कुणाच्या खांद्यावर…
बहिणीच्या लग्नात वहिनीची धावपळ मी बघत होते, दोन मिनिटं बसायला तिला उसंत नव्हती, तिकडे दादा मात्र निवांत खुर्चीवर बसून मित्रांसोबत गप्पा मारत होता..त्याच्यासोबत बसलेला माझा मामा..लग्न म्हणजे पुरुषांना निवांत बसण्याची जागाच जणू..एकदा का खुर्च्यांवर बुड टेकवले की जेवायलाच उठणार…मामाची बायको मात्र इकडे पाहुण्यांना चहा देण्यात गर्क होती..अधूनमधून मामा मामीला हाक मारून नवीन आलेल्या पाहुण्यांना चहासाठी आग्रह करत होता, तेवढाच काय तो त्याचा पराक्रम..
दोघांकडे बघून मला परिसाची आठवण झाली, एखादा परिसस्पर्श व्हावा अन आयुष्य उजळून निघावं असंच काहीसं या दोघांचं..1 वर्षांपूर्वी वहिनी घरात आली, कोण होती ती आमची? रक्ताचं नातं नव्हतंच, पण ‘दादाची’ म्हणून ती घरात आली, काय गरज होती तिला सर्वांसाठी इतकं करायची? का करत होती ती?? करत होती ते दादाचा मान जपण्यासाठी.. तिच्या असण्याने, तिच्या वागण्याने दादाची मान उंचावणार होती…तशीच आमची मामी, आमच्याकडे मामी म्हणजे घरात कामं करण्याचं हक्काचं माणूस, ननंदेच्या घरी कितीही प्रवास करून थकून गेलं तरीही स्वतः चहा ठेऊन सर्वांना द्यायचा अशी परंपरा… तीही आठ दिवस आधीच येऊन बसली, दिवसरात्र काम करत होती..कुणासाठी??
स्त्री हे अजब रसायन आहे, ओळख ना पाळख, ना रक्ताचं नातं. तरीही झटणारं.. आपल्या नवऱ्याचा सन्मान जपण्यासाठी..आणि माणसंही स्वतःच्या सन्मानाची जबाबदारी बायकोवर देऊन निर्धास्त… एखाद्या कार्यात कुणाची बायको किती काम करते यावरून त्या माणसाची पारख…मग आपल्या नवऱ्याच्या सन्मानाची जबाबदारी समर्थपणे पेलून, काल ओळख झालेल्या माणसांसाठी स्वतःला झोकून द्यायचं…हे केवळ एक स्त्रीच करू शकते..
किती अजब आहे ना हे??