का मागे पडतो मराठी माणूस व्यवसायात?

“हॅलो, एक enquiry करायची होती..”

“आज संडे आहे मॅडम, उद्या फोन करा..”

असं म्हणत त्या बाईने घाईगाईने फोन ठेऊन दिला. मी फोन स्क्रीनवर त्या इन्स्टिट्यूट ची माहिती बघू लागले, गुगल रेटिंग फक्त 2 स्टार….मनातल्या मनात हसू आलं, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते हे..!!! आधीच उतरती कळा लागलेली त्या इन्स्टिट्यूटला, वर असा attitude… बरं जाऊद्या, रविवार आहे, फोनवर केवळ महिती द्यायलाही वेळ नसेल…असो!

एका टेक्निकल कामासाठी बाहेरून काम करवून घेणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मी तत्सम काम करणारी इन्स्टिट्यूट इंटरनेटवर शोधत होते. त्या काळात राजकारणात सेनेचा मराठीवाद उफाळून आलेला अन नाही म्हणता म्हणता माझ्यातही मराठी माणसाला न्याय देण्याची भाषा उमटू लागलेली. परप्रांतीयांचे आक्रमण, मराठी भाषेचा वापर या गोष्टी मलाही पटू लागलेल्या, त्यामुळे हे काम एखाद्या मराठी माणसालाच द्यायचं असं मनाशी पक्क केलं आणि कामाला लागले..

लिस्टमधून गाळून दुसरं नाव पाहिलं, फोन केला..

“हॅलो, एक enquiry करायची होती..”

“हा बोला..”

“अमूक अमुक असं काम आहे..”

“अरे बापरे, हे फार मोठं काम आहे आम्ही आजपर्यंत केलेलं नाहीये हो…दुसरीकडे करून मिळेल..”

फोन ठेवला, अरे कुठलंही मोठं काम पहिल्यांदा कुणीतरी करतच की..आव्हान घ्यायला काय हरकत होती? असो..

पुढचं नाव, पुन्हा फोन..

“हॅलो एक enquiry करायची होती… अमुक अमुक असं काम करून मिळेल का?”

“अच्छा…बरं बघतो, तुम्हाला कळवतो..”

त्याच्या टोन वरून तो कळवणार नाही हे समजून चुकलं…

पुढचं नाव..

“हॅलो, अमुक अमुक असं काम करून हवंय..”

“ठीक आहे, पण खर्च जास्त येईल.”

“किती?”

“एक लाखापर्यंत जाईल..”

“एक लाख? अहो मार्केट रेट पाहिले तर जास्तीत जास्त 40 हजार चं काम आहे हे..”

“नाही मॅडम, कमी नाही होणार..”

लोकांनी बिझनेस सुरू केला की स्वतःला अंबानी समजू लागतात हेच खरं.!!!

पुढचा फोन..

“हॅलो, अमुक अमुक असं काम करून हवंय..”

“तुम्हाला नंबर कुणी दिला?”

“इंटरनेटवर मिळाला?”

“कुणाचा? माझा?”

“हो…डेल्टा इन्स्टिट्यूट आहे ना तुमचं?”

“हो..”

पुढे काय बोलावं मलाच कळेना, माझं काम त्याला समजवावं की तुमचा नंबर इंटरनेटवर कसा आला यामागची प्रक्रिया त्याला समजवावी.. असो!

पुढचा फोन,

“हॅलो, अमुक असं काम हवंय..”

“बरं मी एक नंबर देतो, त्यावर फोन करा..”

बरं… त्याने एक नंबर दिला त्यावर पुन्हा फोन केला.

“हॅलो, असं असं काम करून हवंय..” एव्हाना काम सांगायचा माझा डायलॉग तोंडीपाठ झालेला..

“तुम्ही कुठे राहता?”

“*** इथे..”

“बरं मग ऑफिसला येऊन भेटा, सांगतो..”

“हो पण त्या आधी मला जुजबी माहिती तर द्या, म्हणजे ऑफिसला येता येईल..”

“नाही मॅडम असं फोनवर नाही सांगता येणार..”

राहिलं…

पुढचा फोन..

“हॅलो, अमुक असं काम करून हवंय..”

“मॅडम मी बाहेर आहे, नंतर फोन करतो..”

