कसोटी-3 अंतिम

 त्याच्या वागण्यात नम्रता नव्हती,

साधनाला वाटलेलं की तो काम करतोय इथे तर अदबीने राहील, सांगितलेलं काम आवडीने करेल, पण सगळं उलटं होत होतं,

मॅनेजर त्याला काम सांगायला जाई, तो स्वतःहून विचारत नसे,

कुणी सिनियर काहीतरी सांगायला आलं तर पायाची घडी घालून राजसारखा बसून राही, आणि आपण काम करतोय तर कंपनीवर उपकार करतोय या भावनेने तो काम करे,

एकदा तर कहरच, एका सिनियरने त्याला एक टास्क दिलेलं, त्याने फाईल टेबलवर आपटली आणि म्हणाला

“हे काम माझ्या लायकीचं नाही, मी हे करणार नाही, आणि मला इथे हा टेबल खुर्ची कम्फर्टेबल नाहीये, मी तिकडे बसणार”

साधना सगळं बघत होती आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली,

“Get out” ती ओरडली तसा विहान पाय आपटत तिथून निघून गेला, माफी नाही का काही नाही..जाता जाता बडबड करत होता,

“आय आय टी मधून शिकलोय मी, उद्या अमेरिकेला जाणार आणि मला असले चिल्लर कामं सांगताय, मला काही रिस्पेक्ट आहे की नाही?”

“काल आलेला मुलगा अन याला रिस्पेक्ट पाहिजे , आय आय टी मधून शिकलाय म्हणून इतका माज करायचा? त्याच्यापेक्षा अनुभवाने मोठी लोकं आहेत इथे त्यांचा अनादर करण्याची याची हिम्मत कशी झाली?”

साधना स्टाफसमोर राग काढत होती,

संध्याकाळी घरी गेल्यावर आईला हकीकत सांगितली,

आई हसायला लागली,

“काय झालं हसायला?”

“विहान आणि तू अगदी सारखेच!”

“कसेकाय?”

“बेटा, आता मी काय सांगते लक्ष देऊन ऐक…मान सर्वांना हवा असतो, सर्वांना वाटतं मला लोकांनी आदराने वागवलं पाहिजे, पण हा आदर बोलून नाही तर वागून कमवावा लागतो. विहान हुशार होता, सगळं होतं.. पण त्याच्याकडे दुसऱ्यासमोर, अनुभवी माणसासमोर झुकायची नम्रता नव्हती म्हणून त्याने आदर तर सोडाच, स्वतःचीच नाचक्की करून घेतली..

तू कुठेही जा,

कंपनी असो, घर असो वा अजून काही,

नवीन माणूस हा तिथे नवीनच असतो, अनुभव नसलेला,

त्याला तिथे रुळावं लागतं,

शिकावं लागतं,

कधी कधी लहान व्हावं लागतं,

अपमान सहन करावा लागतो,

या सगळ्यातून जाऊन मग त्याला एका लेव्हलला आदर मिळतो तो शाश्वत असतो,

घरात सासुबाई मोठ्या म्हणून त्यांना आदर,

जाउबाई मोठ्या म्हणून त्यांना मान,

नणंद मोठी म्हणून तिचा मान,

मोठा भाऊ म्हणून त्याचा मान..

ही सगळी मोठी मान मिळवणारी माणसं कधी न कधी लहानच असतात, अनेक अपमानातून गेलेली असतात..मग त्याक्षणी त्यांचं शिक्षण किती, कर्तृत्व काय याला थारा नसते..सगळ्या कसोटीतून गेल्यानंतर त्यांना तो मान मिळतो..

तुलाही तो मान मिळेल, आदर मिळेल, तुझ्या शब्दाला किंमत मिळेल,

पण नव्या घरी गेल्या गेल्या तुझ्या शब्दाला उचलून धरतील असा अट्टहास करू नकोस,

तो आदर,

तो मान,

तो विश्वास तुला कमवावा लागेल,

मान सहजासहजी मिळत नाही, तो मिळवावा लागतो..

अगदी कुठेही,

कंपनीत नवीन आलेला एम्प्लॉयी असो वा घरात आलेली सून,

अनुभवाने लहानच असतात,

तसंच लहान बनून शिकत राहायचं, समजून घेत राहायचं,

बाहेरच्या जगातलं स्थान बाजूला ठेवायचं,

आणि त्यानंतर जे मोठेपण मिळतं ते अढळ असतं..

आईने हे सांगितल्यानंतर तिला विहान आणि तिच्यातली साम्यता दिसून आली,

तिला स्वतःचीच लाज वाटू लागली,

आई पुन्हा म्हणाली,

“आणि हो, ही तुझी आजी आहे ना..जी मला लग्नासाठी मत विचारत होती..तीच एकेकाळी मला हात धरून घराबाहेर काढायला निघाली होती…”

साधनाने डोळे विस्फारले,

“या दोन प्रसंगात किती अंतर दिसलं ना तुला? एक लक्षात ठेव, काळ बदलतो, माणसं बदलतात, विचार बदलतात, 

फक्त थोडा धीर हवा..

विहान ऑफिसमध्ये आला तेव्हा इतर अनुभवी लोकांनी त्याला तो केवळ चांगला शिकलेला आहे म्हणून त्याचे नखरे सहन केलेलं चाललं असतं का? तू त्याचा मागेपुढे करून त्याची महती गात बसली असतीस का? मग घरात नव्याने आलेली तू, तुला हे सगळं लगेच मिळेल अशी अपेक्षा का?”

साधनाला जे समजायचं ते समजलं,

आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या सासरी रुजू झाली

समाप्त

7 thoughts on “कसोटी-3 अंतिम”

Leave a Comment