कर्मफळ

“तू सोनिया ची मैत्रीण ना?”
चकचकीत कार मधून उतरलेला एक साठीचा माणूस मला म्हणाला…
महागडी गाडी, चकचकीत सूट आणि चेहऱ्यावर श्रीमंतीची झळाळी पाहुण मी क्षणभर थबकलेच…
“हॅलो… मी मिस्टर भोसले…सोनिया चे सासरे..”
त्यांना नकळत शेखहॅन्ड करत मी अजूनही गप्पच होते…
मला गप बघून ते म्हणाले,
“आम्ही इथे जवळच राहतो..if you wish… माझ्यासोबत चल, सोनियालाही भेटून घे..”
मी कसलाही विचार न करता गाडीत बसले, मलाही हा सगळा प्रकार जाणून घ्यायचा होता…गाडीत बसल्यावर मी काकांना विचारलं..
“पण तुम्हाला कसं माहीत की मी सोनिया ची मैत्रीण आहे ते?”
“सोनिया तिच्या कॉलेज चे फोटोज आम्हाला दाखवत असायची, त्यात तुझा फोटो होता…खूप कौतुक करायची तुझं..म्हणून मला तुझा चेहरा लक्षात होता..”
सोनिया ने माझं कौतुक करावं ही दुसरी धक्कादायक बाब होती.
सोनिया म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप.. तिचं नाव जरी काढलं तरी माझा संताप व्हायचा…
कॉलेज मध्ये माझी सर्वात जवळची मैत्रीण..सोनिया…दिसायला सुंदर..शांत, अत्यंत भोळवट… कुणी येऊन तिला चार शब्द शिव्या दिल्या तरी हिने कधीच प्रतिउत्तर दिलं नाही…होत असलेला अन्याय निमूटपणे सहन करायचा आणि एक शब्दानेही प्रत्युत्तर द्यायचं नाही इतकी ती शांत…
तिच्या ह्याच निरागस स्वभावामुळे माझ्या मामेभावा साठी हिचं स्थळ सुचवलं होतं… सगळं आलबेल..लग्न झालं..संसाराला लागले…
पण हळूहळू घरातली कुणकुण कानावर येऊ लागली…
मामीने तर एकदा जीव देण्याची धमकी दिली. प्रकरण जरा गंभीर आहे असं वाटून लग्नातली मध्यस्थी म्हणून मला त्यांच्याकडे मध्ये पडायला जाणं भाग होतं.
गेल्यावर जे ऐकलं ते अगदी सुन्न करणारं होतं…
“सोनियाने मामीच्या आजारपणात तिला उपाशी ठेवलं…माझ्या भावाचा सर्वांसमोर अपमान केला…घरात एकही कामाला हात लावायची नाही आणि येता जाता सर्वांचा अपमान करत असे..मी शिकलेली मुलगी आहे आणि माझ्याहून हुशार कोणीच नाही असा आव आणत ती वावरत असे…”
मला तर पाहिल्यांदा विश्वासच बसेना…इतकी भोळवट, शांत आणि निरागस मुलगी असं काही करू शकते? मला माझ्या मध्यस्थीवर मलाच राग येऊ लागला…माझ्या भावाचं आयुष्य बरबाद केल्याचा ठपका घेऊन मी कुढत जगत होते…
त्या दिवसापासून मी सोनियाशी माझा संपर्क कायमचा तोडला…
आणि आज अचानक एक माणूस येऊन म्हणतो की मी सोनिया चे सासरे…मला कुतूहल जागृत झालं आणि मी त्यांचा घरी कुठलेही आढेवेढे न घेता गेले..
गाडी एका आलिशान बंगल्यासमोर थांबली, इतक्या आलिशान बंगल्यात मी पहिल्यांदाच पाय ठेवत होते…
घरात एकेक महागडी वस्तू होती…माझे डोळे दिपून गेले…
“सोनू बेटा… बघ कोण आलंय ते…”
सासरे म्हणाले,
सोनिया बाहेर आली, खूप सुंदर दिसत होती पहिल्यापेक्षा..अंगावर डिझाइनर ड्रेस…चेहऱ्यावर एक तेज…श्रीमंतीची झळ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती..
