सुरभी शहराकडे रवाना झाली. आलेल्या सर्व मंडळींना तिने घरी आणलं. आईला आनंद झाला, माहेरची मंडळी आलीत म्हणून तिने खास पाहुणचार केला. दुपारच्या वेळी सर्वजण जरा पहुडले असता आईने सुरभीला बाजूला घेऊन विचारलं,
“काय गं? असा काय चमत्कार केला तू की ही माणसं लागलीच तयार झाली??”
“जाताना मी बघ काही समान नेलेलं, त्यातूनच हा चमत्कार..”
“म्हणजे?”
“हे बघ, मी एका डिश मध्ये पाणी घेतलं आणि त्यात काळी मिरी पावडर टाकली. दोन वाट्या घेतल्या, एकात साबणाचं पाणी तर दुसऱ्यात साधं पाणी. आता साबणाच्या पाण्यात बोट बुडवला आणि तो डिश मध्ये धरला की मिरे पावडर चटकन बाजूला पसरते..विज्ञान आहे हे. आणि ज्यांना मला शहरात आणायचं होतं त्यांना मी वाटी गपचूप अदलाबदल करून साबणाच्या पाण्यात बोट बुडवायला लावला. मिरे पावडर बाजूला झाली आणि त्यांना सांगितलं की असं झाल्यावर लक्ष्मी दूर पळते. सर्वांच्याच बाबतीत असं झालं नाही, कारण वेळोवेळी आम्ही वाटी बदलत गेलेलो”
“म्हणजे या मंडळींना तू मुद्दाम साबणाची वाटी पुढे केलीस?”
“हो..”
“चांगलीच हुशार निघालीस गं, म्हणून काल विचारत होतीस का? की खऱ्या गोष्टी साठी वागलेलं खोटं हेही खरंच असतं म्हणून??”
“हो आई, बरं ते जाऊदेत. या सर्वांना आपल्या घरात इतके दिवस राहायला अवघडल्यासारखं होईल. आपण आपला भाड्याने दिलेला फ्लॅट आता असंही रिकामाच आहे, तिथे सोय करूया यांची..”
“तुझ्या बाबांना विचारं आधी..”
सुरभिने बाबांची परवानगी काढून या सर्व मंडळींना राहायची आणि खाण्याची सोय करून दिली. एक मोठं काम पूर्ण झालं होतं. पहिला दिवस या सर्व मंडळींना आराम करायला सांगून सुरभी ऑफिसला गेली, आता कोणते शो करायचे, दिग्दर्शन कोणी करायचं, कॅमेरामन कोण असेल, एडिटिंग कोण करेल हे सगळं ठरवायचं होतं. सुरभीकडे सर्व धुरा असल्याने ती जे सांगेन ते सर्वांना करावं लागणार होतं. मिलिंद नामक एक सिनियर व्यक्तीला हे पचवणं फारच अवघड जात होतं. त्याला नोकरीची पर्वा नव्हती पण इतरांच्या हो ला हो मिळवत तोही फक्त मान डोलवत होता.
“तर, आपल्या शो साठी जे कलाकार लागणार आहेत त्यांची व्यवस्था झाली आहे. आता आपण प्रोग्रॅम कुठले करायचे हे ठरवूया..”
“चॅनेल साठी प्राईम टाइम महत्वाचा आहे, त्या वेळातले कार्यक्रम दुपारी आणि रात्री रिपीट टेलिकास्ट होतील, त्यामुळे आपल्याला सहा असे कार्यक्रम करायचे आहेत त्यातला प्रत्येक कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल”
“सुरभी आता हेही तूच सांग..”
“आपला पहिला कार्यक्रम, सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान.. भजन चालू राहील..”
“भजन? लोकं कशाला ऐकत बसतील भजन?”
“बराचसा प्रेक्षकवर्ग हा वयस्कर व्यक्तींचा आहे, आजवर भजन गाताना फक्त दाखवलं गेलं आहे, आपल्याला आता भजना सोबत भजनातल्या एकेक वाक्याची चित्रफीत तयार करायची आहे..”
“म्हणजे कसं?”
“म्हणजे एक अभंग आहे…विठ्ठल नामाची शाळा भरली..त्यात विठ्ठल भक्तीत दंग झालेले वारकरी दाखवायचे..स्पेशल इफेक्ट्स देऊन त्यांच्यातील उत्कट भाव स्क्रीनवर आणायचे..”
