लग्नाच्या मंडपात खूप वर्दळ सुरू होती, एकमेकांशी बोलताना सुद्धा मोठ्याने बोलावं लागे. प्रमिलाच्या भावाचं लग्न होतं. आई वडील नसल्याने तिलाच सगळं काही करावं लागत होतं. सर्व नातेवाईक, भावाचे मित्रमंडळी, तिच्या सासरची माणसं.. सर्वांना भेटून जेवणाचा आग्रह करत ती नुसती धावाधाव करत होती. पण एवढ्या सगळ्या गडबडीत मात्र तिचं लक्ष लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होतं. कारण आज आरोही येणार होती लग्नाला. जवळपास 15 वर्षांनी दोघी एकमेकींना भेटणार होत्या. आरोही प्रमिलाला ओळखणार नाही हे प्रमिला ला माहीत होतं आणि जाणूनबुजून आरोही समोर जायचं नाही असं तिने ठरवलं होतं.
“प्रमिला..अगं पुजेचं ताट कुठाय?”
“आणते मी..” प्रमिला लगबगीने आत गेली..
“कुंकू कोरडा नको, जरा ओला करून आण..”
शेजारीच जेवणाच्या पंगतीच्या बाजूला पाण्याची सोय होती, प्रमिला तिकडे गेली आणि बोटावर 2 थेंब पाणी घेत होती..
“Excuse me… बाजूला होता का..”
मागून एक चकचकीत साडीत असलेली, रेशमी मानेपर्यंत मोकळे केस सोडलेली, मेकप ने अजून बहरलेल्या सौंदर्यात अशी आरोही तिला दिसली.. तिला बघताच तिच्या गळ्यात हात टाकून मिठी मारावीशी तिला वाटली, पण प्रमिला तिला बघतच राहिली..डोळ्यात अश्रू उभे राहिले.. आरोहिला विचित्र वाटलं. प्रमिला भानावर येताच तिने पटकन चेहऱ्यावर पदर ओढला आणि तिथून निघाली.
“काय झालं होतं हिला? स्ट्रेंज ना..” आरोही आपल्या नवऱ्याला म्हणाली..
“तू दिसतेच इतकी सुंदर की कुणीही बघतच राहील..”
“तुपण ना नकुल..”
प्रमिला पूजेच्या जागी कुंकू देऊन येते, मंडपाच्या बाजूलाच असलेल्या खोलीत जाऊन खिडकी
आडून आरोहीला बघत राहते.
आरोही..प्रमिलाची सगळ्यात जवळची मैत्रीण, तिच्या आयुष्याच्या सर्व घटनांची साक्षीदार. आरोहीला जेव्हा घरच्यांनी गावी पाठवलं होतं तेव्हा तिच्याच शेजारी प्रमिला अन तिचा भाऊ राहत होता. त्या गावात ती दोनच घरं जवळ होती, बाकी सगळी घरं दूर, त्यामुळे दोन्ही घरांना एकमेकांची साथ होती. आरोहीच्या मामा मामीला मुलबाळ नव्हतं, आरोहीला ते जीवापाड जपत, पण तो एक accident आणि..
प्रमिलाला ते आठवलं तरी अंगावर काटा यायचा, त्या एका घटनेने सर्वांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ केली होती. पण आरोही या दुःखातून कधीच मोकळी झालीये, कारण accident मध्ये तिची स्मृती गेली अन मागचं सगळं तिने क्षणात पुसलं. त्या क्षणानंतर तिचं जे आयुष्य आहे तेवढंच तिला माहीत आहे. त्या आधी जे काही घडलं, ते फक्त आणि फक्त मला माहित आहे..
“प्रमिले..”
मागून आरोहीच्या आईने खांद्यावर हात ठेवला..
“काकू…” रडतच प्रमिला त्यांच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागली..
“रडू नकोस बाळ, तुझी मैत्रीण तुला ओळखत नाही याचंच वाईट वाटतंय ना? पण नियतीच्या खेळापुढे काय चालणार..तिची स्मृती काही केल्या परत येत नाहीय..त्यामुळे आम्हीही तिला आमचीच नव्याने ओळख करून देतोय, मोठ्या मुश्किलीने तिने आम्हाला आई वडील म्हणून स्वीकारलं… या लग्नात तुला बघून तिला काहितरी आठवेल म्हणून..”
“नाही काकू..नाही…तुम्ही माझी ओळख तिला करून देणार नाही..मला वचन द्या..”
“अगं पण का??”
प्रमिला काहीएक न बोलता तिथून पाय काढते..
“कसं सांगणार काकू तुम्हाला.. ती मला ओळखत नाही याचं दुखं नाही मला, पण मला पाहून तिचा तो भूतकाळ तिला आठवला, ज्याची साक्षीदार केवळ मी होते…तर…सगळं उध्वस्त होईल..तिचं आयुष्य, मानवचं आयुष्य..आणि…आणि…त्या बाळाचं..”
प्रमिला मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत तिच्या कामाला पळते. इकडे आरोही आणि तिचा नवरा नकुल लग्न समारंभात छानपैकी गप्पा मारत होते..आरोहीच्या ओळखीची बरीच माणसं असली तरी तिला काही ओळखू येत नव्हती..
“आर्वी पळू नकोस..आर्वी…इकडे ये..आर्वी ऐकशील का माझं??”
मानव त्याच्या मुलीच्या मागे मागे पळत होता..अचानक ती मुलगी आरोहीच्या समोर येऊन पडली..आरोहीला एकदम काळजात कळ उठली, तिने धावत जाऊन मुलीला उचललं..तिला शांत केलं..छातीशी धरलं..नकुल आणि आरोहिचे आई वडील बघतच राहिले..ज्या आरोहीला लहान मुलांचा तिटकारा होता तिने असं कसं केलं?
आरोहीला आर्वीची मिठी सोडवत नव्हती. आर्वी रडत होती, मम्मा मम्मा म्हणून आवाज देत होती..मम्मा शब्द ऐकताच आरोही तिला अजून जवळ घेई..आरोहीला स्वतःला कळेना ती असं का करतेय? काय नातं आहे तिचं आर्वी सोबत? शेवटी आर्वीचे वडील तिथे आले आणि आर्वीची सुटका केली..
“सॉरी मॅडम, माझी मुलगी फार…”
आर्वीच्या डॅडी ने नजर वर केली तसं त्याचे शब्द थांबले, श्वास थांबला… सगळंच थांबलं…एकेक क्षण जागा झाला, पंधरा वर्षापूर्वीचा..होय, हा मानव होता..
“Its ok… गोड आहे तुमची मुलगी..”
आरोही अगदी सहज म्हणाली, आरोही मला ओळखत नाही की न ओळखण्याचं नाटक करतेय? मानव गोंधळून गेला..
आरोहीच्या आई वडिलांनी मात्र मानवला ओळखलं होतं.. मानवचं नाव ते सतत पेपरमधून, मासिकातून, tv मधून ऐकतच होते.. एक यशस्वी व्यावसायिक म्हणून…पण कितीही झालं तरी त्याच्या बद्दल अढी कायम होती..
मानव आर्वीला घेऊन पुढे निघाला, पण आरोही मात्र आर्वीच्या हाताला सोडवत नव्हती..शेवटी आरोहीच्या आईने तो हात सोडवला..आरोहीला तिच्याच इंद्रियांनी तिच्यासोबत चालवलेला खेळ समजत नव्हता..
क्रमशः
पुढील सर्व भाग 👇👇👇
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Khup sundar..
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks.