ओझं

“रडतेयस की काय? काय झालं??”
“नाही ओ, डोळ्यातून सारखं पाणी येतंय सध्या…”
“सध्या फार होतंय हे…”
“होना…”
“निलेश…सुनबाई ला जरा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा…”
“आज नाही जमणार…मित्र येणार आहेत माझी घरी..”
“जाऊद्या आई, उद्या जाऊ..”
“निल्या…. मित्रांना मी पाहून घेईन..आधी उठ आणि जा…”
निलेश ने प्रेमविवाह करून अक्षता ला घरी आणलं होतं.. लग्ना आधी अगदी चित्रपटाला लाजवेल अशी प्रेमकथा त्यांची होती..त्यांचं उत्कट प्रेम होतं..एकमेकांसाठी अगदी वेळी अवेळी धावून जाणं… एकमेकांच्या वाढदिवशी काय करू अन काय नको असं हे जोडपं..
पण लग्नानंतर निलेश त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला..जे प्रेम मिळवायचं होतं ते मिळवलं…आता मोर्चा मौजमस्ती कडे…
दुसरीकडे डॉकटर विशाखा…प्रोफेशनल डॉकटर.. पूर्ण दिवस क्लिनिक मध्ये…तिला मिस्टरांचा फोन येतो..
“मी नवीन मर्सिडीज बुक केलीये…अर्धी amount कर ट्रान्सफर…”
“पूर्णच करते ना..”
“ग्रेट…कर लवकर..खरंच तुझ्या कमाईमुळे मजा होते हा आमची…थँक्स अ लॉट..”
“तुझ्यामुळेच शक्य झालं आदित्य हे…”
“रिअली??? कसं काय??”
“तुला माझ्यासाठी वेळ होताच कुठे…तुझी वाट पाहून पाहून थकले..अखेर दुसरीकडे मन रमवायचं म्हणून रात्रंदिवस इथे काम करतेय…त्यामुळेच तर पैसा येतोय…”
आदित्य निःशब्द होतो..
“बाय द वे माझ्याकडे कॅश आहे..क्लिनिक मध्ये येऊन घेऊन जा..”
असं म्हणत ती फोन ठेवते..
“नेक्स्ट???”
अक्षता आणि निलेश मध्ये येतात…
“बोला… काय दुखतंय??”
निलेश मोबाईल मध्ये डोकं घालून बसतो…
अक्षता त्याचकडे बघते…आणि वाट पाहून अखेर डॉकटर विशाखा ला सांगते…
“डोळ्यातून सारखं पाणी येतं…”
इतक्यात आदित्य आत येतो.. विशाखा त्याला थोडा वेळ बसून राहायला सांगते…
विशाखा डोळे चेक करते…इन्फेक्शन नाही…नंबर वाढलेला नाही..
“रात्री जागरण होतं का??”
“हो..झोप लागत नाही…”
“छातीत जड वाटतं का?”
“हो..”
विशाखा ला समजतं.. हा शारीरिक नाही…मानसिक आजार आहे… आदित्य सारखंच निलेश कडे अक्षता साठी वेळ नाही, मनावरचं ओझं करायला जवळ माणूसच नाही म्हटल्यावर ते ओझं जड होऊ लागतं… मग हळूहळू शरीरावरही त्याचा परिणाम होऊ लागतो..वेळीच मोकळं होणं महत्वाचं असतं… पण मोकळं करायला जवळचा माणूसच नसेल तर?
विशाखा अक्षता ला बाहेर जायला सांगते…
निलेश भानावर येतो…
“काय झालं डॉकटर? काही सिरियस नाही ना?”
हातातला मोबाईल बाजूला ठेऊन तो विचारतो..
आदित्यही लक्ष देऊन बघतो…
“तुमचा प्रेमविवाह का…”
“हो…पण याचा इथे काय संबंध?”
“सांगते…तिचे डोळेच नाही, तर संपूर्ण शरीरावर परिणाम झाला आहे…”
“काय? म्हणजे..नेमकं काय झालंय..”
निलेश काळजीच्या सुरात म्हणतो..
“तिचे हात पाहिलेत कधी? आधी जे कोमल हात हातात घेऊन तिला फुलासारखं जपण्याचं वचन दिलेलंस, ते आज रुक्ष झालेत…तिचा चेहरा पाहिलाय इतक्यात निरखून? ज्या चेहऱ्यावर भाळलास, आज त्यावरची निस्तेजता जाणवलीये?….ज्या नाजूक पायांनी ती या घरात स्वप्न घेऊन आली, आज घरासाठी झिजून तळव्यांना पडलेल्या भेगा दिसल्या तुला? ज्या रेशमी केसात तू गजरा माळायचास, तेच आज तणावाखाली जाऊन विरळ झालेले दिसले तुला??”
निलेश ला भरून आलं..खरंच… आपण कमी पडलो, वेळ दिला नाही…पण त्याचा इतका परिणाम होईल असं वाटलं नाही..
“काय उपाय यावर?”
“कुठलंही औषध लागू होणार नाही..बस..तिला आधीसारखा वेळ द्या…”
निलेश निघून गेला..
आदित्य, जो शेजारी उभा राहून ऐकत होता त्याचीही चांगलीच कानउघाडणी झाली होती…

त्याने हळूच येऊन विशाखा चा हात पकडला.. आणि मुकपणे आपली चूक मान्य केली.

Leave a Comment