पुढे,

“हॅलो, एक माहिती हवी होती..”

“बोला ना..”

“असं असं काम आहे..”

“Sample मिळेल का?”

“अहो ते बाजारात ते *** मिळतं ना तश्याच प्रकारचं..”

“अच्छा…ते जमेल की नाही काय माहित.. कधी केलेलं नाही, उगाच चूक झाली तर?”

अरे बापड्या, रॉकेट बनवायचं नाहीये रे, साधं काम आहे…तू असं बोलतोय जसं मी तुला काम देण्यासाठी हात धुवून मागे लागलीये, मार्केटमध्ये शंभर पर्याय मला असताना तू experiment करत बसणार आणि मी रिस्क घेणार, असं कधी असतं का? मनातल्या मनात बोलत मी फोन ठेऊन दिला..

आता शेवटचा फोन..आता माझी सहनशीलता समाप्त झालेली, धाप टाकतच मी फोन लावला..

“हॅलो..मला अमुक एक काम करून हवंय..”

“अच्छा मॅडम, हो जायेगा…आपको 30 हजार तक खर्चा आयेगा और 15 दिन मे काम पुरा बन जायेगा..आपको अगले 2 घंटे मे sample भेजता हू..”

एका झटक्यात त्याने माझं समाधान केलं..म्हटलं वा..!!! सब्र का फल मीठा होता है…याला म्हणतात व्यवसाय करणं…समोरच्याला काय हवंय हे ओळखून त्याला ते पुरवायचं जेणेकरून तोही खुश आणि आपलाही व्यवसाय यशस्वी..फार कमी लोकांना जमतं हे. आधी ज्यांना ज्यांना फोन केले त्यांना व्यवसाय कशाशी खातात हेच माहीत नव्हता..

 त्याचं नाव पाहिलं..

“स्वानंद मिश्रा..”

अरेच्या, हा तर मराठी माणूस नाहीये..फोन करण्याच्या नादात मराठी माणसं फिल्टर करणं राहूनच गेलेलं…पण ते केलं नाही तेच बरं झालं, नाही का? नाहीतर माझं काम फत्ते झालंच नसतं…

व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःला झोकून द्यावं लागतं, आजकालची मुलं व्यवसाय सेट होण्याआधीच अंबानी सारख्या हाय फाय लाईफ स्टाईल ची स्वप्न बघतात, रातोरात लाखो कमवायची स्वप्न बघतात, आणि मूळ मुद्दा राहतो बाजूलाच.व्यवसाय उभा करणं म्हणजे 24 तास स्वतःला झोकून देणे, अधिकाधिक उत्तम करण्याचा ध्यास घेणे, ग्राहकांना आकर्षित कसं करता येईल याचा कल्पना आखणे, वेगवेगळ्या युक्त्या वापरून मालाचा खप वाढवणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहक जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्याशी संवादाच्या माध्यमातून एक नातं तयार करणे..नाहीतर काही दुकानात/इन्स्टिट्यूट मध्ये कुणी enquiry साठी गेला की टेबल वरचा माणूस असा बघतो की “हे कोण तरफडलं इथे?” 

त्याच्या तोंडावरची माशी हलत नाही, मग सगळे प्रयत्न बिचाऱ्या ग्राहकालाच करावे लागतात… मला काय हवं आहे, काय अपेक्षित आहे हे जीव तोडून सांगावं लागतं.. ग्राहकाला तेव्हा गरज असते, पण नंतर तो ग्राहक पुन्हा येणार नाही अशी जबाबदारी व्यावसायिक स्वतःच चोख पार पाडतात आणि नंतर म्हणतात..”या बिझनेस मध्ये काही स्कोप नाही..”

“मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही” असं जे म्हणतात ते का म्हणतात हे वरच्या संभाषणातून तुमच्या लक्षात आलंच असेल…अर्थात अपवाद आहेतच, व्यावसायिक क्षेत्रात अनेक दिग्गज मराठी लोकं आहेत..यशस्वी आहेत, त्यामुळे हे विधान 100% खरं आहे असं म्हणता येणार नाही…पण खोटं आहे असही नाही…

काय वाटतं तुम्हाला? प्रतिक्रिया अपेक्षित

©संजना इंगळे

Leave a Comment