“काय गं आज उदास दिसतेय…”
नेहा चा उदास चेहरा पाहून दीपक तिला विचारतो..
“काही नाही..”
“सांग गं… “
“सांगून काही उपयोग आहे का?”
“अच्छा.. म्हणजे कुणीतरी काहीतरी बोललं असणार तुला..”
“हो..आणि तुम्हाला सांगितलं तर तुमचा नेहमीचा डायलॉग…ऐकून घेतलं तर काय फरक पडतो…”
“बरोबर आहे ना, काय फरक पडतो थोडसं ऐकून घेतलं तर?”
“थोडसं?”
“जे काय असेल ते…तुम्ही बायका ना फार मनावर घेतात काही गोष्टी… अगं बोललं कुणी, तर ऐकून घ्यायचं अन सोडून द्यायचं…”
“काही गोष्टी सोडण्यासारख्या नसतात दीपक…”
“म्हणजे?”
“सासुबाईंचं नेहमीचं बोलणं…आमच्यावेळी नव्हतं असं..आम्ही असं करायचो, पैसे जपून वापरायचो, कामं स्वतः करायचो, कामाला बायका ठेवत नसायचो..”
“मग बरोबर आहे की..”
“तेवढंच असतं तर ठीक होतं हो..पण कितीदा माझ्या आईने मला शिकवलं नाही, माझ्या आईवरच संस्कार नाही इथपर्यंत बोलल्या त्या…मला वाद घालायला आवडत नाही म्हणून शांत राहिले…”
“घ्यायचं ऐकून…”
“अगदी माझ्या तोंडावर…मला वांझोटी म्हणून बोलतात…”
“ऐकून घ्यायचं…”
“बस…काय ऐकून घ्यायचं ऐकून घ्यायचं लावलंय…”
“काय फरक पडतो सांग ना ऐकून घेतलं तर? आभाळ कोसळतं की जमीन फाटते..”
“त्याहून जास्त फरक पडतो…. मी माणूस आहे, मला भावना आहेत, जाणिवा आहेत…मी कचरापेटी नाही जिच्यावर पाहिजे ती घाण फेकायची अन तिने चुपचाप आपल्या आत सामावून घ्यायची…गेले कित्येक दिवस मी हे ऐकून ऐकून खूप त्रास करून घेत आलीये..तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऐकून घेतलं…पण ती वस्तू नाही, आलं अन फेकून दिलं…शब्द आहेत ते. तलवारी सारखे धारधार…जे मानसिकतेवर सतत वार करताय…मनाला सतत पोखरून टाकताय.. आणि शिल्लक काय राहतं? एकटेपणा…”
तिच्या या कळकळीच्या बोलण्याने दीपक गहिवरून आला…नेहा आत निघून गेली, त्याचं लक्ष टेबल वरील मेडिकल रिपोर्ट कडे गेलं…मूल व्हावं म्हणून त्यांची ट्रीटमेंट चालू होती…त्यावर स्पष्ट शब्दात काही कारणं लिहिली होती… त्यातल्या एका शब्दाकडे त्याचं खास लक्ष गेलं…
“अति ताण तणावामुळे”
त्याला आता समजलं..ऐकून घेतलं तर काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो…आतून अन बाहेरूनही…
बायकांच्या या ताणतणावावर काही मार्ग पण काढायला हवा न.. सगळ्यां बायकांचं हेच म्हणणं असतं.. पण त्यांना समजून कोणी का घेत नाही
सुंदर