिला आणून देई, मामी तिच्या आवडीचं खायला बनवत असायची. आरोहीला मामा मामीचा खटाटोप समजत होता, त्यांना बरं वाटावं म्हणून उसनं हसू ती आणत असे.
पण 3 महिन्यानंतर मात्र आरोहीचं पोट नजरेत भरू लागलेलं. मामीला शंकाही येऊ लागली, कारण 3 महिन्यात आरोहीचा मासिक धर्म सुरू असलेला मामीला जाणवला नाही. आणि आता पोटही पुढे येऊ लागलेलं. या गोष्टीवर मामा मात्र चिडला,
“पोरीने ही थेरं केली आणि तिच्या आई बापाने आपल्या गळ्यात मारलं तिला. आपल्याला समाजात राहायचं आहे, तिला परत पाठवून देऊ आता..”
“अहो काहीही काय बोलताय, काहीही असलं तरी तिची परिस्थिती नाजूक आहे, आणि तिच्या आई वडिलांना ही गोष्ट माहीत नसेल तर? कुठे जाईल ती? एक तर विहिरीत उडी घेऊन जीव देईल नाहीतर स्वतःला विकायची वेळ तिच्यावर येईल..”
मामा हे ऐकून भावनिक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं..
“पण…”
“ऐका माझं, नेमकं काय झालंय हे आधी जाणून घेऊ..”
दोघेही आरोही कडे जातात, आरोही डोळे लावून निपचित पडलेली असते. तिला जेवण जात नव्हतं आणि फोडणीचा वासही सहन होत नव्हता. मामा मामीला असं एकत्र आलेलं पाहून आरोहीला समजलं की आता आपल्यावर प्रश्नांचा भडिमार होणार.
“बेटा, तू गरोदर आहेस?”
आरोही काहीही बोलत नाही..
“बोल बाळा, हे बघ आमच्यापासून काहीही लपवू नकोस..”
आरोहीला आता बांध फुटतो..इतक्यात तिथे प्रमिला येते..
“मावशी, मी सांगते सगळं. पण शांतपणे ऐकून घ्या आणि मग निर्णय घ्या..”
प्रमिला आरोहीच्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत सांगते. मामा मामीला ते ऐकून वाईट वाटतं. आरोहीच्या आईच्या हट्टामुळे आरोही तिच्या प्रेमाला मुकत होती आणि सुयोग्य मुलगा असूनही आईने मरणाची घातलेली अट आरोहीला मानवपासून थांबवत होती.
सगळं काही ऐकून मामा मामी बाहेर आले,
“मान्य आहे की आरोहीबाबतीत वाईट घडलं, पण म्हणून आपण काय करणार आहोत? एक काम करू, उद्या डॉक्टर कडे जा दोघीजणी आणि तिला मोकळं करून आना..”
“अहो काय बोलताय तुम्ही? त्या जीवाचा काय दोष त्यात?”
“मग कुणाचं नाव लावणार ते मूल? काय सांगणार जगाला आपण? कोण सांभाळ करणार त्याचा?”
प्रमिलाही तिथे येते..
“मीही हेच सांगत होते तिला, की मोकळी हो, पण ती ऐकत नाहीये..”
“कसं ऐकेल, अख्ख जग एकीकडे आणि आईची माया एकीकडे असते..”
मामा मामीकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो..
“असं बघू नका, पदरात आलेलं वांझोटेपण आईपणाची माया बदलत नाही..”
“मग काय म्हणायचं आहे तुला??”
“ते मूल…ते मूल आपण पदरात घेऊ..बाळासाठी आपले सगळे उपाय संपलेत.. आयुष्यभर निपुत्रिक राहण्यापेक्षा आपण तिचं मूल सांभाळू..”
“लोकांना काय सांगशील?”
“दत्तक घेतलं आपण, असं सांगू..”