“हे असं केलं तर छान होईल..”
“पहिला कार्यक्रम झाला..नंतर संध्याकाळी 6 वाजता एक स्टँडअप कॉमेडी असेल, ज्यात काही व्यक्ती एकपात्री विनोद सादर करतील..”
“नंतर?”
“7 वाजता एक डान्स शो असेल, ज्यात तरुण मंडळी काही विशिष्ट नृत्य करतील आणि प्रेक्षकांना शिकवतीलही..8 वाजता एक मालिका असेल, जी गावाकडच्या कुटुंबावर आधारित असेल, शेतकरी कुटुंबाचं चित्रण, त्यांचे प्रश्न, त्यांच्या गमती जमती, तिथले प्रेम प्रकरण ..यासाठी एक ग्रामीण लेखक शोधून स्क्रिप्ट लिहायला घ्या आणि दिनेश, तू या मालिकेचं सूत्र सांभाळ..”
सर्वजण दिनेश कडे बघू लागले, दिनेश नवखा मुलगा होता पण ही जबाबदारी आल्याने तो मन लावून काम करेल अशी सुरभीला खात्री होती..
____
काम सुरू झालं, भजनी मंडळाकडून भजन रेकॉर्ड करण्यात आलं, स्पेशल इफेक्ट्स साठी शूटिंग आणि एडिटिंग पार पाडण्यात आलं. तरुण मंडळींना घेऊन डान्स शो बनवण्यात आला, त्यात या मुलांनी तीन पावली प्रकार स्टेप बाय स्टेप सांगितला..नाचातले एकेक प्रकार समजावून सांगितले, या सगळ्या प्रकारात नानासाहेब सर्व व्यवस्था बघत होते. स्टँडप कॉमेडी साठी आजीबाईंना दाखवायचं होतं पण त्या गावात नसल्याने दुसऱ्या काही मुलांना घेऊन शो रेकॉर्ड झाला. हा शो मात्र नानांना काही आवडला नाही. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं. ब्रॉडकास्ट टीम सोबत त्यांना काम करायला लावलं होतं. नानांनी सगळी माहिती घेऊन ठेवली होती आणि नानांना आता सगळं कामही जमू लागलं. चॅनेलच्या व्यवस्थापनाचं काम नानांकडे होतं.
महिना उलटला, आता रेकॉर्ड केलेले शो प्रसारित करायची वेळ आली होती. चॅनेल वर नवीन मालिका येत आहेत याची मार्केटिंग करण्यात आली होती. काहीतरी वेगळं म्हणून प्रेक्षक हळूहळू चॅनेल बघू लागले.
सकाळचे 8 वाजले, सर्वांजन TRP stat वर लक्ष ठेऊन होते. सुरेल आवाजात भजन सुरू झालं..
“हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा..”
या अभंगावर चित्रण करण्यात आलेलं.. ऑफिसला जाणारा एक मोठा अधिकारी रस्त्यात गाडी थांबवून देवाचं दर्शन घेतो, एक लहान मुलगा आईचं बघून देवाला नमस्कार करतो अश्या प्रकाराचे प्रसंग अभंगावर दाखवण्यात आले. ऐकायला आणि बघायला हे इतकं सुरेख होतं की चॅनेल च्या trp मध्ये वाढ दिसून आली. स्टाफ मेम्बर टाळ्या वाजवू लागले. पहिला शो यशस्वी झालेला.
नंतर संध्याकाळी 6 वाजता स्टँडप कॉमेडीचे रेकॉर्डिंग लावण्यात आलं, हे मात्र फारसं काही चाललं नाही. नानांना हे आधीच माहीत होतं. पण सांगणार कुणाला?
स्टाफ मधील सिनियर मेम्बर, मिस्टर रविराज..यांना आधीपासूनच सुरभीच्या हाताखाली काम करणं मान्य नव्हतं. कानामागून आली अन तिखट झाली असं त्यांना वाटे. सुरभीने चॅनेलला जर वर आणलं तर आपली किंमत राहणार नाही आणि कायम तिच्या हाताखाली काम करावं लागेल या विचाराने रविराज यांनी एक गेम केला. स्टँडप कॉमेडी साठी असलेली रेकॉर्डिंग त्यांनी ब्रॉडकास्ट च्या काही लोकांना पैसे देऊन गायब केली.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या वेळी रेकॉर्डिंग न सापडल्याने सर्वांची धांदल उडाली. सर्वजण घाबरले, एक तर कसेबसे चॅनेल ला वाचवण्यासाठी एक संधी मागितली त्यात हे असं..
