खापर कायम आईवरच…

 संध्याकाळचे 7 वाजून गेले तरी मंगेशचा पत्ता नव्हता, कॉलेजमधून एरवी 4 वाजताच घरी परतणाऱ्या मंगेशला आज इतका उशीर का झाला हेच समजत नव्हतं… आई काळजीत पडली, त्याचा फोन बंद येत होता. आणि त्याचे मित्र तर फोनही उचलत नव्हते. आईच्या मनात विचित्र विचार येऊ लागलेले… त्यात घरातले सासू सासरे सतत विचारून तिला हैराण करत होते. 6 वाजता मंगेशचे वडील घरी आले…तेही काळजीत पडले…सर्वजण काळजीत असताना सगळा राग मात्र मंगेश च्या आईवर काढत होते…

“कुठे गेला असेल हा मुलगा? इतका निष्काळजीपणा? एक फोन करता येत नाही..”

“तरी मी राधा ला सांगत असायचे, पोराकडे जरा लक्ष दे…कितीही मोठा झाला तरी लहानच ते…समज नसते मुलांना..” सासूबाईंच्या तोंडून निघालं..

“हिलाच अक्कल नव्हती… मी म्हणायचो, त्याला बस ने जाऊ दे कॉलेजला..पण नाही, गाडीने जाऊ द्या म्हणे…लोण काढून गाडी घ्यायला लावली…घ्या आता.”

“कसले लाड पुरवता रे तुम्ही, कशाला हवी होती गाडी कुणास ठाऊक…आमच्या वेळी आठवडाभर पोरं रडायचे, जेवण सोडून द्यायचे तेव्हा कुठे त्यांना सायकल मिळायची…आजकाल आयांनाच पुळका पोरांचा…शिस्त लावायला नकोच त्यांना..”- सासरे

जो येईल तो राधावर खापर फोडत होतं, आधीच राधा मुलाच्या काळजीने त्रस्त होती त्यात हे सगळं ऐकून तिचा थरकाप उडत होता…

“मला वाटतं मी त्याच्या कॉलेज मध्ये जावं…7 वाजत आलेत आता..”

वडील निघणार इतक्यात मंगेश दारात उभा…

“मंगेश??? कुठे होतास? आम्ही किती काळजीत..”

“बाबा सॉरी सॉरी…सगळं सांगतो…तुम्ही बसा आधी..”

राधाच्या जीवात जीव आला…ती त्याच्यासाठी चहा ठेवायला आत निघून गेली…चहा घेऊन बाहेर आली तेव्हा मंगेश सांगत होता..

“बाबा…अहो आज काय झालं, माझ्या मित्राने एका presentation स्पर्धेत भाग घेतला होता… इन्व्हेस्टर पिच डेक म्हणतात त्याला…त्याची गाडी बंद पडली, मग त्याने मला सोडायला लावलं..”

“तरी पण इतका वेळ??”

“खरी गंम्मत तर पुढे आहे…त्याला एकदम चक्कर आली, आत हॉल मध्ये त्याचं नाव पुकारलं गेलं, त्याला उठता येईना..तो म्हणाला मला बरं वाटत नाहीये, माझ्या ऐवजी तू जा”

“असं थोडी चालतं..”

“अहो बाबा इथे एका टीम ने प्रेसेंटशन द्यायचं होतं, त्याच्यासोबत कुणीच नव्हतं मग ऐनवेळी माझं नाव दिलं आणि मी गेलो प्रेसेंटशन द्यायला…माझा फोन बंद पडला, आणि मित्राच्या फोनवरून कॉल करायलाही वेळ नव्हता”

“अरे बापरे…ऐनवेळी?? तुझ्याकडे तर काहीच नसेल…मग??”

“तेच ना..माझ्याकडे लॅपटॉप नव्हता ना कसलं प्रेसेंटशन… मग मी सरळ व्हाइट बोर्ड मागवला, आणि त्यावर एक बिझनेस प्लॅन इन्व्हेस्टर ला समजावला…मागे नाही का मी घरपोच किराणा गाडी बद्दल सांगितलं होतं…माझ्या डोक्यात ती आयडिया होतीच, मी थोडा रिसर्च पण केलेला….मग ते सादर केलं..”