मामाही विचारात पडतो, निपुत्रिक असल्याचं दुखं त्यालाही सलतच होतं. आता घरात एक बाळ येणार, घर आनंदाने भरून जाणार, आपण निपुत्रिक नाही राहणार, रक्ताच्याच नात्यातील जीव आता आपल्यात येणार म्हणून मामाचं मन एकदम हरखून गेलं. अपत्यप्राप्ती होणार म्हणून मामा स्वप्न पाहू लागला.
“चालेल, मला हवंय मूल. पण एक लक्षात असुद्या, प्रमिले, ही गोष्ट कुणालाही कळू द्यायची नाही, लांबच्या गावातला डॉक्टर आणतो मी घरी, इकडे नेलं तर लोकं शंका घेतील. आरोहीला जपण्याची जबाबदारी प्रमिला आणि सरिते तुझ्यावर. असंही मळ्यात आपली दोनच घरं आहेत, कुणाक समजणार नाही पण तरीही आरोहीला बाहेर पडू देऊ नका..”
मामीला अत्यानंद झाला, आरोहीचं बाळंतपण अगदी मनापासून करायची मामीची ईच्छा होती.
“पण पुढील सहा महिन्यात आरोहीचे आई वडील इथे आले तर?” प्रमिलाने आपली चिंता व्यक्त केली.
“त्याची खबरदारी मी घेईन” मामा म्हणाला..
“ठीक आहे, चला चला..मला आरोही साठी छान शिरा बनवायचा आहे..आणि हो, डॉक्टरांना लवकर घेऊन या. बाळंतपणात लागणारी काही औषधं देतील ते. आरोहीला काहीही कमी नको पडायला..”
क्षणात वातावरण अगदी पालटून गेलं. प्रमिला आणि मामी आरोहीच्या कोडकौतुकात राबू लागले. तिला हवं नको ते सगळं पाहू लागले.
आरोही मनोमन समाधानी होती, तिचं बाळ या जगात येणार यापलीकडे तिला काय हवं होतं? मामीकडे का होईना, मूल आपल्या नजरेसमोर राहील. पूढे आपलं काय होईल याची काळजी तिने सोडली होती. पोटाला हात लावत मानवचा स्पर्श ती अनुभवत होती. अपघाताने का होईना, पण आईपण हे आईपण असतं. बाळासाठी संपूर्ण जगाशी लढायची ताकद हे आईपणच देतं.
आरोहीला सहावा महिना लागला, बाळाची पोटात असलेली हालचाल जाणवू लागली होती. मामी आणि प्रमिला सगळी कामं सोडून पोटातल्या जिवाजवळ बसून असत.
“झोपला असेल का गं? शांत दिसतोय..”
“उठायची वाट बघूया..”
तोच आरोहीने दोघींचे हात पोटावर घेतले..
“बाळ उठलं बघा..”
बाळाची हालचाल दोघींजणी अनुभवू लागल्या. प्रमिला मावशी बनून कौतुक करून घेत होती तर दुसरीकडे मामी स्वतःचं आईपण दुसऱ्याच्या गर्भातून अनुभवत होती.
“आरोही, दुपारी माझ्याकडे ये जेवायला, तुझ्यासाठी आज मस्त खीर पुरीचा बेत केलाय..”
“म्हणजे आम्हाला नाही का जेवण?”
“तुम्हीही या मामी..”
“अगं गम्मत केली, स्वयंपाक झालाय माझा, तुम्ही जेवा छानपैकी, मी घरातलं आवरून घेईल तोवर..”
आरोही प्रमिला कडे जेवायला जाते. जेवण होताच दोघीजणी अंगणात बसतात. प्रमिलाचं लक्ष मामाच्या घराकडे जातं.
“आरोही, कोण आलंय गं? दारापुढे कुणाची गाडी उभी आहे??”
आरोही तिकडे बघते आणि तिला दरदरून घाम फुटतो..
“आई बाबा??”
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
2 thoughts on “खेळ मांडला (भाग 12)”