मला पाहून ती क्षणभर थबकलीच…तिला खूप आनंद झाला..सासरे निघून गेले. तिने खूप गप्पा मारल्या…मला कॉलेजची सोनिया आठवली…मध्ये मध्ये नोकर येऊन आम्हाला ज्यूस, नाष्टा देत पाहुणचार करत होते..पण बोलण्यात तिने तिच्या पहिल्या लग्नाचा विषय काढला नाही, आणि मलाही इच्छा झाली नाही…थोड्याच वेळात एक मुलगा तिथे आला, सोनिया चा नवरा असावा…त्याने मला हॅलो केले…सोनिया जवळ तो आला…
“तू खाल्लं का काही?”
“नाही अजून..”
तो स्वतः किचन मध्ये जाऊन ताट घेऊन आला..”हे बघ, अजिबात वेळ चुकवायची नाही…खाऊन घे…”
असं म्हणत त्याने तिला एक घास भरवला..
माझ्यासमोर हे सगळं होत असताना तिला जरा अवघडल्यासारखं झालं…
“असू दे मी खाऊन घेईन…तुला मिटिंग आहे ना..जा तू..”
सोनिया ने त्याला जायला सांगितलं..
मी कितीतरी वेळ त्याचकडे बघत होते..नजर हटतच नव्हती…माझ्या मामेभावाहून कितीतरी सुंदर होता तो..रुबाबदार होता..एक वेळ मला तर हा एक फिल्मस्टार आहे की काय असं वाटलं..आणि सोनिया बद्दल इतकं प्रेम? इतका जिव्हाळा? माझ्या भावाने यातलं तसूभरही कधी केलं नसेल…
नंतर मी तिचा निरोप घेतला, घरी सोडायला तिच्या ड्राइवर ला पाचारण करण्यात आलं…
मी घरी गेले..पण डोकं बधिर झालेलं.. सोनिया चा संपर्क तुटला होता…पण या काळात तिने दुसरं लग्न केलं..आणि तेही इतक्या श्रीमंत घरात?
काही दिवसांनी मला मामीचा फोन आला…सोनिया आणि भावाचा घटस्फोट झाल्यापासून ते कुटुंब जरा दुःखातच होतं…
“तुझ्या भावाचं दुसरं लग्न करायचं आहे..मुलगी बघितलीये…2 दिवस आधी येऊन जा..साधंच करायचं आहे लग्न, पण तरी येऊन जा…”
आता दोघांनाही शेवटी आयुष्यात पूढे जायचंच होतं.. नवीन आयुष्य सुरू करायचंच होतं…
मी 2 दिवस आधी गेले. मामीचं सून पुराण अजूनही चालूच होतं..
“काय दुर्बुद्धी झाली होती याला त्या भवानीच्या गळ्यात मारलं…आयुष्य बरबाद केलं माझ्या पोराचं…दुसरी असती तर असं पुन्हा एकदा लग्न करायची वेळ नसती आली माझ्या पोरावर..नुसती बाहेर भटकायची… कुठे तोंड काळं करायला जायची तिलाच माहीत…”
हे अत्यंत भयानक होतं, सोनिया बद्दल माझ्या मनात जी प्रतिमा होती ती आणि इथे तिच्याबद्दल जे बोललं जात होतं ते अगदी विसंगत होतं… विश्वास कुणावर ठेवावा? शेवटी रक्ताचं नातंच जिंकतं…मला मामीचं खरं वाटू लागलं आणि सोनिया बद्दल द्वेष अजून वाढला…पण मामीला कसं सांगावं की..तिने केव्हाच दुसरं लग्न केलंय… गडगंज घरात ती राणीसारखी राहतेय…मी मौन ठेवणं पसंत केलं…
त्या दिवशी मामीचं अचानक डोकं दुखायला लागलं, जवळच एक मेडिकल होतं तिथे मी औषध आणायला गेले…
तिथे एक जोडपं औषध देण्याचं काम करायचं…
“भाऊ…डोकेदुखी साठी द्या ना एखादी गोळी..”