“अरेवा…मग??”

“बाबा त्या इन्व्हेस्टर ला ते इतकं आवडलं की त्यांनी माझ्या बिझनेस मध्ये 30 लाख गुंतवण्याचं कबूल केलं..”

“काय सांगतोस बाळा….खरं की काय??” बाबा आनंदाने फुलून जातात…

इतक्या वेळ असलेलं तणावाचं वातावरण एकदम निवळून जातं आणि सगळे एकदम कौतुकाने फुलून जातात…कॉलेज संपायच्या आधीच मंगेश कडे मोठी संधी आलेली…

“खरंच तुझ्या बाबांवर गेलाय, त्यांनाही अशीच बिझनेस ची आवड…शेवटी त्याचंच रक्त तू..” सासूबाई म्हणाल्या..

“अगं बाबा सुदधा नाही का, किराणा दुकानाचं लावून धरलं होतं त्यांनी मी लहान असताना, शेवटी नातवाने त्यांचं स्वप्न पूर्ण केलं..”

“पण ऐनवेळेस असं सर्वांसमोर धिटाईने बोलायलाही हिम्मत लागते बरं का…तुझ्या आजीसारखाच बोलका तू, वाया नाही जाणार हे माहीत होतं..”

सर्वजण या यशाचं श्रेय आपल्याकडे घेऊ पाहत होतं, राधा मात्र शांतपणे आपल्या मुलाचं कौतुक पाहत होती…इतका वेळ मंगेश च्या वागण्याचं खापर तिच्यावर फुटत होतं, आणि अचानक त्याच्या यशाची कुणकुण लागताच सर्वजण बदलून गेले…तिला आधीचे दिवस आठवले…

मंगेश लहान असताना रांगत रांगत वडिलांजवळ आला, वडील पेपर वाचत होते… रांगता रांगता तो जागीच जरा धडपडला, वडील चिडून राधालाच बोलू लागले..घरातली कामं करत असताना मंगेश सासू सासऱ्यांजवळ खेळायचा…पण ती दोघे फक्त बसून गम्मत बघत असायचे… त्याची अगदी पॅन्ट बदलायची असेल तरी राधा ला आवाज द्यायचे, राधा बिचारी 10 वेळा गॅस बंद करून त्याच्याकडे पळायची…आणि आज मंगेश च्या यशाचं तसूभरही श्रेय तिच्या पदरात पडलं नाही…

सांगायचा मुद्दा एवढाच, की मुलावर संस्कार करायची जबाबदारी जेवढी आईची असते तेवढीच ती घरातील इतर मंडळींची असते…समाजाची असते…मुलगा चांगला निघाला की श्रेय सर्वजण घेतात…पण जरा चुकीचा वागला की आईवर खापर फोडून मोकळे….
अगदी लहानपणापासून सुदधा, मुलाने जरा काही हट्ट केला…किंवा जरा काही त्रास दिला की सगळे बोल आईलाच…

मंगेश हळूच किचन मध्ये गेला…

“आई…किराणा गाडीची कल्पना तू मला दिली नसतीस तर मी आज काहीच बोलू शकलो नसतो..”

राधा ला कृतकृत्य झालं…श्रेय घेण्यापेक्षा मुलाच्या यशानेच तिचं पोट भरलं होतं… आणि इतर कुणी नाही पण मुलाने श्रेय दिलं याचं समाधान तिच्या डोळ्यात तरळून गेलं…

4 thoughts on “खापर कायम आईवरच…”

  1. आई अशीच असते तिला श्रेय नको असत मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान हवं असत तीच कर्तव्य ती करतच असते पण घरातील सर्वांनी समजून घेतलं तर तो आनंद अजून द्विगुणीत झाला असता

    Reply

Leave a Comment