#काळ
काळ किती वेगाने पुढे जात असतो नाही का? एकेकाळचा वर्तमान सुदधा आता भूतकाळात बदललेला असतो, पण आयुष्यात मागे सोडून गेलेल्या माणसांचं वय मात्र आपल्या बुद्धीतुन काही पुढे सरकत नाही. आता हेच बघा ना, माहेरी एका वहिनीला बाळ झालं असता कौतुकाने आम्ही त्याला खेळवत असायचो, नंतर कधी आमची भेटही झाली नाही, एकदा अचानक माहेरी रस्त्यावरून काही मुलं जोराने सायकल पळवत होती, त्यातला एक चुणचुणीत मुलगा म्हणाला,
“मावशी बाजूला सरका..”
आईला म्हटलं कोण आहे हा? आई म्हणे त्या वाहिनीचा मुलगा..
क्षणभर विश्वासच बसेना, अगदी कालच त्या दुपट्यात गुंडाळलेल्या बाळाला खेळवत होते, आज इतका मोठा झाला तो?
कॉलेजमध्ये असतांना गल्लीतल्या वेण्या घातलेल्या लहान मुली घरी यायच्या, फॅन्सी ड्रेस स्पर्धा असो वा शाळेतला एखादा प्रोजेक्ट, ताई ताई करत हक्काने मदत मागून घ्यायच्या, आज त्यांच्याच लग्नाची पत्रिका हातात पडताना अगदी धस्स होतं. या अजाण कोवळ्या मुलीचं इतक्या लवकर लग्न? मग लक्षात येतं, काळ सर्वांसाठी सारखाच असतो, आपल्याला समांतर आपली माणसंही पुढे सरकत असतात.. मग बुद्धीचा अन मनाचा मेळ बसवताना नाकी नऊ येतात, मुली आता मोठ्या झाल्यात, लग्नाच्या वयाच्या झाल्यात..पण मनात मात्र आठवणीतील वयच कायम कोरलं गेलेलं असायचं.
लहानपणी खाऊ घेऊन येणारे वडिलांचे मित्र अचानक एखाद्या दिवशी भेटायला येतात, त्यांच्या डोक्यावरचे पांढरे केस, गालांचा वाढलेला घेर, सुरकुत्यांनी घेरलेला चेहरा बघून मधला काळ सरून गेल्याची जाणच मुळात मनाला समजत नाही. मन अजूनही भूतकाळातच रमत असतं..
कधीतरी तारीख लिहायची वेळ येते तेव्हा अजूनही शाळा कॉलेजच्या वह्यात लिहिलेलं साल लिहायची चूक होते, चालू वर्ष कोणतं हे आठवायला बरीच सेकंद जातात..मग लक्षात येतं, अरे हा मधला काळ सरला कुठे?
वय सहसा कुणी विचारत नाही, पण कागदपत्रावर स्वतःचं वय लिहिताना अगदी प्रौढ झाल्याची जाणीव नक्कीच होते. खरंच आपण इतके मोठे झालो?
साठीच्या पूढे गेलेल्या काहींची दुःखद बातमी कानावर येते, जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री पडद्याआड होतात..एकेक बातमी ऐकून आपण काळाच्या पुढे सरकतो आहोत याची जाणीव होत राहते.
जुनी माणसं भेटतात, त्यांचं बदललेलं रूप बघून एक वेगळीच कळ आरपार जाते. वयाची चिन्ह शरीरावर स्पष्ट दिसू लागतात. त्यांचीही दृष्टी काही वेगळी नसते..
स्वतःला रोजच आरशात बघितल्यामुळे आपल्यात झालेला बदल आपल्याही लक्षात येत नाही, पण आईच्या हातावर वाढणाऱ्या सुरकुत्या, वडिलांचे पिकणारे केस अन आजीची वाढत जाणारी विस्मृती… हे मात्र जीवाला घोर लावून जातात..
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.