तो माणूस गोळ्या काढायला गेला..त्याची बायको माझ्याशी बोलायला लागली…
“राहायला कुठे? नवीनच दिसताय…”
“अहो नाही, मी इथली नाही..भावाचं लग्न आहे…मामीकडे आलीये…”
“अच्छा…सोनिया पण यायची…अगदी अशीच…सासू चं जरा काही दुखलं की धावत पळत यायची…दहा वेळा विचारायची…केव्हा औषध द्यायचं? किती वेळा द्यायचं? काही साईड इफेक्ट्स तर नाही ना?? असं वाटायचं की औषधं सासूला नेतेय की आईला…”
मी तिच्याकडे 2 मिनिट बघतच राहिले…ती तिच्या कामाला आत गेली, मी पैसे देऊन घरी आले…मामीला गोळ्या देऊन झोपवलं…मागच्या दाराला कामवाली आली…मी तिच्याशेजारी जाऊन बसले…थंडी बरीच होती..त्या कामवाल्या बाईच्या अंगात एक महागडं स्वेटर होतं…
“आज भांडे जास्त आहेत… मदत करू का काही?”
“असुद्या ताई…करून घेईन मी…”
“स्वेटर छान आहे हो…कुठून घेतलं.?”
मामी तिथे नाही याची खात्री करून ती बाई हळूच म्हणाली…
“मागच्या वर्षी असंच थंडीत कुडकुडत मी भांडे घासत होती, सोनिया ताईंनी पाहिलं आणि लगेच अंगातलं स्वेटर काढून मला घालायला दिलं… फार मायाळू पोर होती ओ.. या लोकांनी किंमत केली नाही…मुद्दाम तिची सासू अर्धे भांडे बाजूला काढून ठेवी, सोनिया ला कामाला लावायचं म्हणून…मी होते ना कामाला? माझ्याकडे द्यायचं ना? पण सुनेला मोलकरीण बनवायचं होतं ना यांना…”
शेजारी पाजारी संपर्क आला, सगळेजण हेच सांगायचे…सोनिया सारखी गुणी मुलगी नाही…
अखेर मला जाणीव झाली, मामी धडधडीत खोटं बोलत होती…सोनिया बद्दल या घरात खूप द्वेष होता..तिने खूप प्रयत्न केला या माणसांना आपलंसं करायचा ..पण…याच माणसांनी तिच्यावर अन्याय केला…तिच्या भाबड्या मनावर नको त्या जखमा केल्या…सोनिया ने मला सांगितलं का नाही मग? तिचा स्वभावच होता तो…अव्यक्त…भोळवट… समोरच्याने कितीही हल्ला केला तरी प्रत्युत्तर द्यायची नाही…पण तिच्या चांगुलपणाची बीजं नकळत आजूबाजूला पेरली गेली होती… त्या घटना, ती माणसं साक्षीदार होती सोनिया च्या चांगुलपणाची….”
मनात विचार आला, काय झालं असतं तिने प्रतिकार केला असता तर? जास्तीत जास्त या घरातली लोकं घाबरून तिच्याशी नीट राहिले असते…पण सोनिया सहन करत गेली…पण शेवटी देवाने योग्य न्याय केला… सोनिया ला या पाशातून मुक्त केलं…सोनिया ला तिच्या लायकीचं सासर दिलं.. तिच्या अधिकाराचं घर तिला दिलं…
भावाचं लग्न झालं…नवीन सून घरात आली…पण नशिबाचा खेळ बघा ना…जी खोटी आरोपं सोनिया वर केली जात होती ती नव्या सुनेने खरी करून दाखवली…सोनिया च्या चांगुलपणावर बोट दाखवणारी आज नव्या सुनेने केलेल्या छळाला पोटात घालत होती…पर्याय नव्हताच ना…सोनिया ला दूर केल्याचं पाप ते आता फेडत होते…
सोनिया एका गर्भश्रीमंतांच्या घरी नांदत होती..पैसे, प्रेम, माणसं… सुख..पायाशी लोळण घेत होतं… आणि इथे…आपल्या कर्माची फळं ही लोकं भोगत होते…

मला एक धडा मिळाला…चांगुलपणावर विश्वास ठेवावा..पाप्याला त्याच्या कर्मावर सोडून द्यायचं…ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला येऊन कधी न कधी धडकतच…

2 thoughts on “कर्मफळ”

Leave a Comment