नात्यातील जवळच्या माणसाने अचानक जग सोडलं अन मृत्यू किती भयानक असतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली. तो आक्रोश, ते अश्रू, ते दुःखं.. सांत्वनापलीकडचं होतं. एकवेळ वृद्धापकाळाने आलेल्या मरणाला माणूस सज्ज असतो पण अकाली मरण म्हणजे कधीही न भरून काढता येणारी पोकळी. नुसत्या बातमीनेच कापरं भरलं होतं, माझीच अवस्था अशी असताना त्यांच्या बायका मुलांची काय झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी. काही गोष्टी घडून जातात पण येणाऱ्या काळासाठी काहीतरी शिकवण देऊन जातात.
आपल्या जवळची, आसपासची किंवा घरातलीच पुरुष मंडळी. भेसळीच्या या युगात पोटात ढकललेलं अन्न आत जाऊन काय उलथापालथ करेल, नाकावाटे घेणाऱ्या श्वासातुन कित्येक जंतू दळणवळण करत असतील अन बाहेरून सुदृढ दिसणाऱ्या शरीराच्या आत काय युद्ध चालू असेल हा डोळ्यांनाही न दिसणारा शाप असतो. तो कधी एकदा पलटवार करून घात करेल सांगता येत नाही.
स्त्रिया जसं स्वतःकडे दुर्लक्ष करतात त्याहून अधिक ही पुरुष मंडळी स्वतःच्या दुखण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असतात. पोटात दुखत असेल, छातीत दुखत असेल, चक्कर येत असेल तरीही ‘मला काय होतंय..मी बरा आहे..” असं दुखणं आतल्या आत दडपून टाकण्याचा जवळ जवळ सर्वच पुरुषांचा स्वभाव. जबाबदारी, कर्तव्य, अनाहूतपणे अंगावर ओढवून घेतलेली कामं या सर्वांना न्याय देण्याचा स्पर्धेत ही मंडळी आपणही किती महत्वाचे आहोत हेच विसरतात. कुटुंबासाठी कमावताना दिवसरात्र काम करून यांना संध्याकाळी आल्यावर मुला बाळांनाही न्याय द्यायचा असतो, बायकोची दुखणी खुपणी ऐकून घ्यायची असतात, भाच्यांचे लाडही पुरवायचे असतात, बहिणीची खुशालीही ऐकून घ्यायची असते, आई वडिलांची औषधही आणायची असतात..आणि हे सगळं करताना खिशा रिकामाही राहू द्यायचा नसतो. सतत भविष्याचा विचार..सतत कुटुंबाची काळजी..हे सगळं करताना आपणही एक शरीर आहोत, त्या शरीराचीही आपल्याला काळजी करायची आहे हे ते सपशेल विसरतात. दुसऱ्याला शांत नीज असं सांगताना आतून त्याची किती झीज होत असते याची नोंद तो ठेवतच नाही. मीच जर दुखणी पुढे करत राहिलो तर माझं कुटुंब कुणाकडे बघेल? त्यामुळे आतल्या आत अश्या दुखन्यांना दाबून टाकून पुरुष पुन्हा सज्ज होतात, आणि मग निसर्ग अचानक एखाद्या क्षणी पलटवार करतो अन जागीच सगळं संपतं. अवचित कुणी पाहुणा आला की त्याच्यासोबत उन्हातान्हात फिरणं, सरकारी कामात तासनतास ताटकळत उभं राहणं, ऑफीस मधील संभाव्य रिस्क ओळखून अचूक काम करण्यासाठी धडपड करणं, नोकरीवर गदा येऊ नये म्हणून शहाण्यांना प्रतिउत्तर न देता येणं, एवढं करून घरात कुणी नाराज असेल तर पुन्हा त्याच्या खुशालीसाठी जीवाचं रान करणं..हे सगळं करत असताना होणारी ओढाताण किती पुरूष मंडळी बोलून दाखवतात??
सर्व पुरुष मंडळींनी आता थोडं सजग व्हायला हवं, आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमातून बाहेर यायला हवं. वेळेवर सर्व चाचण्या करून घ्यायला हव्यात. ज्यांच्यासाठी आपण धावपळ करतोय त्यांच्यासाठी आपणच सर्वस्व आहोत याची जाणीव ठेवा. आपण स्वतःसाठी महत्वाचे नसलो तरी दुसऱ्यांसाठी आपण सर्वोच्च स्थानी आहोत हे लक्षात घ्या. वय वाढतं तसे विकार वाढतात. पुरुषांसाठी जबाबदारी कधीही संपत नाही, पण हे ओझं पेलायला आपला खांदा सुरक्षित असावा नाहीतर दुसऱ्यालाच त्याचा खांदा आपल्याला द्यायची वेळ येऊ देऊ नये.