पण अश्या संकटप्रसंगी नाना असताना टेन्शन कसलं? गावकडचं लग्न असो वा टेक्निकल गोष्टी, नाना कायम पुढे. त्यांनी अर्धा तास कार्यक्रम पुढे होणार अशी सूचना द्यायला लावली अन ते गाडी घेऊन बाहेर गेले. स्टाफ मधील सर्वजण चिडले, अश्या बिकट।प्रसंगी नानांनी का जावं बाहेर? पण सुरभी मात्र निश्चिन्त होती, तिला माहीत होतं की नाना काहीतरी करणार..
अर्ध्या तासाने नाना हजर, तेही आजीबाईंना घेऊन. आजीची गरज लागेल हे नानांना आधीच माहीत असल्याने नानांनी तिला आधीच खोलीवर आणून ठेवलं होतं. आजीबाई आल्या, नानांनी सगळ्या सूचना सांगितल्या, आजीबाई तसूभरही घाबरल्या नाहीत.
नानांनी लाईव्ह शो सुरू करायला लावला..
आजीबाईंनी गावाकडच्या मजेदार गोष्टी सांगितल्या, गमतीशीर प्रसंग अगदी रंगवून सांगितले, प्रेक्षकांना ते प्रचंड आवडलं, आजीबाई सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आणि आजीबाईंच्या शो ला खूपच डिमांड मिळू लागली.
तेच तेच कथानक, अतिशयोक्ती असलेले प्रसंग, कृत्रिम अभिनय या सर्वांना कंटाळलेले प्रेक्षक सुरभीच्या चॅनेलकडे वळू लागले होते. सकाळी भजनाचा कार्यक्रम, नंतर नृत्य प्रशिक्षण, एकपात्री विनोद आणि भावनिक मालिका यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सहजसुंदर अभिनय आणि कालागुणाची कदर प्रेक्षकांनी केली होती. साहजिकच TRP ची आकडे वाढले होते, चॅनेल टॉप 5 मध्ये पोहोचलं होतं.
सहा महिने उलटले, चॅनेलच्या अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी चॅनेल बंद करायचा आदेश दिला होता, आज त्यांनीच येऊन सर्वांची प्रशंसा केली..
“खरंच, तुम्ही करून दाखवलंत..”
“सर, हे आमचं नाही..या गावाकडच्या टॅलेंटचं यश आहे, त्यांनी इथे येऊन जी करामत केली त्यानेच सगळं रूप बदलून गेलं..”
अधिकाऱ्यांनी चॅनेल बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आणि सर्वांच्या नोकऱ्या वाचल्या. मिस्टर देसाईंचा कट लक्षात आल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं, अर्थात त्यांचं खोटं हे नानांनीच पकडून दिलं होतं.
ही मंडळी आता शहरात स्थायिक झाली, त्यांचं राहणीमान सुधारलं, ते सेलिब्रिटी झाले, जिथे जात तिथे लोकं त्यांच्यासोबत फोटो काढत होते, सह्या घेत होते. पण ज्या सुरभिने त्यांना इथवर आणलं तिच्याबद्दल ही लोकं नेहमी कृतज्ञ होते. चॅनेलचे हेड सुरभीला भेटायला आले..
“सुरभी मॅडम, खरंच कमाल केलीत तुम्ही. असं तळागाळातल्या टॅलेंटला स्क्रीनवर आणून एक नवीन प्रयोग केला आणि त्याने चमत्कारच घडला की..”
“सर तुम्हीच म्हणाला होता ना. टॅलेंट मॅनेजर फक्त एक पोस्ट नाही, तर ती एक जबाबदारी आहे..टॅलेंट असलं तरी ते शोधून काढून त्याला योग्य दिशा देणं हे माझं काम..”
“बरोबर…सुरभी मॅडम, तुम्ही खऱ्या अर्थाने आज किंगमेकर झालात.. किंग कुणीही बनतो, पण किंगमेकर मात्र एकच असतो..”
समाप्त
1 thought on “किंगमेकर (भाग 7 अंतिम)”