मुलांचं कौतुक करता करता सासुबाई सुनांच्या कौतुकाकडे सपशेल दुर्लक्ष करायच्या, कौतुकाचा कधी एक शब्द काढत नव्हत्या..दोन्ही सुना तश्या प्रेमळ, कष्टाळू…जीवाला जीव लावणाऱ्या… लीला बाईंना आई म्हणून मुलांकडून प्रेम मिळालं, पण एक कर्तव्य म्हणून मुलांनी ते दिलं… काहीका असेना, पण मुलं जीव लावताय याचं अवाच्या सवा वर्णन लिलाबाई करायच्या…
“या शिंदे बाई..खूप दिवसांनी..”
“तब्येत बरी नाही तुमची असं ऐकलं..”
“तक्रारी चालूच राहतात. त्या निमित्ताने का होईना, तुम्ही आलात…सुनंदा चहा टाक बाई, ललिता, पोहे बनव…”
दोघी सुनांनी मोठ्या आपुलकीने शिंदे काकूंना चहा पाणी केलं…काकू म्हणाल्या…
“छान झालेत हो पोहे…चव आहे तुमच्या सूनबाईच्या हाताला…”
सुनंदा ने ललिता ला कोपर मारलं, ललिता लाजली…पहिल्यांदा कुणीतरी असं कौतुक करत होतं..
“अहो आमचा राकेश, त्यानेच आणलेत पोहे एका मोठ्या दुकानातुन…चवच असते त्या पोह्यांना मुळात… आणि भाजीपाला तोच आणतो….कुठलंही काम अगदी काटेकोरपणे आणि उत्तमोत्तम करतो बाई काय सांगू….”
ललिता च्या पोह्यांचा विषय अखेर राकेश च्या कौतुकसोहळ्याने पार पडला…
“चहा बाकी अगदी कडक हा..सुंदर…”
सुनंदा गालातल्या गालात हसते…ललिता आपल्या जाऊंचं अजून कौतुक सांगणार इतक्यात सासुबाईंचं सुरू…
“शेखर…पलीकडच्या गोठ्यातून दूध आणतो…अगदी पिव्वर माल…चांगल्या वस्तू लागतात बाई त्याला…म्हणून चहालाही चव आली…”
सुनंदा चं कौतुकही राहिलं बाजूला…
शिंदे काकूंना राग आला, सुनांचं कौतुक सोडून मुलाची गौरवगाथा काय सुरू केली या बाईने…त्या काही बोलणार इतक्यात सुनंदा आणि ललिता ने त्यांना “जाऊद्या..” अशी खूण केली..
सुनंदा आणि ललिता या गोष्टीला अगदी हसण्यावारी नेत…कारण सासूबाईंचा स्वभाव बदलणं तर शक्य नाही..मग कशाला आपण स्वतःलाच त्रास करून घ्यायचा? असा विचार करून दोघी जावांनी दुर्लक्ष करायचं ठरवलं…
दोन्ही जावा आणि त्यांचे नवरे एकदा एकत्र जेवत होते…लिलाबाई जेवण उरकून मंदिरात गेलेल्या…तेव्हा सुनंदा आणि ललिता मध्ये काहीतरी खुसरपुसर झाली आणि त्या हसायला लागल्या..
“काय गं बायांनो…काय झालं हसायला..”
“काही नाही.. सासूबाई…पोराचं फार कौतुक हो त्यांना…”
“असणारच…आम्ही किती करतो आईसाठी..” दोघे भाऊ छाती फुलवत म्हणाले…
“आम्हीही करतो, पण आमचं नाही केलं कधी कौतुक..”
“त्यासाठी मनापासून काम करावं लागतं…काही करत नसाल तुम्ही आईचं, नाहीतर कौतुक नसतं केलं का तिने??”
“म्हणजे आम्ही काही करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला??”
“तसंच समजा…हे बघा, आई साठी तिला आवडेल असं काही केलं तर कौतुक करणार ती..साधं सरळ गणित आहे…बरं चला, आम्ही तुम्हाला एक संधी देतो…ते करून बघा, आई हमखास तुमचं कौतुक करणार..”
“कसली संधी?”
“उद्या आम्ही दोघे जातो ट्रेकिंग ला…आईला उद्या दवाखान्यात न्यायचं होतं…ते तुम्ही घेऊन जा..आईची काळजी घ्या तिथे…मग बघा, कसं कौतुक करेन ती तुमचं..”
ललिता आणि सुनंदा डोक्याला हात लावून परत हसू लागल्या..
“अगदी जीव काढून ठेवला तरी कौतुक करणार नाही, केलेल्या सेवेची जाणीव ठेवत नाही..आणि म्हणे दवाखान्यात नेलं ते कौतुक करतील..”
“का नाही करणार? तुम्ही दोघी इतकी काळजी करताय पाहून तिचं नक्की मतपरिवर्तन होईल बघा…पैज लावा..”
“ठिके, चला होऊद्या तुमचं समाधान…”
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दोन्ही सुना सासूबाईंना दवाखान्यात घेऊन जातात…
मुलं एरवी आईला रिक्षाने नेत, पण आईंना त्रास नको म्हणून सुनांनीं टॅक्सी केली…एरवी हॉस्पिटलमध्ये दोन्ही मुलं आईला बाकावर बसवून ताटकळत ठेवायचे, एक बाहेर जाऊन फोनवर बोलायचा तर एक आत जाऊन नंबर लावायचा…
पण ललिता सासूबाईंसोबतच बसून होती, आणि सुनंदा आत नंबर लावायला गेली…डॉकटर कडे गेल्यावर दोन्ही सुनांनीं काळजीपोटी सर्व माहिती डॉक्टरांना विचारली..पथ्य काय पाळावं, व्यायाम कसा करायचा…कुठला आहार द्यायचा…परत कधी यायचं…
डॉकटर लाही नवल वाटलं..कारण मुलं इतकी खोलवर काळजी करत नव्हती आणि इतकं विचारतही नव्हती…
काम झालं आणि सर्वजण घरी आले…
दोघींचे नवरे काही वेळाने परत आले..आणि ललिता व सुनंदा ला इशारा करत सांगितलं..”बघा आता तुमचं कसं कौतुक होईल…”
“आई…जाऊन आले का मग दवाखान्यात?”
इतक्यात शिंदे बाई घरात आल्या..
“काय हो? झाली का तपासणी?”
“हो झाली..माझ्या लेकरांनी बघा आल्या आल्या माझी चौकशी केली…इतके दमून आले पण आधी माझी काळजी त्यांना…”
“टॅक्सी केली म्हणे..”
“ऐकतच नव्हत्या या पोरी… म्हटलं रिक्षा करू…माझी पोरं काटकसरी…पैशाची किंमत आहे त्यांना…या पोरींना फक्त उधळपट्टी सांगा…”
दोन्ही मुलांनी कपाळावर हात मारून घेतला…नेहमीप्रमाणे दोन्ही सुना हसत आत निघून गेल्या..
शिंदे काकू मात्र मनातल्या मनात म्हणाल्या..
“या पोरी पैशाची नाही पण माणसाची किंमत करतात गं माय…कधी कळणार तुला…”
Same maza sasu bai